ब्राझीलचे नवे राष्ट्रपती यांनीच भारतासोबतच्या मैत्रीचा पाया रचला होता…
ब्राझीलच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल काल रात्री लागला. दक्षिण अमेरिका खंडात महत्वाच्या असलेल्या या बहुचर्चित निवडणुकीत राष्ट्रपती जायर बोल्सेनारो यांचा पराभव झाला आणि माजी राष्ट्रपती लुला विजयी झाले आहेत.
अतिशय अतितटीच्या या निवडणुकीमध्ये लुला दा सिल्वा यांना ५०.९० टक्के मतं मिळाली तर जायर बोल्सेनारो यांना ४९.१० टक्के मतं मिळाली आहेत.
राष्ट्रपती असतांना जायर बोल्सेनारो यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर अनेकदा जगभरातून टीका झाली आहे. तर याउलट लुला यांनी ८ वर्षाच्या राष्ट्रपती पदाच्या काळात लाखो गरिबांना दारिद्रय रेषेखालून मुक्त केलं अस त्यांच कौतुक केलं जातं.
यामुळेच टोकाच्या उजव्या विचारांच्या बोल्सेनारो यांचा पराभव आणि डाव्या विचारांचे लुला यांच्या विजयाची चर्चा होत आहे.
राष्ट्रपती बोल्सेनारो हे भारताचे समर्थक असल्यामुळे देशात त्यांची अनेकदा चर्चा केली जाते, पण त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे भारतात सुद्धा अनेकदा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या काळात भारताने ब्राझीलला लशींचा पुरवठा केला होता तेव्हा बोल्सेनारो यांनी हनुमानाचे संजीवनी बुटी नेतानांचे चित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. बोल्सेनारो यांच्या या ट्विटनंतर भारतात अनेकांनी त्यांची प्रशंसा केली होती.
त्यामुळेच बोल्सेनारो यांना भारताचे समर्थक म्हणून ओळखले जाते, पण भारत ब्राझीलच्या या मैत्रीची सुरुवात लुला यांनी केली होती.
१९६४ ते ८५ या काळात ब्राझीलमध्ये आर्मीची सत्ता होती. त्याच काळात १९७५ मध्ये लुला श्रमिक संघाचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले होते. श्रमिक संघाचे प्रमुख झाल्यांनतर त्यांनी आर्मीच्या विरोधात आंदोलनं करायला सुरुवात केली. यातूनच १९८० मध्ये त्यांनी वर्कर्स पार्टी या पक्षाची स्थापना केली. हाच वर्कर पक्ष ब्राझीलमधला सगळ्यात दावा पक्ष म्हणून ओळखला जातो.
अखेर १९८५ मध्ये ब्राझीलमध्ये आर्मीची राजवट संपली आणि पुन्हा एकदा लोकशाहीला सुरुवात झाली. आर्मीची सत्ता संपल्यानंतर १९८६ मध्ये लुला हे ब्राझील काँग्रेसमध्ये खासदार म्हणून निवडून गेले आणि तेव्हापासूनच लुला यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्याला सुरुवात केली. १७ वर्षांच्या प्रयत्नानंतर २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळालं आणि लुला हे ब्राझीलचे ३५ वे राष्ट्रपती झाले.
लुला राष्ट्रपती झाल्यानंतर भारत आणि ब्राझीलमधले मैत्रीपूर्ण संबंध घट्ट झाले.
लुला हे राष्ट्रपती झाल्यानंतर भारत आणि ब्राझीलमधील मैत्रीसंबंध आणखी घट्ट व्हायला लागले. २००४ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून लुला यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. २००७ आणि २००८ मध्ये सुद्धा त्यांनी भारताचा दौरा केला होता. यासोबतच भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सुद्धा २ वेळा ब्राझीलचा दौरा केला होता तर राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांनी सुद्धा एकदा ब्राझीलचा दौरा केला होता.
भारत ब्राझीलचे संबंध निव्वळ दौऱ्यांपुरते मर्यादित राहिले नाही तर लुला यांच्या काळातच ब्रिकची सुरुवात झाली.
सप्टेंबर २००६ मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या ४ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र भेटून चर्चा केली होती. या भेटीमधूनच BRIC या संघटनेची सुरुवात करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्र्यांनी या संघटनेची सुरुवात केली परंतु याला औपचारिक स्वरूप मिळालेलं नव्हतं.
याच संघटनेला औपचारिक रूप देण्यासाठी १६ जून २००९ मध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला, चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष डिमीट्री मादादेव यांच्या उपस्थितीत रशियामध्ये ब्रिकची पहिली बैठक पार पडली. याच बैठकीमधून ब्रिक या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली होती.
लुला यांच्या काळात ब्राझीलमध्ये गरीब लोकांना दारिद्र्य रेषेखालून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यांनी गरिबांसाठी अन्न, निवारा, आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षण या चार व्यवस्थांची निर्मिती करण्यावर लक्ष दिल होतं. त्यामुळेच त्यांना ब्राझीलमधील लोकांना गरिबीतून मुक्त करण्याचं श्रेय दिलं जातं.
२००९ मध्ये ब्रिकची स्थापना झाली आणि २०१० मध्ये त्यांचा राष्ट्रपती पदाचा दुसरा कार्यकाळ संपला.
ब्राझिलच्या संविधानानुसार सलग ३ वेळ राष्ट्रपती राहता येत नाही. त्यामुळे २०१० मध्ये लुला यांनी राष्ट्रपती पद सोडलं. त्यांच्यानंतर मजूर पक्षाच्याच डिल्मा रुसेफ या राष्ट्रपती झाल्या. त्यांनी २ वेळ राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली मात्र दुसऱ्या खेपेला २ वर्षानंतरच त्यांना पद सोडावं लागलं. त्यांच्या जागी मायकल तेमोर राष्ट्रपती झाले.
तेमोर यांचा कार्यकाळ २०१८ मध्ये संपणार होता तेव्हा लुला यांनी पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली, पण एका केसमध्ये लुला यांना अटक करण्यात आली म्हणून लुळा हे निवडणूक लढाऊ शकले माही आणि उजव्या विचारसरणीचे बोल्सेनारो हे ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. या निवडणुकीत सुद्धा त्यांनी टोकाच्या उजव्या विचारांचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा मार्ग स्वीकारला. मात्र देशासमोर असलेल्या आर्थिक समस्या सोडवल्या नाही.
या आर्थिक समस्यां असतांनाच कोरोना लॉकडाऊन लागलं आणि परिस्थिती आणखीनच बिघडली. कोरोनामुळे सामान्य लोकांचं झालेलं नुकसान या कारणामुळे लुला यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला.
लुला यांनी गरिबांसाठी अन्न, त्यांच्यासाठी घरं बांधण्याच्या योजना, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा या मुद्द्यांवर भर दिला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक फटका बसलेल्या लोकांनी लुला यांना मतदान केलं आणि ते पुन्हा निवडून आले असे विश्लेषक सांगतात.
दक्षिण अमेरिका खंडातल्या अर्जेंटिना, चिली, पेरू, कोलंबिया आणि मेक्सिको या ५ देशांमध्ये सुद्धा डाव्या पक्षांनीच सत्ता आहे. आता ब्राझीलमध्ये सुद्धा डाव्या पक्षाच्या हातात सत्ता आल्यामुळे भांडवलशाही अमेरिकेच्या दारात पुन्हा एकदा डावे विचार प्रबळ होत आहेत असं विश्लेषक सांगतात.
सत्तेवर आलेल्या लुला यांनी ब्राझीलमध्ये असलेल्या गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी लुला यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते.
२००३ मध्ये ब्राझीलच्या लोकसंख्येपैकी ४१.५ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर २०११ मध्ये यात ३० टक्क्यांची घाट झाली आणि फक्त १०.२२ टक्के लोकसंख्याच दारिद्र्यरेषेखाली उरली होती. तर भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये असलेले संबंध सुद्धा आणखी घट्ट झाले होते. त्यामुळे लुला यांच्या नेतृत्वात भारत ब्राझील या दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध आणखी वाढतील असं सांगितलं जात आहे.
हे ही वाच भिडू
- भारताच्या गीर, नेल्लोर गाई सातासमुद्रापार नेल्या आणि ब्राझील टॉपचा बीफ उत्पादक देश झाला
- भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या या देशांची स्थिती पाहिलं तरच कळतं की आपला भारत देश महान का आहे