भाजपसाठी ‘मिशन साऊथ इंडिया’ वाटतंय तितकं सोपं नाहीये…
नुकत्याच झालेल्या नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना यश मिळाले आहे. आता भाजपने आपले लक्ष्य या वर्षी येऊ घातलेल्या कर्नाटक आणि तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणूक आणि २०२४ साली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे केंद्रित केले आहे.
भाजपाला लोकसभेत ३०२ जागांसह एकहाती बहुमत आहे. असे असले तरी भाजपचे हे यश उत्तर भारत आणि गायपट्ट्यातले आहे. भाजपच्या या विजयी वारूला दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सारख्या पक्षांनी लगाम घातला आहे.
आकडेवारीच बघा, २०१९ मध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातल्या एकूण १२९ लोकसभा जागांपैकी भाजपाला केवळ २९ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यातही २५ जागा या कर्नाटकमध्ये मोडतात, इतर ४ तेलंगणा तर आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये भाजप आपले खातेसुद्धा उघडू शकला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या पक्षबैठकीत भाजपने २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिणेतून ८० जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
देशातल्या या ४ दक्षिण राज्यांना वगळले तर भाजपने इतरत्र ६६ टक्के लोकसभेच्या जागांवर विजय मिळवला आहे. या चार राज्यात मात्र २२ टक्के जागा घेऊन भाजप काठावर पास झाली आहे. त्यातही कर्नाटक वगळता इतरत्र भाजप नापासच आहे. यामुळेच भाजपाला दक्षिणेकडे आपले लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे.
मात्र दक्षिणेत भाजपाला राज्यागणिक वेगवेगळी आव्हाने आहेत. ती आव्हाने कोणती आहेत ते पाहूया,
२०१९ मध्ये तामिळनाडू मध्ये भाजप आणि मित्रपक्षांना धूळ चारत द्रमुक ने ३८ जागा पटकावल्या पण तामिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की द्रविडीयन राजकारणाचे केंद्र असलेल्या या राज्यामध्ये भाजपच्या संघटनात्मक यशामुळॆ पक्षासाठी अनेक राजकीय गोष्टी मनासारख्या घडू शकतात.
उदा २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राज्यात द्रमुक लाटेवर मात करून ४ विधानसभा जागा जिंकल्या, ज्यामध्ये द्रविडियन दिग्गज आणि विवेकवादी नेते EV रामासामी पेरियार यांचे जन्मस्थान असलेल्या इरोड जिल्ह्यातील एका जागेचा समावेश आहे.
भाजपच्या तामिळनाडू युनिटने आता २०२४ मध्ये तामिळनाडूमधून १५ लोकसभा जागा जिंकण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातला प्रमुख पक्ष द्रमुक, ज्यांच्या नेतृत्वाखालील युतीने नुकत्याच संपलेल्या इरोड पूर्व पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे, त्याच्याशी सामना करण्याची रणनीती आखल्याचे भाजपने ठासून सांगितले आहे. मागील पोटनिवडणुकीत इरोड मध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचा काँग्रेसने ६६,००० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
“यावेळी आम्ही २४ लोकसभा मतदारसंघ आमच्या मित्रपक्षांना वाटून कमळ चिन्हावर १५ जागा लढवू शकतो. आम्ही जिंकता येण्याजोग्या जागा आधीच ओळखल्या आहेत आणि त्याच मतदारसंघांची निवड केली आहे जिथे आम्ही मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर होतो,” असे भाजपचे राज्य उपाध्यक्ष एम चक्रवर्ती म्हणाले. “येत्या काही महिन्यांत अनेक केंद्रीय मंत्री या निवडणुकीसाठी पक्षाची तयारी करण्यासाठी राज्याला भेट देतील. ते भाजपला बूथ स्तरावर मजबूत करण्यास मदत करतील”, असेही ते म्हणाले.
भाजपाला सत्तेत येण्याची संधी आहे त्या तेलंगणा या दक्षिणेतल्या राज्याबद्दल बघूया,
२०१८ मधील गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ११९ पैकी केवळ एकच जागा पक्षाला जिंकता आली असली, तरी २ पोटनिवडणुकांमध्ये मनोबल वाढवणाऱ्या विजयानंतर त्याचे संख्याबळ ३ झाले आहे. २०२० मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणुकीतही भाजपने जबरदस्त कामगिरी केली होती.
काँग्रेस हा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चा आताचा मुख्य विरोधक. पण पक्षातील मतभेदाच्या आरोपांमुळे निवडणुकीत अपयशी ठरला. भाजपने गेल्या काही वर्षांपासून विधानसभा निवडणुकीत बीआरएसला पर्याय म्हणून उदयास येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. तथापि, राज्यभरात सत्ताधारी बीआरएस पक्षाचे विस्तीर्ण संघटन आणि पक्षीय ताकद लक्षात घेता बीआरएसला हरवणे भाजप पुढे एक मोठे आव्हान असेल.
शेजारच्या आंध्र प्रदेशात, भाजप चांगले प्रदर्शन करण्याची आकांक्षा बाळगत आहे, परंतु या राज्यात दोन प्रादेशिक पक्ष, अनुक्रमे जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस आणि एन. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी (टी.डी.पी.) यांचे अनेक वर्ष वर्चस्व असल्याने भाजपाला येथे संघटनात्मक मर्यादा येत आहेत असे जाणकार सांगतात.
केरळमध्ये पक्षाचे राजकीय अस्तित्व नगण्य आहे, परंतु पक्षाला चांगला संघटनात्मक आधार आहे. राज्यातील एलडीएफ आणि यूडीएफ यांच्या द्विपक्षीय राजकारणाचा प्रतिकार म्हणून, भाजपला राज्याच्या विविध सामाजिक घटकांचा वापर सत्ता मिळवण्यासाठी तसेच डाव्यांच्या परिवर्तनवादी दाव्यांच्या पलीकडचे एक मॉडेल सादर करण्याची संधी आहे असे मत राजकीय विश्लेषक मांडतात.
थोडक्यात कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये भाजपला संघटनात्मक आधार आणि मित्रपक्षांशी राजकीय सामंजस्य या दोनच गोष्टींवर दक्षिणेत विजय मिळवता येईल असे सध्या तरी दिसत आहे. भाजपचा दक्षिणदिग्विजय होतोय का पुन्हा भाजप नापास होतीये हे येणाऱ्या निवडणुकानंतरच कळेल.
हे हि वाच भिडू :
- रघुराम राजन यांनी ज्याची भीती वर्तवली, तो ‘हिंदू वृद्धी दर’ काय आहे..?
- एका इंजिनिअरने सगळ्या बॉलिवूडला दाखवून दिलं, सामाजिक प्रश्नांवर कसा सिनेमा बनवतात…