बॉम्बे कॅसल होता म्हणून सिद्दींपासून आपली मुंबई वाचली

जर १६८९ मध्ये आफ्रिकन सिद्दी याकूतने मुंबई जिंकली असती तर आज जशी दिसते तशी मुंबई दिसली नसती. जर ब्रिटीशांनी आपला खजिना मुघल बादशाहा औरंगजेबाजवळ रिता केला नसता तर मुंबई आज जशी दिसते तशी दिसलीच नसती.

आणि महत्वाचं म्हणजे बॉम्बे कॅसल नसता तर मग मुंबईची धडगतच नव्हती.

हे कदाचित अतिशयोक्ती पूर्ण वाटेल पण इतिहास तरी तेच सांगतो. म्हणून ब्रिटिशांनी आपली सत्ता म्हणून का होईना मुंबई सिद्दींच्या ताब्यात जाण्यापासून वाचवली, त्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या या बॉम्बे कॅसलचा इतिहास..

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात सध्याच्या दक्षिण गुजरातचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भागाचा सुलतान बहादुर शहा याच्या ताब्यात होता. उत्तरेकडून होणाऱ्या मोगलांच्या आणि समुद्र मार्गे होणार्‍या पोर्तुगीजांच्या स्वार्‍यांनी बहादुर शहा हैराण झाला होता. त्यातून काही प्रमाणात स्वस्थता मिळवण्यासाठी त्याने १५३४ साली मुंबई आणि वसईची भेट पोर्तुगीजांना दिली. मग पोर्तुगीज मुंबईचे मालक बनले.

१९५४ साली ग्रासिया द ओरटा या पोर्तुगीज व्यक्तीने सध्याच्या बॉम्बे कॅसलची जागा लीजवर घेतली आणि तिथ क्विंटा मॅनोर किंवा मॅनोर हाऊस अशी आटोपशीर इमारत बांधली. मुळातली मॅनोर हाऊस ही इमारत एक मजली पूर्ण लाकडात बांधलेली होती. इमारतीच्या आजूबाजूला बगीचा होता. १६२६ साली ही इमारत पोर्तुगीज गव्हर्नर गव्हर्नरचं निवासस्थान बनली.

१६३४ साली या इमारतीची पुनर्बांधणी करून त्याच्या भोवती तटबंदी उभारण्यात आली. या तटबंदीला एक बुरुज आणि संरक्षणासाठी दोन तोफा होत्या. १६६१ साली मस्कतच्या अरबांनी मुंबईवर आक्रमण करून मुंबईच्या दक्षिणेकडील बेटाचा ताबा घेऊन मॅनोर हाऊस जाळून टाकलं.

हि नासधूस करून अरब आक्रमक मुंबईतून निघून गेले की पोर्तुगीजांनी त्यांना हुसकावून लावलं हे कळायला मार्ग नाही. पण ब्रिटिश गव्हर्नर अँगिएरने इंग्लंडच्या कोर्ट ऑफ डिरेक्टरला लिहिलेल्या पत्रात ही हकीगत कळवली. अर्थातच लढाई जिंकून म्हणा किंवा परत केल्यामुळे ही भेट पोर्तुगीजांना परत मिळाली. नंतर ही इमारत पुन्हा उभारली गेली असणार.

त्या सुमारास मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन द ब्रिगँझा हिचा विवाह इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्याशी होऊ घातला होता. हा विवाह अर्थातच बर्‍यापैकी राजकीय होता. या विवाह प्रसंगी पोर्तुगीजांनी इंग्रज राजाला हुंडा दिला, त्यात मुंबई बेटाचा समावेश होता.

हा लग्नाचा करार जरी १६६१ साली झाला तरी मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात घ्यायला १६६५ साल उजाडलं. शिवाजीं महाराजांनी सुरत शहर लुटल्यानंतर सुरतेचा सुरक्षित शहर असा लौकिक संपला होता. त्यात आणि स्थानिक मुघल अधिकाऱ्यांनी चालवलेल्या आर्थिक आर्थिक छळाला कंटाळून १६६८ साली ईस्ट इंडिया कंपनीने आपलं मुख्य ठाण सुरतहुन मुंबईला हलवलं.

अशा प्रकारे मुंबई ईस्ट इंडिया कंपनी मुख्य नाविक आणि व्यापारी आणि लष्करी केंद्र बनलं. आता या सर्व घडामोडी होत असताना मुंबईचा विकास होणं अपेक्षित होतं. मुंबई बेट ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर त्या वेळच्या ब्रिटिश गव्हर्नर हँफ्रे कुक यानं मॅनर हाऊस वाढवलं. त्या भोवती तटबंदी बांधली त्या तटबंदीवर १८ तोफा बसवल्या आणि किल्ल्याला नाव दिलं बॉम्बे कॅसल.

आता यातून ब्रिटिशांच्या अडचणी संपल्या होत्या असं नव्हतं.

मुंबई शहराच्या आणि पर्यायाने मुंबई किल्ल्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती जेराल्ड अँगिएरच्या काळात. अँगिएरने बॉम्बे कॅसल विस्तारित करण्याची योजना आखली. या प्रस्तावित मोठ्या किल्ल्यात मूळ बॉम्बे कॅसल केंद्रबिंदू राहणार होता. अँगिएर हा अत्यंत द्रष्टा प्रशासक होता.

आधीपासूनच महत्त्वाचं शहर असलेल्या सुरतेसारख्या ठिकाणी वखार बांधणं आणि स्वतःच्या मालकीच्या बेटावर नवं शहर उभारणं यातला मूलभूत फरक जाणवला होता. त्याने या शहरातील सर्व नागरिकांना व्यापारासाठी उत्तेजन दिलं. टाकसाळ बांधली, कस्टम हाऊस उभारलं. ब्रिटिश अधिकारी मुंबई रमावेत त्यानी लग्न करुन इथेच स्थायिक व्हावं यासाठी ब्रिटनहून तरुणी आणल्या. व या साऱ्या शहराच्या रक्षणासाठी मजबूत तटबंदी उभारण्यास सुरुवात केली.

सहाजिकच या काळामध्ये शहरांमध्ये अनेक इमारती उभ्या राहिल्या. बॉम्बे कॅसल हा किल्ला उत्तरेस आज जिथे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तिथपासून ते दक्षिणेचा सध्याचा गेटवे ऑफ इंडिया आहे तिथपर्यंत होता.

या योजनाबद्ध किल्ल्याच्या योजनेमुळेच १६८९ साली याकूत खानने माझगाव जिंकलं. पण या कॅसलपुढे त्यांची डाळ शिजली नाही.

खर तर आफ्रिकन सिद्दींचे आणि मुघलांचे तेव्हा संबंध चांगले होते. त्यावेळी सिद्दींच आरमार प्रबळ होतं. त्यावेळी इंग्रजांनी सुरतेहून आपलं मुख्य ठाण हलवून मुंबई केलं. त्यामुळे मुघलांचे आणि इंग्रजांचे संबंध बिघडले. त्याचवेळी याकूत खान सिद्दीने १६७२ मध्ये मुंबईवर आक्रमण केल. या आक्रमणामुळेच अँगिएरने बॉम्बे कॅसलला तटबंदी केली. याचा राग डोक्यात ठेऊन २० हजाराच्या पायदळानिशी सिद्दी याकूतने १६८९ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी वर आक्रमण केलं.

त्यावेळी इंग्रजांनी बॉम्बे कॅसल मध्ये शरण घेतली. पुढे ब्रिटिश राज्यपाल सर जॉन चाइल्ड यांनी मुघल बादशहा औरंगजेब याच्याबरोबर शांतता करार केला. त्यानुसार तेव्हाचे १.५ लाख देऊन मुंबई सिद्दींच्या ताब्यातून सोडवण्यात आली.

पण सांगायचं झालं तर याकूत ब्रिटीशांची कोंडी करू शकला पण हा किल्ला जिंकू शकला नाही. म्हणजेच ब्रिटिश या किल्ल्याच्या आश्रयाने तरले होते.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.