फाळणीमुळे मंटो पाकिस्तानला गेला पण जाताना भारतीय फिल्म इंडस्ट्रीला ‘प्राण’ मिळवून दिला..

साहित्यिक आणि चित्रपटसृष्टी यांचं नातं एकदम घनिष्ठ आहे. एखाद्या साहित्यिकाच्या कादंबरीवर चित्रपट येतो किंवा एखाद्या साहित्यिकावरचं चित्रपट बनतो. पण आजचा किस्सा जरा वेगळाय , यात यापैकी असं काही घडलं नाही. थेट साहित्यिकानेच बॉलीवूडला एक खलनायक मिळवून दिला. खलनायक सुद्धा असा मिळवून दिला कि परत असा खलनायक होणे नाही.

सआदत हसन मंटो. या थोर साहित्यिकाची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. कोणाचीही भीडभाड न बाळगता केलेलं लेखन. फाळणीची बसलेली झळ मंटोच्या लेखणीतून आपल्याला दिसून येते. कुठलाही मुद्दा असो प्रेम, वाद अशा सगळ्याच गोष्टींवर चौफेर लिखाण करून वादाच्या भोवऱ्यात मंटो कायम अडकत राहिला.

आपल्या एकूण ४२ वर्षाच्या आयुष्यात मंटोने लघुकथा, कादंबऱ्या, कविता, नाटक या प्रकारांमध्ये दीर्घकाळ लेखन केलं. वादाच्या गर्तेत मंटोला जेलमध्ये आणि पागलखान्यात भरती करण्यात आलं होतं. पण आपल्या लिखाणाच्या जोरावर तो कायमच वरचढ राहिला.

मंटोने भारतीय सिनेमाला एक असा खलनायक दिला जो दहशत आणि भीतीचा अस्सल खलनायकी प्रवृत्तीचा होता. त्याचा अभिनय बघून भल्या भल्या लोकांच्या मनात त्याची भीती बसली होती. त्याच्या खलनायकी अभिनयाने आईवडिलांनी आपल्या मुलांची नावं त्याच्या नावावरून ठेवणं बंद केलं होतं. बायकांच्या काळजात त्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी धडकी भरायची.

या सगळ्यांचं कारण होते अभिनेते प्राण.

हि सगळी विशेषणं केवळ अभिनयाच्या आणि भेदक डोळ्यांच्या जोरावर प्राण यांनी मिळवली होती. मंटो यांच्यासाठी प्राण हे जगातला सगळ्यात देखणा पुरुष होते. चांगली चेहरेपट्टी नि शरीराने बलदंड असलेले प्राण मंटोला कायम गोष्टीतल्या पात्रासारखे वाटायचे.

लाहोर मध्ये प्राण ज्यावेळी नाटक चित्रपट करायचे त्यावेळी लाहोरमधला प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखायचा इतकी उत्तम अभिनयाची छाप त्यांनी पाडली होती. याला दोन कारणे होती ;

प्राण यांचा ड्रेसिंग सेन्स अगदी उत्तम होता आणि दुसरं कारण म्हणजे त्यांच्याकडे एक सजवलेला टांगा होता. त्यावेळी लोकं टांग्यातून प्रवास करायचे. ज्याच्याकडे टांगा असेल त्याला समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समजलं जायचं. प्राण यांच्यासाठी अनेक टांगे थांबवले जायचे, पण ते फक्त आपल्याच टांग्यातून प्रवास करणे पसंत करायचे.

१९४२ साली लाहोरमध्ये प्राण चित्रपटातून अभिनय करायचे. काही काळानंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली. त्यामुळे प्राण याना पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं. मुंबईत आपल्याला काही तरी चांगलं काम मिळेल या आशेवर ते आले. रोल शोधताना त्यांनी बारीकसारीक बरीच कामं केली. मुंबईच्या हॉटेलमध्ये कामही केलं.

१९४८ साली बॉलिवूडमध्ये शेवटी त्यांना काम मिळालं आणि या कामाने पुढची बरीच वर्ष प्राण हे प्रेक्षकांच्या मनात कायमचे राहिले. मंटो याना माहित होतं कि प्राण हे एक उत्तम नट आहे, त्यांचा चेहरा एखाद्या हिरोशी मिळताजुळता आहे. त्यावेळी त्यांनी त्यांचे मित्र श्याम चड्डा प्राण यांच्याबद्दल सांगितलं. त्यावेळी श्याम चड्डा हे बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून कार्यरत होते आणि मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत ते काम करत असत.

मंटो यांनी श्याम चड्डा याना प्राण यांची मदत करायला सांगितलं. श्याम चड्डानी बरेच प्रयत्न केले आणि मग प्राण याना काम मिळालं. बॉंबे टॉकीजच्या जिद्दी या चित्रपटात प्राण यांची भूमिका होती. हा तोच चित्रपट होत्या ज्याने देवानंद याना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवलं. खलनायक साकारलेले प्राण या भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये स्थिरावले.

इथून सुरु झालेली प्राण यांची हि खलनायकी प्रतिमा अनेक चित्रपटांमध्ये सगळ्यांचा चर्चेचा विषय होती. मंटो यांनी मदत केल्यामुळे प्राण यांनी रंगवलेला खलनायक पुढची अनेक वर्ष पडद्यावर आपली सत्ता गाजवत राहील यात वादच नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.