परवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला

प्रत्येक कलाकाराचे फॅन असतात. हे फॅन आपल्या आवडत्या कलाकारांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक दिसावी म्हणून कधी त्याच्या घराजवळ हे फॅन तासन् तास उभे असतात. तर कधी कोणतीही पर्वा न करता घर सोडून कलाकारांना भेटण्यासाठी असे वेडे फॅन्स लांबचा प्रवास करून येतात. आत्ता सोशल मीडियामुळे आपल्याला आपल्या आवडत्या कलाकराशी थेट संवाद साधता येतो.

परंतु आधीच्या काळात मात्र असं नव्हतं. तेव्हा योग असेल तर आपल्या आवडत्या कलाकाराला थेट भेटणं किंवा पत्रांच्या माध्यमातून संवाद साधणं इतकंच फॅन्स करू शकत होते.

ही गोष्ट त्याच काळाची… जेव्हा एका माणसाने परवीन बाबीचा फोटो मॅगझिन मध्ये बघितला आणि तिला भेटण्यासाठी हा माणूस ऑस्ट्रेलियाहून थेट भारतात आला.

हा माणूस म्हणजे बॉब ख्रीस्तो.

इतकंच बॉब ख्रीस्तो यांची ओळख नाही. तर हिंदी सिनेसृष्टीत जवळपास २०० सिनेमांमध्ये बॉब यांनी खलनायकी भूमिका साकारल्या. हा अंगापिंडाने मजबूत असलेला विदेशी माणूस भारतीय सिनेमांत खलनायकी भूमिकांमध्ये इतका चपखल शोभला, की त्याकाळच्या बहुतेक सिनेमांमध्ये बॉब ख्रीस्तो यांची छोटीशी का होईना भूमिका असायची.

बॉब ख्रीस्तो यांचं मूळ नाव रॉबर्ट जॉन ख्रीस्तो.

बॉब ऑस्ट्रेलियन नागरिक आणि पेशाने सिव्हिल इंजिनियर. बॉबचं बालपण जर्मनी देशात झालं. बॉब लहान होता त्यावेळी जर्मनीमध्ये दुसरं महायुध्द सुरू होतं. पण अभिनयाची आवड बॉबला स्वस्थ बसू देईना.

बॉबने जर्मनीमध्ये फावल्या वेळात रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. तिथेच एका नाटकादरम्यान त्यांची एका मुलीशी ओळख झाली. तिचं नाव हेल्गा. दोघांनी लग्न केलं. परंतु काहीच वर्षांमध्ये गाडीच्या मोठ्या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचं निधन झालं.

यानंतर बॉब यांनी त्यांच्या तीन मुलांना एका अमेरिकन जोडप्याला सांभाळायला दिले.

पुढे सैनिकी कामामुळे बॉब व्हिएतनामला गेले. खूपदा शत्रू सैन्याने जमिनीत काही शस्त्र किंवा काही दारूगोळा लपवलेला असतो. त्यामुळे आपल्या सैन्याला अपाय होऊ शकते. असा दारूगोळा शोधून तो नष्ट करण्याची जोखीम बॉबवर होती.

कामाच्या व्यापात बॉबने अनेक देश पालथे घातले.

हाँगकाँग, ओमान, दक्षिण आफ्रिका वैगरे वैगरे. काम करता करता एका मॅगझिनमध्ये त्यांनी परवीन बाबीचा फोटो पाहिला.

परवीन बाबीचा सुंदर आणि मनमोहक फोटो पाहिल्यानंतर बॉब तिचे दीवाने झाले.

परवीन बाबीला भारतात जाऊन काहीही करून भेटायचं, ही इच्छा त्यांच्या मनात डोकावली. या दरम्यान त्यांना ओमान देशात नोकरी मिळणार होती. ऑफर लेटर यायला काही दिवसांचा अवधी बाकी होता. ते मिळेपर्यंत भारतात एक चक्कर मारावी या हेतूने बॉब जे भारतात आले, ते कायमचे इकडचेच झाले.

मुंबईत आल्यावर या शहराबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटू लागली.

चर्चगेटला फेरफटका मारताना एका सिनेमाच्या युनिट सोबत त्यांची गाठ पडली. त्या युनिट मधील एक कॅमेरामन पुढच्याच दिवशी ‘द बर्निंग ट्रेन’ सिनेमाच्या सेटवर परवीन बाबीला भेटणार होता. बॉबने कॅमेरामनशी बोलून शूटिंगचा पत्ता विचारला. पत्ता मिळताच बॉब शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला.

तिथे पोहोचल्यावर शूटिंगचा मोठा तामझाम होता. आणि अचानक बॉबसमोर परवीन बाबी आली. तिला पाहताच बॉब गडबडीत मॅगझिनचा फोटो दाखवून तिला म्हणाला,

“तुम्ही परवीन बाबी नाही आहात.. या फोटोमध्ये असणारी तरुणी परवीन बाबी आहे. मी तिला शोधतोय.”

जिच्यासाठी बॉब इतका दूरवर आला होता तिला पाहताच पहिल्याच भेटीत बॉब असं बोलून गेला. परवीन बाबी बॉबचं म्हणणं ऐकून हसली आणि म्हणली,

“या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती मीच आहे. आणि मी २४ तास मेकअप मध्ये नसते. मेकअप नसताना मी इतकी वाईट दिसते की तुम्ही मला ओळखलं नाही?”

परवीन बाबीने बॉबची फिरकी घेतली.

या अशा आगळ्यावेगळ्या पहिल्या भेटीत दोघांची एकमेकांशी मैत्री झाली. परवीन बाबीच्या मदतीने बॉबला हिंदी सिनेमांमध्ये कामं मिळू लागली. दोघेही अनेक वर्ष एकमेकांचे शेजारी होते.

परवीन बाबीचं जेव्हा दुर्दैवी निधन झालं, तेव्हा बॉबला धक्का बसला होता.

बॉबचा पहिला सिनेमा १९८० साली आलेला ‘अब्दुल्लाह’. संजय खान सिनेमाचे दिग्दर्शक होते. यानंतर जवळपास २०० पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये बॉबने अभिनय केला. त्यांना मिळालेल्या सर्व भूमिका या खलनायकी होत्या. त्यांनी दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सुद्धा काम केले. ‘मिस्टर इंडिया’, ‘कुर्बानी’,‌ ‘मर्द’, ‘गुमराह’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये बॉबने साकारलेल्या भूमिका गाजल्या.

‘भारताने मला खूप काही दिलं आहे. मला इथेच राहून मरायला आवडेल.’

असं बॉब मुलाखती मध्ये वारंवार म्हणायचे. झालंही तसंच…

२० मार्च २०११ रोजी बँगलोर येथे बॉब यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतःच्या खलनायकी भूमिकांनी बॉलिवुड गाजवणाऱ्या आणि भारतावर निस्सीम प्रेम असणाऱ्या बॉब ख्रीस्तो यांना सलाम !

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.