अन प्रेक्षकांच्या प्रेमाने यंत्रमाग कामगाराच्या पोराची हलगी पाकिस्तानातही वाजली…
गाणाऱ्याची अन लिहिणाऱ्याची कीर्ती ज्याची त्यालाच साजली
अन प्रेक्षकांच्या प्रेमाने साजनची हलगी पाकिस्तानातही वाजली…..
वरच्या शीर्षकावरून तुम्हाला कळल असेल की गाणं कुठलं आहे. सोशल मिडीयावर लाखोंच्या संख्येने हिट्स मिळवणारं बोल में हलगी बजावू क्या…
गेल्या दशकातील सर्वोत्तम लोकगीतांमधून निवड करायची झाल्यास ‘ बोल में हलगी बजावू क्या ‘ या लोकगीताचा क्रमांक फार वरचा लागतो. ह्या लोकगीताने त्यावेळी जो धिंगाणा घातला होता तो सगळ्या महाराष्ट्राने पहिला होता. महाराष्ट्रातल्या घराघरात हे गाणं लहान थोरांच्या तोंडपाठ झालं होतं.- गणपती उत्सव, दहीहंडी , नवरात्र , लग्न समारंभ, हळद, वरात असा एकही प्रसंग नसेल जिथ हे गाणं वाजलं नसेल. या लोकगीताने आधी हिट असलेल्या अनेक लोकगीतांच्या रांगेत स्थान मिळवलं.
इचलकरंजीत राहणाऱ्या माग कामगारांच्या मुलांनी हे गाणं बनवलं. ती म्हणजे साजन-विशाल आणि सागर बेंद्रे या तिघांनी. सागर बेंद्रे यांनी हे गाणं लिहिलं आणि साजन- विशाल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं ,साजन बेंद्रे यांनी ते गायलं.
मराठी आणि हिंदी भाषा मिश्रित असलेलं हे गाणं विनोदी पद्धतीने या जोडीने प्रेक्षकांसमोर सादर केलं. गाण्याची हुक लाईन प्रेक्षकांच्या मनात एकदम फिट्ट बसते. या गाण्याचा एक अंतरा
सुबह तुझको मिलना तो मै आज पहाटचं ऊठ गया
और तुझसे मिलते समय हालगी बजाते बजाते मेरा टिपरूच तुट गया……
गाण्यात संबळ मिश्रित ठेका आणि हलगी या वाद्याचा वापर करण्यात आला होता. आजवर ढोलकी आणि इतर तालवाद्यांचा वापर गाण्यात केला जायचा मात्र या गाण्यात हलगीचा रिदम नाचायला भाग पाडतो.
ज्यावेळी हे गाणं सुमित कंपनीने रिलीज केलं त्यानंतर लोकगीत विश्वात एकूण ५८ लोकगीते आली पण बोल में हलगी बजावू क्या … या लोकगीताने एकूणच सगळ्याच गाण्यांचं मार्केट स्वतकडे ओढून घेतलं. अनेक रियालिटी शो मधेही हे गाणं वाजवलं गेलं. इतकंच काय या गाण्याने पाकिस्तान देखील गाजवलं.
२०१७ साली ‘ बोल में हलगी बजावू क्या ‘ हे गाणं बाजारात आलं आणि त्यांनी मराठी संगीत विश्वात इतिहास घडवला. सगळीकडे हेच गाणं किमान दोन वर्षे वाजत राहिलं. बऱ्याच मोठमोठ्या कार्यक्रमात साजन विशाल या जोडीला आमंत्रित करण्यात आलं. या गाण्याने त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली.
लोकगीतांमध्ये आलेली मरगळ या गाण्याने झटकली आणि तिथून पुढे मराठी लोकगीताने धार धरली आणि दर्जेदार लोकगीते रसिकांसमोर येऊ लागली. या गाण्याला सोशल मिडीयावर थोडेथीडके नव्हे तर तब्बल ८० मिलियनपेक्षा जास्त व्हीव्ज आहेत.
बोल में हलगी बजावू क्या या गाण्याच्या प्रदीर्घ यशानंतर या जोडगोळीने मात्र मागे वळून पाहिलं नाही आणि त्यांनी अनेक हिट लोकगीते महाराष्ट्राला दिली. राडा राडा, शालू नाच, दैवत छत्रपती, भीमाचं गाणं डीजेला वाजत, वाजवा ढंगळांग टकळांग ही त्यांची गाणी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. त्यातलं एक सगळ्यात जास्त गाजलेलं लोकगीत म्हणजे ,
‘ मला आमदार झाल्यासारखं वाटतयं ‘ या गाण्याला सोशल मिडीयावर १०७ मिलियन व्हीव्ज आहेत.
ग्रामीण भागात साजन-विशाल जोडीची भक्तिगीते भरपूर मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. देवीची भक्तिगीते असो किंवा खंडोबाची गाणी असो त्यांच प्रत्येक गाणं हे हिट असत. तरुणाईच्या मागणीनुसार आणि ट्रेंडिंग गाणी ही जोडी बनवते. ट्रेंडिंग विषयांवर असलेली त्यांची गाणी तीही भरपूर हिट आहे त्यातलं बुलाती हे मगर जानेका नै , आला बाई शंकरपाळ्या ही गाणी टिकटोक आणि रील्स वर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली होती.
नुकतच त्यांचं एक गाणं सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं ते म्हणजे नथ मोत्याची नाकामधी गं अंबा .. हे गाणं पुनर्निर्मित करून सुद्धा आधीच्या गाण्याइतकेच हिट्स या गाण्याला मिळाले होते.
आपल्या यशाचं श्रेय ही जोडी त्यांचे गुरु चंदन कांबळे यांना देते. या जोडीला प्रकाशझोतात आणणारी सुमित कंपनी या कंपनीचेही ते आभार मानतात. लोकसंगीत आणि लोकगीते यांचा वारसा ते समर्थपणे पुढे नेताय.
हे ही वाच भिडू :
- छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.
- प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं.
- फॉरेनरनां सुद्धा वेड लावणारं गाणं आनंद शिंदेनी फक्त ५ हजारात गायलं होतं.
- असं बनलं महाराष्ट्राला वेड लावणारं “नवीन पोपट हा” हे गाणं !!
साजन बेंद्रे- विशाल चव्हाण म्हणजे साजन-विशाल ही जोडी प्रेक्षकांना नवीन नाही. त्यांची भक्तिगीते आणि लोकगीते जनमानसात अक्षरशः रुजली आहेत.