आणि अशा रीतीने आजच्या दिवशी बॉम्बेची “मुंबई” झाली

महाराष्ट्राची राजधानी मुंबई. देशाची आर्थिक केंद्र, बॉलिवूडची मायानगरी. देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आणि सगळ्यात फटका माणूस याच शहराच्या छताखाली राहतो. दररोज येणाऱ्या रेल्वे गाड्यातून हजारोजण या शहरात अनेक स्वप्न डोळ्यात साठवून प्रवेश करत असतो. प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतातच अशी नाही. एक मात्र खरं कि मुंबई कोणाला उपाशी पोटी झोपू देत नाही.

पण या मुंबईसाठी मराठी माणसाने खूप मोठा लढा दिला आहे. कित्येकांनी रक्त सांडलं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्रात राहिली. 

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती नंतरही मराठी माणसाचा मुंबई साठी लढा सुरु राहिला. हा लढा होता मुंबईच्या नावासाठी.

सगळ्यात आधी मुंबईच्या नावाचा इतिहास पाहावा लागेल.

मूळचे मासेमारी करणाऱ्या कोळी भंडारी समाजाचे सात बेटांचे हे छोटेसे गाव. तस पाहायला गेलं तर इथला इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. सम्राट बिंब याच्या काळापासून अनेक सत्ता, राज्यकर्ते इथे राज्य करून गेले. काही काळ गुजरातच्या सुल्तानाकडे देखील हि बेटे होती. पण पुढे सारख्या होणाऱ्या लढायांना कंटाळून त्याने ही बेटं पोर्तुगीजांना दिली.

पोर्तुगीजांनी इथं आपलं बंदर बनवलं.

मराठी विश्वकोशाच्या अनुसार मुंबई या नावासंबंधी विविध मते आढळतात. सालेटोर यांनी मिरात-इ-अहमदी या ग्रंथात आलेल्या ‘मनबाई’ या शब्दाच्या आधारे ‘मुंबाई’ या स्थानिक बौद्ध देवतेवरून मुंबई हे नाव पडले असावे, असे मत मांडले आहे. तर दुसऱ्या एका तर्कानुसार मुगा नावाच्या कोळ्याने मुंबादेवीचे देऊळ बांधले ते मुंबईचे मूळ रूप असावे, असे म्हटले गेले. मृण्मयी ; मुमई ; मुंबई अशी व्युत्पत्ती अ. द. पुसाळकर व वि. गो. दिघे या इतिहास संशोधकांनी दिली आहे.

मोमाई ही सौराष्ट्रातील देवता एके काळी मुंबईत पूजिली जात होती, तीवरून मुंबई हे नाव आले असावे, असेही म्हटले जाते.

महाअंबाबाई ; मुंबई अशीही (भाषाशास्त्रदृष्ट्या चुकीची) व्युत्पत्ती पुढे केली जाते. मुंबादेवी या स्थानिक कोळ्यांच्या देवतेवरून मुंबई नाव आले, हे मत सामान्यपणे मान्य करण्यात येते. तर पाश्चात्य संशोधक पोर्तुगीजांनी वापरलेल्या बाँ-बाइआ (उत्तम उपसागर) यावरून बाँबे हे नाव आले असावे हा तर्क मांडत.  फ्रायर व जोशी या संशोधकांनी बॉम्बेम किंवा बून बे अशी नावे पोर्तुगीज येण्यापूर्वी वापरात होती, हे दाखवून बॉम्बे बद्दलची थियरी खोटी ठरवतात.

एकूण काय बॉम्बे हा शब्द पोर्तुगीजांनी प्रचारात आणला. त्यांनी इथे काही चर्च बांधले, काही किल्ले बांधले. पण त्यांच्या काळातही हे एक शांत निवांत बेटच होते.

पुढे पोर्तुगीजांनी आपल्या लेकीच्या लग्नात मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली आणि या बेटावर खळबळ सुरु झाली. मराठ्यांचे मुघलांच्या सुरतेवर सारखी होत असलेली आक्रमणे पाहता इंग्रजांनी आपले व्यापारी केंद्र मुंबईला हलवले. त्यांनीच या गावाला शहर आणि पुढे महानगर बनवलं.

एकोणिसाव्या शतकात मुंबईमध्ये अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, महाविद्यालये सुरु झाली, रस्ते झाले, वीज आली, पोलीस व्यवस्था अली, रेल्वे आली, बसेस धावू लागल्या. ब्रिटिशांचे बॉम्बे संपूर्ण जगात व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. फक्त इंग्रजांनी नाही तर नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड अशा महान मुंबईकरांनी देखील या शहराच्या निर्मितीत मोठा वाटा उचलला.

विसाव्या शतकात घडालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे देखील मुख्य केंद्र मुंबईच होते. स्वातंत्र्यानंतर गुजरात सोबत द्विभाषिक राज्यात होत असलेल्या अन्यायामुळे महाराष्ट्र बाजूला काढला गेला आणि त्याची राजधानी मुंबई करण्यात आली.

१ मे १९६० रोजी पंतप्रधान नेहरूंनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांच्या हाती सोपवला.

मात्र तेव्हा देखील राज्याच्या राजधानीचे इंग्रजी नाव बॉम्बे असच होतं. हिंदी वाले तर सर्रास बम्बई म्हणून उल्लेख करायचे. सरकारी कागदपत्रांमध्ये देखील अधिकृत रित्या असाच उल्लेख व्हायचा. तेव्हा देखील नामांतराच्या मागणीने जोर धरला होता मात्र काही विचारवंतांनी तर्क सांगितलं की

मुंबईला इंग्रजीमध्ये देखील मुंबई म्हटलं तर जगभरच्या लोकांचा घोटाळा होईल. कारण त्यांना बॉम्बे हेच नाव माहित आहे. जर मुंबई हा उल्लेख सुरु झाला तर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हे गाव जणू अनोळखी होऊन जाईल असं सांगितलं गेलं.

या सगळ्या अचाट तर्कांमुळे मुंबईचे नाव बदललं गेलं नाही.

साधारण याच काळात मराठी माणसाचा मुंबईमधला आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवणाऱ्या व्यंगचित्रकार बाळ ठाकरे या तरुणाने सुरु केलेल्या या संघटनेत त्यांची आक्रमकता, रोखठोक विचार आणि मराठी तरुणांसाठी असललेली तळमळ पाहून कित्येकजण या पक्षात आले. मराठीच्या हक्कासाठी रस्त्यावर आंदोलने करू लागले.

बाळासाहेबांनी हट्टाने सुरवातीपासून मुंबईचा उल्लेख मुंबईच करावा यावर जोर दिला. हळूहळू सेनेचे मुंबईच्या कानाकोपऱ्यात शाखा उभ्या राहिल्या. महानगरपालिकेवर भगवा झेंडा उभा राहिला. तेव्हा सेनेने महापालिकेच्या कामकाजात देखील मुंबई हाच उल्लेख कायम करण्याचा प्रयत्न केला.

पण शेवटी प्रश्न राज्यात व केंद्रात असणाऱ्या सरकारपाशी येईन अडायचा.

केंद्रात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण असे गृहमंत्री राहूनही महाराष्ट्राची मागणी धसाला लागत नव्हती. कोठेही राज्यकर्ते मुंबईच्या नामकरणाच्या विरोधात नव्हते मात्र प्रयत्न करून नाव बदलत नव्हते.

नव्वदच्या दशकात शिवसेना मुंबईच्या नावासाठी आक्रमक झाली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तसा प्रस्ताव दिल्लीला पाठवला. तेव्हा देखील केंद्रात गृहमंत्रीपदी महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाणच होते. पण त्यावेळी देखील हा प्रस्ताव पास झाला नाही.

दरम्यानच्या काळात शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेली होती. शरद पवारांच्या भ्रष्टाचारावर घणाघात घालत, बाबरी मशिदीचा प्रश्न हिंदुत्व याना साद घालत शिवसेनेने भाजपच्या साथीने १९९५ सालची विधानसभा निवडणूक जिंकली.  

महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकला. शिवाजी पार्कच्या अफाट सभेत शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बाळासाहेबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे युतीचा मुख्यमंत्री कोणीही असला तरी सत्तेचा रिमोट त्यांचंच राहतात राहणार होता.

सत्ता हातात आल्या आल्या शिवसेनेने आपल्या अनेक वर्षांच्या मागणीला पुढे रेटलं. बॉम्बेची मुंबई करायची.

या नामांतरासाठी लागणारे सगळे कायदेशीर उपचार वेगाने पार पाडण्यात आले. एवढंच नाही तर केंद्राची मान्यता देखील मिळवण्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यशस्वी ठरले. तेव्हा देखील नरसिंहराव यांचे काँग्रेसचे सरकार होते. पण सुधाकरराव नाईक यांना नकार देणाऱ्या सरकारने जोशींच्या प्रस्तावाला मात्र आश्चर्यकारकरित्या होकार कळवला.

सर्व सोपस्कार पार पाडल्या नंतर ४ मे १९९५ रोजी अधिकृत घोषणा झाली, बॉम्बेची मुंबई झाली.

बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाचा तीस वर्षांपासून सुरु असलेला लढा अखेर यशस्वी झाला. त्यांनी प्रयत्न केले नसते तर आजही आपल्या पुढच्या पिढ्या बॉम्बे, बम्बई म्हटल्या असत्या. अजूनही मराठी माणसाला मुद्दामहून आपल्याच राजधानीत उपरे ठरवण्याचा प्रयत्न झाला असता.

आज जेव्हा बराक ओबामा यांच्या सारखा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात आला की मुंबईला भेट देतो आणि इथल्या कॉलेजच्या मुलांशी गप्पा मारताना मुंबईला मुंबई म्हणतो तेव्हा या सगळ्या लढ्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.