१९७५ सालच्या काळात मैदानात धावत जाऊन क्रिकेटरची पप्पी घेणारी ती डेरिंगबाज साडीगर्ल !!

सध्या ट्विटरवर #SareeTwitter नावाचा ट्रेंड तुफान चालला आहे. भारतीय संस्कृती आणि साडीत स्त्री किती सुंदर दिसते हे दाखवणे त्यामागचा उद्देश आहे. यात सामान्य स्त्रियांपासून ते सोनम कपूर, प्रियंका गांधी पर्यंत अनेक स्त्रियांनी आपले साडी नेसून काढलेले सुंदर सुंदर फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत. इतकच काय तर अगदी आयुष्यमान खुराणाने देखील यात भाग घेतला आहे. त्याने आगामी चित्रपटाचे प्रोमोशन म्हणून वरवर साडी नेसलेला एक फोटो शेअर केला आहे.

असा सगळा साडीचा ट्रेंड जगभर चालू असताना या ट्रेंडची विजेती साडी ठरली आहे क्रिकेटमध्ये झळकलेली साडी. नाही नाही, तुम्हाला वाटत असेल २००३सालची मंदिरा बेदीची साडी असेल तर ती ही साडी नाही.

ती साडी आहे १९७५ मधील भारत-वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या टेस्ट मॅच मधला.

१९७५ मध्ये वेस्टइंडिज ५ टेस्ट मॅचची सिरीज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. यातील पाचवी व शेवटची मॅच मुंबईत वानखेडे स्टेडियमवर चालली होती. भारताची दुसरी इंनिग सुरू होती. क्रिजवर ब्रिजेश पटेल खेळत होता. सिंगल रन घेत त्याने आपल अर्धशतक पूर्ण केलं आणि तेवढ्यात एक काळी साडी नेसलेली तरुणी त्याच्या दिशेने धावत आली.

तिच्या पाठोपाठ तिला पकडायला गार्डस तिच्या मागे धावत होते. आपल्या रनिंग बिटवीन दी विकेट्सच्या जोरावर तिने गार्डस ना चुकवले आणि त्यांनी पकडण्याआधीच ब्रिजेशला गाठून त्याला गालावर पप्पी दिली. पुर्ण मैदान आश्चर्यचकित होते. भारतात असं कधी यापूर्वी घडलं नव्हत आणि परत कधी घडलं देखील नाही.

आजच्या प्रमाणे त्या काळचे क्रिकेट मॅचचं शुटींग करणारे कॅमेरामन खूप चाप्टर होते. त्यांनी याचं व्यवस्थित शुटींग करून ठेवलं.

या घटनेचा व्हिडिओ एकाने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर लोकांनी गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

त्या एकाने म्हटले की, ती मुलगी त्याच्या शाळेत त्याची सिनिअर होती आणि शाळेतील एक उत्तम बास्केटबॉल प्लेयर सुद्धा होती. तर दुसऱ्या एकाने कॅडबरीच्या तशाच जुन्या advertise चा व्हिडिओ कमेंट करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आत्तापर्यंत जगाने खेळात नेकेड स्ट्रीकर बघितलेत. कुठल्या तरी कॉजसाठी अंगावरचे कपडे उतरवून मैदानात धावत यायचं किंवा आपल्या आवडत्या खेळाडूचं लक्ष वेधण्यासाठी काही तरी गमतीदार करायचं. त्यांना स्ट्रीकर म्हणतात. पण पूर्ण साडीत भारतीय नारी स्ट्रीकर कधी पाहिली नव्हती. अजूनही हा फोटो आयकोनिक मानला जातो. भारतीय मुलींच्या बिनधास्त आणि बंधमुक्त जगण्याचं प्रतिक म्हणून हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

या शूर आणि बोल्ड साडीगर्लचं नाव अजूनही कोणाला माहित नाही. आज ती आज्जीबाई झाली असेल पण एवढ्या वर्षांनी ती परत चर्चेत आलीच शिवाय साडी ट्रेंडचा विनर देखील झाली. आणि बिचारा ब्रिजेश पटेल आपल्या क्रिकेटमधल्या कामगिरीपेक्षा या साडी गर्लने मैदानात केलेल्या कीसच्या कामगिरी मुळे परत आठवला गेलाय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.