सेनेविरोधात बोललं की दरवेळी BMC कारवाई करते, हा निव्वळ योगायोग समजावा 😂

“मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” हा पिक्चर आठवतो का? या पिक्चरमध्ये एक सीन आहे. दिनकर भोसले आपलं घर विकण्यास नकार देतात तेव्हा बिल्डरच्या सांगण्यावरून BMC वाले त्यांच्या घराचं पाणी बंद करतात.

सर्व्हे आणतात आणि इमारत धोकादायक ठरवतात. पिक्चरमध्ये दाखण्यात येणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात अस आम्हाला लहानपणापासून सांगितलं जायचं. पण हल्लीचं जग बघितलं की सगळं काही खरंखुरं असतं असच वाटायला लागलय.

आत्ताचं लेटेस्ट उदाहरणं घ्यायचं झालं तर कंगणाचं घेवुया. कंगना आणि बॉलिवूडची घराणेशाही, कंगना विरुद्ध राऊत आणि आत्ता कंगना विरुद्ध शिवसेना अस या वादाचं स्वरुप. वाद पेटला आणि काल BMC अर्थात बृह्नमुंबई महानगरपालिकेने कंगनाचं ऑफिस अनधिकृत ठरवून पाडकाम उरकून घेतलं.

कालचा वाद लेटेस्टचं आहे, लोक म्हणतील अनधिकृत आहे तर पाडलचं पाहीजे. पण हे दरवेळी होतं. अगदी योगायोगाने होतं अस म्हणलं तरी चालेल. शिवसेनेच्या विरोधात बोललं की BMC लगेच हात धुवून मागे लागते. 

 

कपिल शर्मा : 

९ सप्टेंबर २०१६ ची सकाळ.

“मी १५ कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला तरीही आपल्या ऑफिससाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा” आरोप कॉमेडीयन कपिल शर्मा यानं ट्विटरवरुन केला. विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच टॅग करून, ‘हेच का तुमचे अच्छे दिन?’ असंही त्यानं खोचकपणे विचारलं होतं. त्यामुळे हे ट्विट वेगानं ‘व्हायरल’ झालं आणि चर्चेला उधाण आलं.

महापालिकेने त्याच दिवशी रात्री त्याचं ट्विट त्याच्यावरचं उलटवलं. ज्या ऑफिसच्या बांधकांमासाठी कपिलनं लाच मागितल्याचा आरोप बीएमसीवर केला ते मुळ बांधकामचं बेकायदेशीर असल्याचे सांगितलं.

विषेश म्हणजे यावेळी मनसेने देखील शिवसेनेला साथ दिली. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कपिल शर्मांचा समाचार घेतला. “कपिल शर्मा यांनी योग्य पुरावे न दिल्यास त्यांना मुंबईत शूटिंग करू दिलं जाणार नाही”, असं खोपकर यांनी ठणकावलं होतं.

त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात बीएमसीनं कपिल शर्माच्या हातात यासंदर्भातील नोटीस ठेवली. गोरेगाव येथील ‘डीएचएल एनक्लेव्ह’मध्ये नवव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे, तसेच कॉमन पॅसेज आणि पार्किंग पोडियमचा काही भाग अनधिकृतपणे एकत्रित करण्यात आल्याने, हे बांधकाम भोगवटा प्रमाणपत्राशी विसंगत आहे, असे म्हणत महापालिकेने कपिल शर्माला मुंबई पालिका कायद्याच्या कलम ३५१ अंतर्गत नोटीस बजावली. ‘डीएचएल एनक्लेव्ह’चे काही बांधकाम बेकायदेशीर असल्याने ते पाडावे लागेल, असे नोटीसमध्ये म्हटले.

मात्र कपिल शर्माने या नोटीसला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्याला दिलासा मिळाला आणि तात्पुरते हे बांधकाम पाडणे लांबणीवर पडले. पुढे उच्च न्यायालयाने देखील कपिलला दिलासा दिला. कालांतराने यासंबंधीच्या बातम्या येणं बंद झालं.

आर जे मलिष्का :

जुलैच्या २०१७च्या पंधरवड्यात मुंबईत जसा पाऊस वाढत गेला तसे रस्त्यावर खड्डे वाढतं गेले असा आरोप करत रेड एफएमची आरजे मलिष्का हिने ‘सोनु बीएमसीवर तुझा भरौसा नाय का?’ म्हणत गाण्यातुन टीका केली होती. हे गाणं त्यावेळी तुफान व्हायरल झालं होतं.

त्यानंतर अवघ्या चार दिवसाच्या आतचं १८ जुलै २०१७ ला तिच्या घरात डेंग्युचे आणि मलेरियाचे डास पाळल्याचे आरोप करत मुंबई महापालिका कायदा ३८१ अंतर्गत तिला नोटीस देण्यात आली. तसेच तिच्या घरी सफाई विभागाचे कर्मचारी पाठवून कारवाई देखील करण्यात आली होती.

महापालिका एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे जून २०१९ मध्ये आरजे मलिष्काला पालिका अधिकाऱ्यांनी उपदेशाचे डोस पाजले होते. पालिका दररोज सव्वा कोटी मुंबईकरांच्या नागरी सुविधांची कामे करते. ही कामे खूप मेहनतीची असतात. त्यामागे कर्मचाऱ्यांचे अफाट कष्ट असतात. आधी ही कामे समजून घ्या, नंतरच टीकेचे बाण सोडा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी मलिष्काला समज दिली होती.

या सगळ्यानंतरही मलिष्का थांबली नाही. तिनं त्याच वर्षात देखो चाँद आया हे गाणं म्हणतं पुन्हा एकदा मुंबईच्या खड्ड्यांवर टीका केली होती. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, चंद्रावर जसे खड्डे आहेत, तसेच खड्डे आता मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीत दिसत आहे. असं तिनं म्हटलं होतं.

कंगना राणावत :

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’मधील बातमी ट्विटरवर शेअर करून ३ सप्टेंबर रोजी कंगनानं संजय राऊत यांच्यावर टीका केली आणि मुंबईची ‘पाकव्याप्त काश्मीर’शी तुलना केली. त्यानंतर राम कदम, अवधुत वाघ आणि अगदी अमृता फडणवीस या देखील कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले.

मात्र आमची मुंबई हा हॅशटॅग ट्रेन्ड होताच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या प्रकरणाशी भाजपचा संबंध नसल्याचं सांगितलं. त्यानंतर कंगणानं मुंबईत येवू नये असं तिला सोशल मिडीयावरुन सांगण्यात आलं.

पण मुंबई, महाराष्ट्र किसी के बाप का नहीं, असं म्हणत तिनं संजय राऊत आणि शिवसेनेला खुलं आव्हान दिलं. “मै नौ तारिख को मुंबई आ रही हो उखाड ना है उखाडलो असं म्हणत कंगना आणखी सिरीयस झाली.

इकडे लगेच बीएमसी एक्शन मोडमध्ये आली. त्यांनी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकानं कंगनाच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यात काही बांधकाम सुरू असल्याचे आढळले. त्यानंतर पालिकेने कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई करून हातोडा चालवला, बाकी जे काही चालु आहे ते तुमच्या समोरच आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.