मुंबई समुद्रात बुडू नये म्हणून बीएमसीने ऍक्शन प्लॅन आणलाय !

मुंबई म्हणजे स्वप्ननगरी…

सगळ्या भारतातून, त्याहीपेक्षा संपूर्ण जगभरातून मुंबईत लोक सेटल व्हायला येतात. या सगळ्यांचं ओझं मुंबापुरी अव्याहतपणे वाहते आहे. मुंबई ही गोरगरिबांपासून ते इलाईट क्लास अशा सगळ्यांचीच आहे. आमची मुंबई..

पण या मुंबईला २०५० पर्यंत मोठा धोका उत्पन्न होणार आहे. म्हणजे मुंबई पाण्याखाली जाण्याची चिन्ह आहेत. 

आज, मुंबईचे सर्वात पॉश समजले जाणारे गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, हॉटेल ताज, मंत्रालय, कुलाबा, सँडहर्स्ट रोड, काळबादेवी आणि ग्रँट रोड जे मुंबईच्या सौंदर्यात भर घालतात, ते २०५० पर्यंत अस्तित्वातच राहणार नाहीत. हे सगळे समुद्रात जातील आणि आपण फक्त त्यांना पाण्यात डुबताना बघत राहू.

म्हणजेच, पुढील पंचवीस ते तीस वर्षांनंतर मुंबईतले हे भाग इतिहासजमा होतील, आणि आपल्याला बघण्यासाठी उरणारच नाहीत.

विकासाच्या नावावर आपण मानवाने किती विनाश केलाय हे तुम्हाला आता समजलंच असेल. २०५० पर्यंत समुद्राची पातळी इतकी वाढेल की नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह दक्षिण मुंबईच्या एबीसी आणि डी वॉर्डला जोडलेले ८० टक्के क्षेत्र पाण्याखाली जाईल.

माहिती काय म्हणते ?

वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (WRI) ने, मुंबईच्या असुरक्षिततेच्या मूल्यांकनावर केलेल्या अभ्यासानुसार, शहराला हवामानाच्या दोन प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागतोय. एकतर तापमानात होणारी  वाढ आणि याचा परिणाम पावसाच्या रूपात म्हणजेच अतिवृष्टीच्या घटना. ज्यामुळे पूराचा सामना करावा लागेल. २००७ नंतर शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत तीव्र पाऊस आणि वादळाच्या घटनांमध्ये ही लक्षणीय वाढ झाली आहे.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनेलच्या (IPCC) ताज्या अहवालात हवामान बदलांवर चेतावणी देण्यात आली आहे. हवामान बदलामुळे मुंबईसह किमान १२ भारतीय किनारपट्टीवरील शहरांना पुढील तीन दशकांत ०.१  मीटर ते ०.३ मीटर समुद्रवाढीचा सामना करावा लागेल.

याआधी, फेब्रुवारी २०२० मध्ये, मॅकिन्झी इंडियाच्या एका अहवालात म्हटले आहे की, २०५० पर्यंत मुंबईत फ्लॅश फ्लडच्या तीव्रतेमध्ये २५ टक्के वाढ आणि समुद्राच्या पातळीत ०.५ मीटर वाढ दिसून येईल. याचा परिणाम किनारपट्टीपासून एक किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या दोन ते तीन दशलक्ष लोकांना स्थलांतर करावं लागेल.

मुंबईसाठी BMC ऍक्शन प्लॅन तयार करते आहे. मुंबईच्या क्लायमेट चेंज संदर्भात एक व्हिजन सेट करण्यास आणि  हवामानातील आव्हानांचे शमन करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी हा ऍक्शन प्लॅन मदत करेल.

C 40 ही हवामान संबंधित नेतृत्व करणारा शहरांचा एक गट आहे. डिसेंबर २०२० मध्ये मुंबई C 40 शहरांच्या गटात सामील झाली. C 40 शहरांच्या या गटात जगभरातील ९७ शहरं जोडली गेली आहेत. या गटाचा एक फायदा म्हणजे ही शहर ग्रीनहाऊस वायूंच उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करून हवामान बदलांना तोंड देण्यासाठी हवामान कृती योजना विकसित आणि अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतायत.

पण हा प्लॅन नक्की आहे तरी काय ? 

या प्लॅनच्या आराखड्या अंतर्गत ६ कलमी कार्यक्रम बनविण्यात आला आहे. या प्लॅनच्या आधारे भविष्यातील गोष्टींचे नियोजन केले जाईल. ज्या अंतर्गत कचरा व्यवस्थापन, अर्बन ग्रीनिंग, बायोडायवर्सिटी, अर्बन प्लॅनींग एंड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, ऊर्जा अंमलबजावणी, चांगल्या दर्जाची हवा, सस्टेनेबल मोबिलिटी याआधारे कामं करण्यात येणार आहे. या प्लॅनसाठी मुंबईच्या नागरिकांचे हि मत विचारात घेण्यात येईल.

हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी, MCAP क्षेत्राद्वारे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या पद्धतींवर, नजीकच्या कालावधीसाठी (२०३०), मध्यम कालावधी (२०४०) आणि दीर्घकालीन (२०५०) उद्दिष्ट ठेऊन लक्ष केंद्रित करण्यात येईल.

पुढील काही महिन्यांसाठी, BMC आणि WRI इंडिया हे एकत्रितरित्या सहा प्रमुख क्षेत्रांतील  संघटना आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून अभिप्राय आणि शिफारसी जाणून घेतील. तसेच पर्यावरणीय तज्ञांची या प्लॅन अंतर्गत मदत घेतील.

आणि शेवटी आपली प्राणप्रिय मुंबई २०५० पर्यंत समुद्रात बुडण्यापासून वाचवतील. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.