भारतीय गडी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला असता मात्र ट्रम्प तात्यांनी त्याचा पत्ता कट केला
आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरु आहे. वारं बघितल तर सध्याचे सिटींग राष्ट्राध्यक्ष डोनू तात्या ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे पावसात भिजणारे ज्योदादा बायडेन यांचे वारू सध्या जोरात धावत आहेत. ते आणि त्यांची उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार कमलाताई हॅरीस यांच्या विजयाच्या शक्यता आहेत. कमला ताई यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्या जर जिंकल्या तर एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या पुढारी ठरतील.
एवढी मोठी महत्वाकांक्षा असणाऱ्या मात्र त्या पहिल्या नाहीत. यापूर्वी एक भारतीय गडी होता ज्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दावा सांगितला होता.
त्याच नाव बॉबी जिंदाल
खर नाव पियुष जिंदाल. आईवडील दोघेही मुळचे पंजाबचे. दोघेही इंजिनियर. अमर जिंदाल आणि त्याची पत्नी राज या दोघांनीही आपली चंडीगड विद्यापीठातील नोकरी सोडली आणि त्याकाळातील इंजिनियरची परंपरा राखत अमेरिकेकडे चढाई केली.
तिथल्या लुइझाना राज्यात ते सेटल झाले. दोघेही प्रचंड हुशार होते. त्यांना आल्या आल्या भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. त्यांच्या मुलाचा म्हणजेच पियुषचा जन्म तिथेच अमेरिकेत झाला. अमेरिकन ड्रीम त्याला लहानपणापासून पडत होते. तो वाढला देखील एका अमेरिकन मुलाप्रमाणे.
शाळेत असताना पियुष हुशार म्हणून फेमस होता. पण त्याच नाव त्याच्या मित्रांना उच्चारता यायचं नाही. त्याकाळी टीव्हीवर ‘द ब्रेडी बंच’ नावाची एक सिरीयल लागायची. पियुषला ती प्रचंड आवडायची. या सिरियलमध्ये एक बॉबी नावाच कॅरेक्टर होतं. पियुषने त्याचं नाव स्वतःसाठी घेतलं.
तेव्हा पासून तो बॉबी जिंदाल म्हणूनच ओळखला जाऊ लागला.
बॉबीला सुरवातीपासून राजकारणात इंटरेस्ट होता. त्याचा ओढा रिपब्लिकन विचारांकडे होता. कॉलेजमध्ये असतानाच तो त्या पक्षाच्या विद्यार्थी चळवळीमध्ये ओढला गेला. वेगवेगळ्या डिबेट स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा. बॉबीची निवड ऑल युएसए अकॅडमीक टीममध्ये झाली होती.
त्याच ग्रॅज्युएशन जरी मेडिकल फिल्ड मध्ये झालं असल तरी पुढे राजकारणात उतरायचं म्हणून त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. तिथे पोलिटिकल सायन्स विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तिथच डॉक्टरेट करण्याचा चान्स होता मात्र परत अमेरिकेला आला.
परत आल्यावर त्याने तिथले खासदार जिम मॅकार्थी यांच्या कडे इंटर्नशिप केली.
तेव्हा त्याने केलेलं हेल्थ्केअर सेक्टरमधील काम मकार्थी यांना प्रचंड आवडल. त्यांनी बॉबीची ओळख लुइझाना राज्याच्या गव्हर्नरकडे करून दिली. त्यांनी बॉबी जिंदालचे प्रेझेन्टेशन पाहिलं, त्यांना ते प्रचंड आवडल.
काही दिवसातच फक्त २४ वर्षाच्या बॉबीकडे अख्ख्या लुइझाना राज्याच्या हेल्थकेअर डिपार्टमेंटची जबाबदारी देण्यात आली. त्याने ती अपेक्षेपेक्षाही जास्त चांगली सांभाळून दाखवली. यापूर्वी ४०० मिलियन डॉलर रुपये तोट्यात असलेल्या हेल्थकेअर आणि हॉस्पिटल डिपार्टमेंटला २२० मिलियन डॉलर फायदा मिळवून दिला.
मेडिकल फिल्डमधील जीनियस म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.
त्याला अमेरिकेतील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. तिथून अगदी वेगात त्याने राजकीय प्रगतीच्या शिड्या चढण्यास सुरवात केली. फक्त लुइझाना राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणात त्याचा शिरकाव झाला.
जेव्हा जॉर्ज बुश यांच्या रूपाने रिपब्लिकन पार्टीची देशात सत्ता आली तेव्हा त्याची निवड हेल्थ केअर विभागाचा राज्यमंत्री म्हणून झाली. राष्ट्रपती जॉर्ज बुश देखील त्याच्या कामामुळे इम्प्रेस झाले होते. पण बॉबीच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या. त्याने काही वर्षातच या पदाचा राजीनामा दिला आणि लुइझाना राज्याच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी परत आला.
२००३ साली त्याने पहिल्यांदा लुइझाना प्रांताची निवडणूक लढवली.
त्यावेळी त्याची लोकप्रियता अतिशय शिखराला पोहचली होती मात्र विरोधकांनी त्याच्या धर्मावरून खोटा प्रचार केला आणि त्यात बॉबी जिंडला निवडणूक हरला. या पराभवानंतर त्याने आपण कॉलेजमध्ये असतानाच हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचे जाहीर केले.
याचा परिणाम कट्टर ख्रिश्चन रिपब्लिकन मतदारांनी २००७ सालच्या निवडणुकीत त्याला भरघोस मतदान दिले. लुइझाना राज्यातून बॉबी जिंदाल गव्हर्नर म्हणून निवडून आला. वयाच्या ३३ व्या वर्षी संपूर्ण अमेरिकेतला तो सर्वात तरुण गव्हर्नर बनला होता.
गव्हर्नरपदी निवड होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती होते. भारतीयांच्या बद्दल असणारे सगळे समज गैरसमज त्यांनी मोडून काढले. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्यामध्ये त्याचं नाव घेतल जात होतं.
बॉबी जिंदालची पहिली टर्म प्रचंड गाजली. त्याने घेतलेले अनेक निर्णय देशभरात नावाजले गेले. याचाच परिणाम त्याने २०११ साली सलग दुसऱ्यांदा लुइझानाचे गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली. यावेळी त्यांच्या मतांमध्ये वाढच झाली होती.
२०१२ सालच्या टाईम मॅगझीनच्या फ्रंट पेजवर त्यांचा फोटो झळकला होता. रिपब्लिकन पक्षाचे भविष्यातील अच्छेदिन हाच आणणार असा आशावाद त्यांनी दाखवला होता.
त्याकाळात अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे राज्य आले होते. बराक ओबामा पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले होते. आजवरचा वर्णभेदाचा स्टेरीओटाईप मोडण्यात त्यांना यश आले होते. मात्र अगदी त्यांच्याप्रमाणेच बॉबी जिंदाल यांची वाटचाल वेगाने होत होती. ओबामा यांच्यानंतर पुढच्या निवडणुका २०१६ ला होणार होत्या.
बॉबी जिंदाल यांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली. एक भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेचा अध्यक्ष होऊ पहात होता.
अमेरिकेत दोन पक्ष आहेत आणि त्यांची पक्षात देखील लोक्साहाही आहे. जर तुम्हाला निवडणुका लढवायच्या असतील तर उमेदवारी तुम्ही कोणत्या घराण्यातील आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही पक्षाध्यक्षांचे किती लाडके आहात यावर ठरत नाही तर तुम्ही प्रायमरी निवडणुकीत किती मते मिळवता यावर ठरते.
बॉबी जिंदाल यांनी प्रायमरीसाठी रिपब्लिकन पक्षातून आपली उमेदवारी दाखल केली. ते हि निवडणूक लढवणार याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरु होत्या. त्यांच्याबद्दल लोकांच्यात, पक्षात चांगले मत देखील होते. पण हा उत्साह फार काळ टिकला नाही.
अचानक पक्षाबाहेरून आलेला मोठा उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उमेदवारी दाखल केली. सुरवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढ ले, त्याची भरपूर चेष्टा केली. पण ट्रम्प तात्या तयारी आले होते. त्यांनी आपल्या वेड्या वाकड्या वक्तव्यांनी निवडणुकीत धमाल आणली. त्याने कट्टर मुस्लिम विरोधी, कृष्णवर्णीय विरोधी गोर्या ख्रिश्चन मतांना हात घातला. त्यांना हा आपला तारणहार आहे असच वाटू लागल.
अगदी काही दिवसात डोनाल्ड ट्रम्पची लाट सगळ्या देशभर पसरली. बॉबी जिंदल या लाटेत वाहून गेले. त्यांना आपला जोरदार पराभव होणार आहे हे आधीच लक्षात आले. जिंदाल यांनी प्रायमरी निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली आणि सिनेटर टेड क्रूज यांना पाठिंबा दिला.
प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या भारत विरोधी विधानामुळे त्याच्यावर जिंदाल यांनी अत्यंत विखारी हल्ला चढवला होता. ट्रम्प हा स्वतःच्या प्रेमात पडलेला अहमन्य पागल माणूस आहे अस बेधडक विधान त्यांनी केलं होतं.
पण कितीही प्रयत्न केले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रायमरी जिंकली, बघता बघता प्रेसिडेंट पदाच्या निवडणुकीला जाऊन पोहचले. त्यावेळी मात्र बॉबी जिंदाल यांनी थोड्या नरमाईची भूमिका घेऊन नवीन स्टेटमेंट जाहीर केले,
“दोन खराब व्यक्तींमध्ये त्यातल्या त्यात एकजणाची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करायची झाली तर हिलरीपेक्षा मी ट्रम्पची निवड करेन”
सगळे जग जे होऊ नये म्हणून पाण्यात देव घालून बसले होते ते खरे ठरले. डोनाल्ड तात्या ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनले.
गेल्या चार वर्षात त्यांनी अनेक पराक्रम केले, असंख्य बडबड केली. पण काहीही झाले तरी एक मान्य करावे लागेल कि ट्रम्प हा राजकारणात अत्यंत हुशार माणूस आहे. त्याने जिंदाल यांनी आपल्या विरोधात केलेली वक्तव्ये कधीही विसरली नाहीत. मध्यंतरी जेव्हा त्याच्या मंत्रीमंडळात आरोग्य मंत्रीपदाची जागा रिकामी झाली होती तेव्हा पक्षाने बॉबी जिंदाल यांचे नाव पुढे केले तेव्हा गोड बोलून ट्रम्पने त्यांच्या नावावर फुली मारली.
बॉबी जिंदाल यांनी ट्रम्पविरोधात केलेल्या प्रचाराचा फटका त्यांना भरपूर बसला. एकेकाळी पक्षात राष्ट्राध्यक्ष पदाचा युवा नेता म्हणून त्यांची हवा होती आज ते राजकारणाच्या चर्चेत कुठेच नाहीत.
आपल्या इथ सरपंचपदापासन ते पंतप्रधानपदापर्यंत निवडणुकीतअसे किस्से आपण नेहमी बघत असतो. आपल्याच पक्षात कोण विरोधक तयार होऊ लागला तर बरोबर त्याला संपवण्याची खेळी आपल्या इथले नेते बारशातच शिकून आलेले असतात. पण सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प भारतीय नेत्यांकडूनच हे शिकले आहेत अशी देखील चर्चा आहे.
हे हि वाच भिडू.
- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं मोनिका लेविन्सकी प्रकरण कसं बाहेर आलं ?
- ओबामांचा सुद्धा पराभव झालेला. बायकोने राजकारण सोडायचा सल्ला दिला होता.
- अमेरिकेच्या लोकशाहीत गाढव निवडून आले.
- नगरचा साखरसम्राट आफ्रिकेतल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला असता.