वेटरचं काम करणाऱ्या माणसाला वयाच्या चाळीशीत करियरची दिशा सापडली..

दोन सख्खे भाऊ एके दिवशी ठरवतात की दोघांच्या घरामध्ये असलेली भिंत पाडायची आणि भांडण मिटवायचं. मग काय, ही भिंत पाडण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करतात. बॉम्ब लावतात. मोठा खांब आणतात. तरी सुद्धा ही भिंत काही त्यांना पाडता येत नाही. मग शेवटी या भिंतीवर जाऊन दोघांचं कुटुंब एकमेकांचं नातं जपतात. अंबुजा सिमेंट ची जाहिरात म्हणजे लहानपणीची खास आठवण. या जाहिरातीमध्ये दोन भावांचा डबल रोल करणारा अभिनेता म्हणजे बोमन इराणी. १ मिनिटाच्या या जाहिरातीमध्ये स्वतःच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक बोमन इराणी यांनी दाखवली.

वयाची चाळीशी उलटली की माणसं आहे त्या नोकरीला कंटाळून रिटायर होण्याची स्वप्नं बघतात. पण बोमन इराणी यांचं अभिनयातलं करियर मुळात चाळीशी ओलांडल्यावर सुरू झालं.

छान गुबगुबीत असा देह, चेहऱ्यावर खानदानी रुबाब, समोरच्यावर छाप पाडणारं व्यक्तिमत्व असे गुण उपजत असल्याने बोमन इराणी यांचा अभिनय सुद्धा दर्जेदार होतो. समोर आमीर खान असो वा संजय दत्त.. मोठ्या कलाकारांसमोर सुद्धा बोमन इराणी आत्मविश्वासाने उभे राहतात आणि स्वतःची भूमिका उत्कृष्ट साकारतात.

बोमन इराणी यांचं आयुष्य फार नागमोडी वळणं घेऊन बॉलिवुडमध्ये स्थिरावलं आहे. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईत झाला. पारसी कुटुंबाची पार्श्वभूमी होती. सेंट मेरी स्कुल मध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. अगदी लहान वयात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या कुटुंबाची बेकरी होती. त्यांच्या आईने नंतर ही बेकरी चालवायला घेतली. बोमनने इतक्या लहान वयात या व्यवसायात पडू नये म्हणून आईने त्यांचं शिक्षण थांबवलं नाही. तुम्ही “तारे जमी पर” सिनेमा पहिला असावा! या सिनेमातील मुलाला डीसलेक्सा नावाचा आजार असतो. म्हणजेच अक्षर आणि अंकांच आकलन होत नाही.

बोमन इराणी सुद्धा शालेय जीवनात डीसलेक्सिक होते. पण त्यांनी अथक मेहनत करून या आजारावर मात केली.

शालेय शिक्षण पूर्ण करून पार्ल्याच्या मिठीबाई कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इथे त्यांनी पॉलिटेक्निकचा डिप्लोमा आणि वेटरचा दोन वर्षांचा कोर्स केला. यानंतर अनुभव मिळवण्यासाठी आणि गाठीशी थोडे पैसे असावेत म्हणून त्यांनी मुंबई येथील आलिशान ताज हॉटेल मध्ये वेटरची नोकरी पत्करली. इथेच ते रुम सर्व्हिस बॉय म्हणून काम करायचे. अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधून एका पॉश अशा फ्रेंच रेस्टॉरंटमध्ये त्यांना वेटरची नोकरी मिळाली.

इथे त्यांनी २ वर्ष काम केलं. अधूनमधून ते आईला सुद्धा दुकानात मदत करायचे. जवळपास १४ वर्ष ते आईसोबत दुकान चालवायचे. तसेच जसा वेळ मिळेल तसा ते अलेक्झांडर सिनेमागृहात सिनेमे बघायला जायचे.

ताज मध्ये वैगरे काम करताना आलेल्या माणसांकडून त्यांना टीप मिळायची. ते पैसे साठवून त्यांनी एक कॅमेरा विकत घेतला.

या कॅमेरात ते फुटबॉल मॅच आणि शालेय क्रिकेट स्पर्धांचे फोटो काढून ते फोटो २५ किंवा ३० रुपयांमध्ये लोकांना विकायचे. लग्नानंतर सुद्धा त्यांनी फोटोग्राफी करणं सुरूच ठेवलं. पैसे साठवून त्या पैशांचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याची सवय त्यांना अशीच लागली. सात वर्ष पैसे साठवून एकदा ते संपूर्ण कुटुंबाला घेऊन उटी फिरण्यासाठी सहलीला घेऊन गेले. त्यांचं फोटोग्राफी करियर हळूहळू विस्तारत होतं. त्यांनी बॉक्सिंग सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी फोटोग्राफी केली.

वय वाढत होतं. कामातून येणारे पैसे घरच्या कामांसाठी खर्च व्हायचे. स्वतःचं आयुष्यात काहीतरी अधिक चांगलं करण्याची त्यांना इच्छा होती.

जी आवड त्यांना शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना लागली होती ती आवड पुढे जोपासण्याचा आणि त्यात करियर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हंसराज सिद्धिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९८१ ते १९८३ दरम्यान अभिनयाचे धडे गिरवले. इथेच त्यांची प्रख्यात नृत्यदिग्दर्शक शामक दावर आणि महान अभिनेते आलेक पदमसी यांच्याशी भेट झाली. मोठ्या व्यक्तींचा सहवासात आपण त्यांच्याकडून नकळत अनेक गोष्टी शिकत जातो.

बोमन इराणी यांच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा या व्यक्तींचा प्रभाव पडला. याचवेळी त्यांनी रंगभूमीवर काही नाटकांमधून काम करायला सुरुवात केली.

२००० साली त्यांना फॅंटा, क्रॅकजॅक बिस्किट अशा लोकप्रिय जाहिराती मिळाल्या. क्रॅकजॅक बिस्किट च्या जाहिरातीत बोमन इराणी आणि विजय पाटकर ही जोडी तुफान लोकप्रिय झाली. त्या वेळी जाहिरातींमध्ये जास्त मानधन घेणारे नट म्हणून बोमन इराणी यांची ओळख होती. याच दरम्यान त्यांना २००३ साली “डरना मना है” या सिनेमात सैफ अली खान सोबत भूमिका करायची संधी मिळाली. पुढे राजकुमार हिरानी यांनी “मुन्नाभाई एम बी बी एस” मधली डॉक्टर अस्थाना ही भूमिका त्यांना ऑफर केली.

आश्चर्य म्हणजे ही भूमिका करण्यात त्यांनी इतका रस दाखवला नाही. पण विधू विनोद चोप्रा यांनी सांगितल्यामुळे त्यांनी ही भूमिका स्वीकारली. आणि मग पुढचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहेच…

‘खोसला का घोसला’, ‘3 इडियट’, ‘जॉली एल एल बी’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘डॉन’, ‘पिके’, ‘संजू’, ‘मै हुं ना’,’फेरारी की सवारी’ अशा सुपरहिट सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. भूमिका समरसून साकारणं म्हणजे काय, हे त्यांच्या अभिनयातून शिकायला मिळतं.

लवकरच ते भारताने १९८३ साली जो पहिला वर्ल्डकप जिंकला त्यावर आधारित 83 सिनेमात झळकणार आहेत. बेकरी सांभाळणारा एक माणूस, ताज हॉटेल मधला वेटर, क्रीडा स्पर्धांमध्ये फोटोग्राफी करणारा फोटोग्राफर पासून वयाची चाळीशी उलटल्यावर झालेला एक यशस्वी अभिनेता हा बोमन इराणी यांचा प्रवास हा अथक मेहनत करून आज इथवर येऊन पोहोचला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.