मुंबईच्या उंदीर मारण्याचा घोटाळा सोडा बाजूला; हे मेलेले उंदीर महापालिका मोजते कसे ?
स्थळ : अर्थातच मुंबई
वेळ : रात्रीचे ११ वाजलेत
झोपडपट्टीत गोंधळाचं वातावरण आहे. अरे धर… ठोक… मार दांडा… अरे पळाला बघ तुझ्या मागून. अरे धर त्याला… धर
झोपडपट्टीच्या अंधारलेल्या गल्लीत तीन-चार मूषक संहारक हातात मजबूत लाकडी दांडे घेऊन उंदरांच्या मागं पळतायत असं सीन आहे. तर दुसरीकडं गल्लीच्या एका बाजूच्या उकिरड्यावर दोन उंदीर आणि दोन घुशी मस्तपैकी ताव मारताहेत. एक मूषकसंहारक गल्लीच्या दुसऱ्या टोकाला जातो. बरोब्बर नेम धरून उंदीर-घुशींवर दांड्याचा ठोका मारतोय. एका फटक्यात एक उंदीर जागीच ठार. उरलेल्या तीन उंदीर-घुशींची पळापळ सुरू आहे.
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये उंदीर मारण्याचा हा एक प्रकार आहे.
आता हे सांगण्याचं कारण मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. आता जेव्हा अशा बातम्या येतात तेव्हा एकतर उंदरांना मारताना पण हे घोटाळे करतात म्हणून डोक्याची शीर उठते हे एका बाजूला. पण या उंदीर मारण्याची प्रक्रिया कशी चालते याचे प्रश्न पडतात दुसऱ्या बाजूला. आधी काय काय प्रश्न पडतात ते बघा.
१. हे उंदीर मारतात कसे
२. मारल्यावर यांचं करायचं काय
३. आणि मारलेले उंदीर मोजायचे कसे
तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वर वाचलेलंच आहे. ते म्हणजे उंदीर पळवून पळवून मारणे हा उंदीर मारण्याचा पहिला प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारात उंदराला कोंडून मारतात. तर करायचं असं कि, झोपडपट्टी किंवा जिथं हमखास उंदीर सापडतात तिथं पालिकेतर्फे पिंजऱ्यांचा पुरवठा केला जातो.
रात्रीच्या वेळेस पिंजऱ्यात चपातीचा तुकडा किंवा सुकी मासळी पिंजऱ्यातील काट्याला अडकवली की या पदार्थाच्या वासाने सकाळपर्यंत एक-दोन मोठे उंदीर-घुशी सापळ्यात अडकणारच. पिंजरा दिलेल्या घरी सकाळी मुषकसंहारक पोहचतात. उंदीर कसे मारले जातात पाहायला एव्हाना घराच्या बाहेर माणसांचा गराडा जमलेला असतो. मुषकसंहारक नेहमीच्या सफाईदारपणाने पिंजऱ्यात हात घालतो आणि शेपटीला पकडून दणकन उंदीर जमिनीवर आपटतो. आणि इथं उंदरांचा खेळ खल्लास.
तिसरा प्रकार विष घालून मारण्याचा. हा प्रकार जालीम वाटतो तितकाच तितकाच धोकादायक आहे. यात उंदरांचा नायनाट करण्यासाठी घरमालकाला अॅल्युमिनिअम फॉस्फेट, झिंक फॉस्फेट किंवा ब्रोमाडिऑलिन दिल जात. चपाती किंवा भातात ते कालवून त्याचे गोळे ठिकाणावर ठेवले कि उंदीर त्याचा फडशा पडतात आणि तुम्हाला उंदरांचे मुडदे घावतात.
२. मारल्यावर यां उंदरांचं करायचं काय
तर रोज मोठ्या संख्येने मारलेल्या उंदरांची विल्हेवाट लावण्याचे काम डंम्पिंग ग्राऊंडमध्ये केल जात. डम्पिंगमध्ये खोल खड्डा खणून त्यात सर्व उंदीर टाकले जातात. त्यावर माती आणि कचऱ्याचा थर टाकून उंदीर गाडले जातात.
आणि ३ रा आणि शेवटचा प्रश्न मारलेले उंदीर मोजायचे कसे ?
पालिका जवळ जवळ ४० ते ५० वर्षांपासून अशा प्रकारे उंदीर मारण्याचे काम करते आहे. पालिकेचा मूषक संहारक या उंदरांचा यमदूत असतो. पालिकेच्या सेवेत असलेल्या मूषक संहारकांना रोज किमान ३० उंदीर मारण्याची अट असते. कधीकधी काही कर्मचाऱ्यांना कमी उंदीर घावले कि ते मेलेल्या उंदरांची आपापसात देवाण-घेवाण करून किंवा एखाद्या दिवशी जास्त उंदीर मारून वेळ भरून काढतात. सलग पाच वर्षे रात्रपाळीत उंदरांच्या संहाराचे काम केल्यानंतर संबंधित मूषक संहारकांना दिवस पाळीत काम दिले जाते. या नियमानुसार सुमारे ३३ मूषक संहारकांची आता दिवसपाळीत नियुक्ती करण्यात आली आहे.
एक उंदिर मारण्यासाठी २० रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास २२ रुपये या दराने उंदिर मारले जातात.
हे हि वाच भिडू
- डिस्नेच्या स्टुडियोत उंदीर पळापळ करतांना पाहून त्याला मिकी माऊस सुचला.
- उंदीर यही जमाएंगे !!
- पालक खाऊन नाद्याबाद कामं करणारा पोपॉय खऱ्या आयुष्यात होऊन गेलाय