पर्रीकर यांच्या मुलानंतर गोव्यात आता भाजपचे माजी मुख्यमंत्रीही अपक्ष लढणार

गोव्यात  तब्बल २४ आमदारांनी गेल्या पाच वर्षात पक्षांतर केले आहे. भारतात बाकी दुसरे कुठेही एवढ्या प्रमाणात पक्षांतर झालेलं नाहीये.

या पक्षांतरचा सगळ्यात जास्त भाजपाला झाला पक्षाचं संखयबल २७ वर पोहचलं तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या अवघ्या दोन वर आली.

मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे आमदार पक्षात घेणाऱ्या भाजपाला आता स्वतःच्या पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देताना काटेवारची कसरत करावी लागतेय. आज भाजपात आलेले अनेक आमदार भाजपाच्याच उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत पोहचले होते. त्यामुळं या आमदारांना तिकीट दिल्यानं पक्षानं डावल्याची भावना पक्षाच्या माजी आमदारांत निर्माण झाली आहे.

यामुळेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाला  आता आणखी एक धक्का बसला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.

“मी अनेक वर्षे भाजपचा सदस्य होतो. पण पक्षाने मला गांभीर्याने घेतले नाही. मी पक्षापासून दूर जाण्याची तयारी केली असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक-दोन दिवसांत मी याबाबत घोषणा करेन.” असं  लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणतायत. 

लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोव्याच्या राजकारणातील एक अनुभवी व्यतिमत्व आहे. २००२ ते २०१७ पर्यंत त्यांनी मंद्रेम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जी जाहीरनामा समिती बनवली होती तिचे अध्यक्षही आहेत. यासोबतच ते पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्यही आहेत. 

संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर २०१४ ते २०१७ पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री होते.

मात्र २०१७च्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांच्याकडून पराभव स्वीकारावं लागला होता. पुढे २०१९ मध्ये सोपटे यांनी इतर काँग्रेस नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता भाजपनं पार्सेकरांना डावलत दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे. सोपटे हे मांद्रे येथील भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत पार्सेकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही भाजप सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. 

उत्पल आपल्या वडिलांच्या पारंपारिक सीट पणजीतून तिकीट मागत होते. पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर त्यांनी पक्षावर अनेक आरोपही केले. त्यांच्या जागी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून आलेल्या एका व्यक्तीला पक्षाने तिकीट दिल्याचे ते म्हणाले होते.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजपनं तृणमूल काँग्रेस मधून आलेल्या अनेक आमदारांना तिकीट दिलं होतं. त्यामुळं निष्ठावंतांच्या नाराजीचा  मोठा फटका भाजपाला बसला होता. त्यामुळं गोव्याच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होणार का हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.