पोरांनो पेपर सुरु होतायत, कॉपीचा इत्तुसा पण किडा डोक्यात असेल तर आधी हे वाच…

काही दिवसांपूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं बघा. परीक्षा ऑनलाईन घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. काय राडा झाला होता राव तेव्हा. पण बोर्डाने काही त्यांचं ऐकलेलं नाहीये आणि परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. १५ मार्चपासून परीक्षा होणार असल्याने आता विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ‘खतरेकी घंटा’ वाजायला लागलीये. दहावीचे विद्यार्थी तरी त्यातल्या त्यात सुखी म्हणावे लागतील. कारण त्यांची परीक्षा थोडी उशीरा असून आधी नंबर लागलाय तो ‘बीबी’ चा. म्हणजेच ‘बिचाऱ्या बारावीच्या पोरांचा’.

राज्यभरात जोमात बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र विद्यार्थी फुल्ल टेन्शनमध्ये आहेत. जुने दिवस परत आलेत ना! पण… जुन्या दिवसांसोबत जुने कांडपण परतलेत भावांनो. परीक्षा म्हटलं की पेपरफुटी, चीटिंग, कॉपी यांच्या देखील बातम्या आल्याचं. तेच झालंय. नुकतंच बारावीच्या एचएससी बोर्डाचा पेपर फुटल्याच्या बातमीने हेय मोठा धुमाकूळ घातला.

मात्र आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पेपर लीक झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. तर हे ‘कॉपीचं प्रकरण’ असल्याचं सांगितलं आहे.

तेव्हा परीक्षेत कॉपी केली तर काय कार्यवाही होते? कोणते गुन्हे लागतात? हे जाणून घेणं गरजेचं झालंय. पण त्यासाठी हे बारावीचं प्रकरण आधी जाणून घेणं गरजेचं. तेव्हाच सगळा मामला नीट समजणारेय.

१२ मार्चला बारावीच्या विज्ञान शाखेचा रसायनशास्त्राचा म्हणजेच केमिस्ट्रीचा पेपर होता. मुंबईमध्ये एका सेंटरवर परीक्षेसाठी विद्यार्थी दाखल झाले. मात्र एका मुलीला यायला उशीर झाला. जेव्हा ती सेंटरवर अली तेव्हा ती खूप घाबरली होती. आता परीक्षकांनी ओळखलं की, ही काही नेहमीसारखी परीक्षेची भीती नाहीये. मग त्यांनी जरा जमूनच चौकशी घेतली. तेव्हा समोर आलं की, त्या मुलीच्या व्हॉट्सअपवर आधीच केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका आली आहे.

मग काय, प्रश्नपत्रिका फुटली अशी एकच बोंब पसरली. मात्र तपासात आढळलं की, विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वरचे फोटो १० वाजून २४ मिनिटांचे आहेत. तर १० वाजून २० मिनिटांपर्यंत प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. तेव्हा हे पेपर लीकचं प्रकरण नसून कॉपीचं आहे. कारण प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर व्हॉट्सअपवर पेपर आढळला आहे, असं पोलिसांनी सांगितलंय.

संबंधित विद्यार्थिनी उशिरा आल्याने हे कॉपीचं प्रकरण म्हणून गुन्हा नोंदवला आहे. शिवाय मलाड या ठिकाणाहून एका खासगी कोचिंग क्लासच्या मालकाला आणि शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका कशी आली आणि किती विद्यार्थ्यांना पेपर पाठवला, याची चौकशी सुरू असल्याचंही पोलिसांना सांगितलंय.

याप्रकरणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आता कॉपीचं प्रकरण म्हणून पुढची कार्यवाही होणारेय. तेव्हा नक्की कॉपी केल्यावर काय कायदे लागू होतात? हे आता आपण जाऊन घेऊ…

महाराष्ट्र परीक्षा मंडळाने कॉपी काय असते? याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. त्यामध्ये कोणताही विद्यार्थी चिठी वगैरेद्वारे पेपर सोडवत असेल, मित्राकडून उत्तरं घेत असेल किंवा त्यांना पुरवत असेल तर त्याला कॉपी म्हटलं जातं. शिवाय आता यात डिजिटल माध्यम देखील आलंय. जर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या माध्यमातून कुणी उत्तरं बघताना, कुठे पाठवताना सापडलं तर त्यालाही कॉपी असं ग्राह्य धरल्या जाईल.

कुणी कॉपी करताना सापडलं तर त्यांना आधी फक्त डीबार केल्या जायचं. मात्र आता फौजदारी गुन्हा देखील विद्यार्थ्यांवर दाखल होण्याची तरतूद करण्यात आलीये. काय नक्की कायदा आहे,

याबद्दल HSC बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी बोल भिडूने संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं…

मंडळ शिक्षा सूचीनुसार त्यावर कारवाई केली जाते. कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास जास्तीत जास्त ६ परीक्षा विद्यार्थ्याला देता येत नाही. शिवाय जर डिजिटल डिव्हाइसेसचा वापर करून कॉपी केली असेल तर सायबर गुन्ह्यानुसार कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. पोलिसांच्या आणि बोर्डाच्या तपास अधिकारांच्या चौकशीत विद्यार्थी चुकीचा सिद्ध झाला, तर सहा महिने ते १ वर्ष कारावास होऊ शकतो.

या संदर्भात आम्ही ऍडव्होकट सौरभ सदावर्ते यांच्याशी बोललो, त्यांच्या माहितीनुसार…

कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्याला डिबार केलं जातं. त्यासाठी आधी विद्यार्थ्याला नोटीस दिली जाते. त्याची सुनावणी असते. बोर्डातर्फे तारीख दिली जाते आणि त्यावेळी विद्यार्थी वकीलामार्फत किंवा स्वतः तिथे बाजू मांडू शकतो. मग ते ठरवतात की पुढची प्रक्रिया काय असणार.

तर कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्वरित काय कारवाई होते, याबद्दल बीड जिल्हापरिषदचे शिक्षक श्रीकांत घोडके यांनी सांगितलं…

विद्यार्थ्याला ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं की, कोणत्या प्रकारे ते कॉपी करत होते, कुणी पकडलंय. नंतर ते लिखित पत्र संबंधित विद्यार्थ्याच्या पेपरला जोडून बोर्डाकडे पाठवलं जातं. त्यानंतर तपासात जर विद्यार्थी दोषी सापडला तर बोर्डाच्या कायद्यानुसार त्यांना ठराविक परीक्षांसाठी रस्टीगेट केलं जातं.

तर उत्तर पत्रिका किंवा पुरवणी चोरणे, पेपर लीक करणे, पर्यवेक्षकाला गंभीर परिणामांची धमकी देणे किंवा उत्तरपत्रिकेवर अपशब्द लिहिणे यामुळे देखील तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

अशाप्रकारे सगळं आहे बघा भावांनो…

तेव्हा आता तुम्ही किंवा तुमचे कुणी प्रियजन पेपरला जातायेत तर कॉपी करण्याआधी शंभर वेळा विचार करा. पण विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे, जितकं येतं तितकं लिहा. पास तर होणारच आणि नापास झालात तरी फुल्ल इज्जतीत होणार. एक मात्र नक्की, अभ्यासाला पर्याय अभ्यासच!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.