अशा प्रकारे एका वडाच्या झाडाखाली सुरु झाला होता ‘मुंबई शेअर बाजार’…

मुंबई मधलं दलाल स्ट्रीट वरच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची भली मोठी इमारत बघितल्या का कधी? भल्याभल्यांची डोक्यावरची टोपी खाली पडते असली जंगच्या जंग बिल्डींग आहे. दारातच एका शिंग रोखलेल्या एका टग्या बैलाचा पुतळा उभारला आहे. आपल्यासारख्या फाटक्या माणसाने तिकड बघायची पण टाप नाही .

आशियातल सगळ्यात जुनं शेअर मार्केट आहे. रोज करोडो रुपये या शेअर मार्केट मध्ये खेळत असतात. करोडोंची स्वप्नं सुद्धा या मार्केटमध्ये खेळत असतात. भारतातले सगळ्यात श्रीमंतातले श्रीमंत लोक या मार्केटच्या मूडकडे तिच्या रुसव्या फुगव्याकडे लक्ष ठेवून असतात. व्यसन लागल्या प्रमाणे काही लोक तिचा हालहवाल ठेवतात.

पण सुरवातीपासूनचं असच होत असं नाही.  

एखादा शेटजी आपली कथा सांगताना म्हणतो ना की आमची परिस्थिती एकदम गरीबीची होती, आमचा आज्जा झाडाखाली साड्या विकायचा, त्यातून आम्ही हे दुकानं उभे केले अगदी तशीच स्टोरी या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुद्धा आहे.

खूप वर्षापूर्वी म्हणजे अगदी १८४०ची गोष्ट आहे. तो पर्यंत भारतात इंग्रजांनी आपले हातपाय व्यवस्थित पसरले होते. भारतातून कच्चा माल पडेल किमतीत उचलायचा आणि इंग्लंडच्या फक्टरी मध्ये तयार झालेला अवाच्या सव्वा किमतीत परत आणून इथेच विकायचा हे काम त्यांच चालेलं. सगळ्यात मुख्य व्यापार होता कापडाचा. भारतातून कापूस नेऊन इंग्लंड मध्ये तयार होत असलेलं कापड भारतीयांना विकल जात होतं. हे सगळ चालायचं मुंबईमधून.

म्हणूनच मुंबई व्यापाऱ्यांच गाव म्हणून नावारुपाला येत होतं.

कुलाब्यामध्ये एका खुल्या मैदानात काही व्यापारी जमायचे आणि वेगवेगळ्या धंद्याची दलाली चालायची. हे ट्रेडिंग मुख्यतः कापसाच असायचं. त्यामुळे त्या भागाला कॉटन ग्रीन असं म्हणायचे. मग याच द्लालातील काही शहाण्या माणसांनी यातून शेअरचा बिझनेस सुरु केला. 

सुरवातीला पाच जण यामध्ये होती. यात चार गुजराती आणि एक पारसी व्यापारी. या ट्रेडर्सनां बसायला ना विशिष्ट अशी जागा होती, ना त्याला काही नियम होते ना काही वेळेची शिस्त होती. युरोपच्या धरतीवर हे शेअर मार्केट सुरु झालं होतं. विशेषतः टाऊन हॉल समोरच्या एका वडाच्या झाडाखाली ते गोळा होत आणि रात्री जेवणाचे टाईम होई पर्यंत हे मार्केट चालायचं.

हळूहळू ब्रोकर्सची संख्या वाढून ६० झाली. ब्रिटीश सरकारने देखील यांच्या ट्रेडिंग वर वचक बसावा म्हणून ब्रिटीश कंपनीज अक्टच्या धर्तीवर भारतीय कंपनीज अॅक्ट १८५० आणला.  या ब्रोकर्सचे नेतृत्व करायचा प्रेमचंद रॉयचंद नावाचा एक गुजराती.

220px Premchand Roychand

वय जास्त नाही विशीतला हा मुलगा. भारतातला इंग्लिश बोलू लिहू वाचू शकणाऱ्या व्यापारांच्यातला पहिल्या पिढीचा प्रतिनिधी. मुंबईच्या शेअर मार्केटचा पहिला अनभिषक्त सम्राट असं त्याला म्हणल गेलं. तो जेव्हा ब्रोकर म्हणून आला तेव्हा मुंबईचं शेअर मार्केट नुकतचं बाळसं पकडत होतं.

पण १८६१ हे वर्ष मुंबईच्या या शेअर मार्केटवाल्यांना वेड लावील एवढा पैसा मिळवून देणार ठरलं. अमेरिकेत सिव्हील युद्ध सुरु झालं होतं. तिथून ब्रिटनला होणारा कापसाचा सप्लाय थांबला. मग इंग्लंडमधील कापड गिरण्या चालवायच्या तर भारतीय कापूस हे एकमेव ऑप्शन उरला होता. याकाळात विदर्भातला कापूस सोन्याच्या किमतीत विकला गेला. गुजराती व्यापाऱ्यांनी प्रचंड पैसा छापला.

इंग्लंडला वाहणाऱ्या या कापसाने मुंबई शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात भांडवल ओतले. या पैशामुळेचं मुंबईमध्ये वेगवेगळ्या बँका फायनान्स कंपनीज उभ्या राहिल्या. याचं काळात मुंबईत अनेक रस्ते बनले, अनेक इमारती उभ्या राहिल्या.  थोडक्यात काय तर मुंबईला आर्थिक राजधानी या अमेरिकन सिव्हील वॉरने बनवले.

मुंबईकरांचा हा शेअर मनियाचा फुगा ज्या वेगाने फुगला तो सिव्हील वॉर संपल्यावर त्याच्यापेक्षा फास्ट फुटला. अमेरिकेतून कमी दराच्या कापसाची निर्यात परत सुरु झाली. युरोपमधून विदर्भाच्या कापसाची मागणी परत होत्या त्या स्थितीला आली. कित्येकजण रस्त्यावर आले. यात सगळ्यात आघाडीला होते ते शेअर ब्रोकर्स. कित्येक सौदे मोडले गेले, अनेकांनी दिवाळ जाहीर केलं. प्रेमचंद रॉयचंद हा सर्वात मोठा ब्रोकरसुद्धा यात संपला. त्याकाळात फक्त वकील लोकांनी पैसा कमावला.

बऱ्याच कंपन्या ब्रिटीश सरकारने अगदी टाकाऊ किमतीत विकत घेतल्या. 

भारतीय शेअर मार्केटसाठी हा सर्वात मोठा धडा होता. मुंबईचे ब्रोकर या निम्मिताने शहाणे झाले. त्यांनी आपली एक असोशिएशन बनवली. झाडाखाली बसून आरडाओरड करत भांडणे करत शेअर विकणे थांबवून एखाद्या व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपले व्यवहार करणे गरजेचे आहे त्यांच्या लक्षात आले होते.

आज दलाल स्ट्रीट म्हणून ओळखले जाते तिथे अॅडव्होकेट ऑफ इंडिया नावाच्या बिल्डींगमध्ये एक हॉल १०० रुपये महिना या किमतीने भाड्याने घेण्यात आला. ‘नेटिव्ह शेअर अ‍ॅण्ड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन  या नावाने संस्था रजिस्टर करण्यात आली.

BSE building

९ जुलै १८७५ हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा अधिकृत वाढदिवस.

सुरवातीला तिथे फक्त मेम्बर्सना प्रवेश मिळायचा, मेम्बरशिपचे कार्ड १५ रुपये भरून मिळायचे. नंतर यात वाढ झाली. या काळात जवळपास ३०० ब्रोकर्स या असोशिएन मध्ये होते. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आणि एकदिवस आज आपण पाहतो ते मुंबईचे प्रचंड मोठे स्टॉक एक्सचेंज उभे राहिले. १९८६ पासून फिरोज जीजीभाय टॉवर मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे काम चालते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.