भूमिका मोठी असो किंवा छोटी, सिनेमाचं जिगसॉ पझल शिव सुब्रमण्यम यांच्याशिवाय अपूर्ण राहील…

तुम्ही टू स्टेट्स बघितलाय? त्यात एक सिन आहे. आलिया भटच्या प्रेमात खच्ची झालेला अर्जुन कपूर तिच्या घरच्यांकडे पोरीचा हात मागतो. विषय डीप असतो, कारण आलिया भटचे पिक्चरमधले पप्पा लय खडूस असतात आणि कोथरूडमधले आजोबा लाजतील इतक्या कडक शिस्तीचे पण.

जेव्हा अर्जुन कपूर लग्नाचं विचारतो, तेव्हा हे काका त्याला फिक्स कानपट्टा देतील किंवा राडा घालतील असं वाटतं, मात्र होतं भलतंच. 

आलियाचे पप्पा फक्त एक प्रश्न विचारतात, ‘मेरी बेटी को खुश रखोगे?’ बाप पोरीच्या नात्याचं सगळं सार त्या एका वाक्यात आलं आणि आलियाच्या पिक्चरमधल्या पप्पांचा चेहरा आयुष्यभर लक्षात राहिला. 

त्यांचं नाव शिव सुब्रमण्यम.

सुब्रमण्यम यांचं रविवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप कळलं नसलं, तरी अवघी सिनेसृष्टी मात्र हळहळली. फक्त अभिनेते म्हणूनच नाही, तर लेखक म्हणूनही सुब्रमण्यम यांनी आपल्या कलेचा ठसा लोकांच्या मनावर आणि स्मरणशक्तीवर उमटवला होता.

त्यांच्या फिल्मी करिअरला सुरूवात झाली, ती १९८७ च्या एका शॉर्टफिल्मपासून. 

‘द एट कॉलम अफेअर’ असं नाव असलेल्या या शॉर्ट फिल्ममध्ये सुब्रमण्यम यांनी नाना पाटेकरांसोबत काम केलं होतं. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १९८९ मध्ये सुब्रमण्यम यांना एक मोठा ब्रेक मिळाला. एका सिनेमासाठी त्यांनी तिहेरी भूमिका बजावली. पटकथा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक आणि अभिनेता. 

हा सिनेमा होता, परिंदा.

विधू विनोद चोप्रानं डायरेक्ट केलेल्या या सिनेमामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर अशी तगडी स्टारकास्ट होती. या सगळ्या हिऱ्यांमध्येही ‘फ्रान्सिस’ साकारणारं शिव सुब्रमण्यम नावाचं सोनं चकाकलं होतं. परिंदाला समीक्षकांनी भारताचा पहिला वास्तवदर्शी सिनेमा अशी ओळख दिली. 

या सिनेमाचं कौतुक झालं, भारताकडून ऑस्करलाही पाठवण्यात आलं आणि सोबतच शिव सुब्रमण्यम हे नाव बॉलिवूड गाजवणार हे नक्की झालं. परिंदाच्या पटकथेसाठी १९९० मध्ये सुब्रमण्यम यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

नाना पाटेकर आणि सुब्रमण्यम हे समीकरण गाजलेल्या प्रहार सिनेमातही दिसलं. त्यानंतर, 1942: a love story, द्रोहकाल, रक्षक अशा अनेक सिनेमांमध्ये सुब्रमण्यम दिसत राहिले. २००९ मध्ये त्यांनी शाहिद कपूरच्या कमीनेमध्ये साकारलेला ‘लोबो’ही चांगलाच लक्षात राहिला. सुब्रमण्यम बऱ्यापैकी मेनस्ट्रीम नसलेल्या सिनेमांमध्ये काम करत होते, स्टॅन्ले का डब्बा, द गर्ल इन यल्लो बूट्स ही काहीशी अनवट पण भारी उदाहरणं.

सुब्रमण्यम टीव्हीवरही दिसले, मुक्तिबंधन या प्रचंड लोकप्रिय झालेल्या सिरीअलमध्ये आय. एम. विरानी या बिझनेसमॅनच्या पात्रात ते अगदी शोभून दिसले. 24: India, लाखों मे एक अशा सिरीजमधून ते छोट्या पडद्यावरही दिसत राहिले.

 थोडं आश्चर्य वाटेल, पण सुब्रमण्यम यांनी मराठी पिक्चरमध्येही छोट्या का होईना पण भूमिका केल्यात. अतुल कुलकर्णी आणि प्रिया बापटच्या हॅपी जर्नीमध्ये त्यांनी अँड्र्यू साकारला आणि दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या नदी वाहते या सिनेमामध्येही त्यांनी काम केलं.

टिपिकल बॉलिवूडपट असलेल्या टू स्टेट्समध्ये त्यांनी आलियाच्या पप्पांची भूमिका केली. टिपिकल साऊथ इंडियन आणि कडक शिस्तीचा हा माणूस आधी आपल्या डोक्यात जातो, पण पोरीचं लग्न ठरवताना तो जेव्हा फक्त तिच्या आनंदाचा विचार करतो… तेव्हा आपल्याला लय भारी वाटतं. त्या एका सिनमध्ये आपला सगळा राग गळून पडतो आणि कडक शिस्तीचा बापही किती हळवा असू शकतो हे आपल्याला काही सेकंदात कळतं…

सुब्रमण्यम आपल्याला टिपिकल मसाला फिल्म्समध्ये फार अभावानंच दिसले. त्यांचं नाव कधी १००-२०० कोटी कमावणाऱ्या पिक्चरच्या लिस्टमध्ये आलं नाही. 

कारण डोकं बाजूला ठेऊन बघावे लागणारे सिनेमे त्यांनी कधी केलेच नाहीत, त्यांची कला आपल्याला बरंच काही दाखवून गेली आणि शिकवूनही गेली. सिनेमाच्या भाषेत शिव सुब्रमण्यम सहाय्यक अभिनेते होते, त्यांनी कधी लीड हिरो म्हणून काम केलं नसेलही. 

पण कुठल्याही सिनेमाचं जिगसॉ पझल पूर्ण करताना, शिव सुब्रमण्यम नावाचा छोटा पण ताकदीचा तुकडा आता मिसिंग असेल, हेच खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.