जत सारख्या दुष्काळी तालुक्याबरोबरच संपुर्ण मराठवाडा सांगलीच्या मदतीला धावलाय..

नदीकाठची माणसं,

सांगली जिल्ह्यात नदीकाठची माणसं म्हणजे एक वर्चस्व असणारी लोकं. शिराळा, वाळवा, पलूस तासगावचा पश्चिम भाग, सांगली मिरज या भागतल्या नदीकाठावर असणारी जमीन म्हणजे सोनं पिकवणारी शेती. एकरभर असणाऱ्याच्या घरात पण इथे टॅक्टर असतो. बुलेट, जीप आणि दोन बैल कायम असणारी माणसं. ऊस आणि दूध हे समीकरण.

कृष्णामाईमुळं या भागात कधीच पाण्याची कमतरता नसते. इथं उसाला पाणी कस लावतात तर रात्रीचं जावून मोटर चालू करुन येतात. सकाळ झाली की मोटर बंद करायची. रात्रभर मोटर चालू. अति पाण्यामुळं क्षारपड जमीनीच प्रमाण अलिकडच्या काळात वाढलं असलं तरी नदीकाठचां म्हणून जो बाज आबा आज्याचा होता तो आजही आहे. 

दूसरीकडे सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग.

तासगाव पुर्व भाग, विटा, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज पुर्व हि सांगलीच्या पुर्वभागातले दुष्काळाचे पट्टे. जत मध्ये पावसाळ्यात देखील पाणी मिळत नाही. इथे दहा एकर वाला देखील कर्जबाजारी असतो. विटा, आटपाडी भागातून दुष्काळामुळे भारतभर पसरलेले गलाई कामगार तर आपल्याला माहितच आहेत. 

आत्ता दूसरी गंमत म्हणजे नदीपट्ट्यातले पाहूणे नदीपट्ट्यातच आणि घाटावरचे म्हणजे दुष्काळी पट्यातले पाहूणे दुष्काळी पट्ट्यातच अस इथे चित्र असतं.

आजही दुष्काळी पट्ट्यात मुली द्यायला इथली नदीकाठची लोक तयार होत नाहीत हे वास्तव. उदाहरण देवून सांगायचं झालं तर बहे आणि देवराष्ट्रे हे अंतर वीस एक किलोमीटरच असेल पण एक गाव नदिकाठावर तर एक दुष्काळात. या गावात सोयरिक कमीच. पण देवराष्ट्रेतल्या लोकांचे विटा, आटपाडी भागात पाहूणे असतील तर बहे गावातल्या लोकांचे पार जयसिंगपूर पर्यन्त पाहूणे असतील.

अस इथलं नदीने ठरवलेले नातेसंबध. 

हे यासाठीच सांगायच होत कारण पुर्व आणि पश्चिम भाग एकत्र यायची उदाहरण खूप कमी घडतात.

पण सांगली जिल्ह्याच वैशिष्ट अस की जेव्हा जेव्हा नदिकाठच्या लोकांवर संकट आलं तेव्हा दुष्काळी भागातली लोक त्यांच्यासाठी धावून गेली. आणि जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा चाऱ्यापासून ते पाण्यापर्यन्त सर्व गोष्टी हा नदीकाठ करतो. कृष्णा नदीचं पाणी उचलून घाटमाथा हिरवागार करण्याच काम झालं तेव्हा आमचं पाणी पळवलं म्हणून दंगा करणारे दोन चार लोकं सोडली तर संपुर्ण नदीपट्याने या योजनेचं स्वागतच केलं. 

२००५ साली आलेल्या पुरात नदीकाठच्या लोकांच्या मदतीला दुष्काळी भागातली लोकं धावून गेली होती. दुर्देवाने आज देखील असाच पुर आला आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे आज देखील दुष्काळी भागातली लोक या नदीकाठच्या माणसांसाठी धावून जात आहेत. 

आज जत तालुक्यात २३ चाराछावण्या चालू आहे. तालुक्यामधल्या ८७ गावांना या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा टॅंकरपुरवठा करण्यात येत आहे. एका बाजूला पूर तर दुसऱ्या बाजूला असणार दुष्काळाच हे चित्र. अशा काळात जतच्या ग्रामस्थांनी एकत्र येवून मदत करण्यास सुरवात केली आहे.

काल दिनांक ८ ऑगस्ट रोजी जत ग्रामस्थांनी दोन ट्रक भरून सामान सांगली शहरासाठी पाठवलं. अंथरुण-पांघरुण-कोरडे अन्नपदार्थ यांपासून ते कपड्यांच्या स्वरुपात हि मदत करण्यात येत आहे. शक्य तिथे पैशाच्या स्वरुपात देखील मदत करत आहेत. 

या मदतीच्या पार्श्वभूमीवर बोलभिडूने जत शहरातील ग्रामस्थांना फोन केला, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, 

“आमच्याकडे आजही दुष्काळ चालूय. ओला चारा मिळत नाही. वास्तविकता अशी की अपवाद सोडले तर नदीकाठची माणसं मागे उभा राहतात. घाटावरची माणसं कमीतली समजण्याची मानसिकता आहे. दुष्काळात आम्हाला मदत मिळावी म्हणून मागणी करत असतो. त्यामुळे दोन्ही भागांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसा चांगला नाही. पण हे कुठतरी संपाव आपली माणसं मरताना आम्ही पाहू शकत नाही म्हणून सगळे जतचे ग्रामस्थ एकवटले आहे. जे काही मिळेल ती मदत सध्या आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय.”

काल जतच्या तहसिलदारांकडे मदत सुपूर्त करण्यात आली. जत शहराबरोबर तालुक्यातील तरुण आघाडीवर आहेत. प्रत्येकजण आपआपल्या घरातून शे-दोनशे रुपयांपासून मदत करतोय. दुष्काळात एकत्र असणार गाव आज सांगलीच्या मदतीला देखील धावून चाललं आहे ते पाहून समाधान वाटतय. 

नाव न छापण्याच्या अटीमागचं कारण आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, 

“अहो इथं एक माणूस नाही. आम्हाला बातम्या पण नकोत. या हाताच त्या हाताला कळून न देता आम्हाला काम करायचं आहे. आम्ही तेच करतोय. माणसांच म्हणाल तर सगळी जतची माणसं आज उभा राहिल्यात.”

असच उदाहरण द्राक्षभूमी संस्थेचं.

तासगाव पुर्व भागातल्या या संस्थेने मदत तहसिलदारांकडे पाठवली. द्राक्षभूमी हि सहकारी संस्था द्राक्ष बागायत करणाऱ्या तरुणांनी उभा केली आहे. द्राक्ष पिकासंबधित ती काम करते.

या संस्थेच्या अभिजीत झांबरे यांना फोन लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की, 

आज भेदभाव नाही. आम्हाला फक्त मदत करायची आहे. जिल्ह्यातील लोक एक आहोत आणि एकच राहू. आम्ही संस्थेमार्फत शक्य ती मदत गोळा करतोय. पूरातून बाहेर काढलेल्या लोकांना अंथरुण पांघरूणा सोबत खाण्याच्या पदार्थांची देखील गरज आहे. लोकांना निवाऱ्याची सोय करण्यासाठी देखील आम्ही पुढाकार घेणार आहोत.

आत्ता मुद्दा मराठवाड्याचा. 

मराठवाड्यातून मदतीसाठीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोशल मिडीयावर बीडकर, लातूरकर, उस्मानाबादकर असे वेगवेगळे समुह मदत करत आहेत एकट्या बीड शहरातून बारा जणांच्या रंकाळा ग्रुपने सकाळपासून दोन ट्रक सामान सांगलीला रवाना करत आहेत. त्या ग्रुपच्या संदिप लावंड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,

आमचा बीडमध्ये फिरायला जाणारा बारा जणांचा ग्रुप आहे. यातील एकजणांना रंकाला आवडत असल्याने ग्रुपच नाव रंकाळा पडलं. आज सकाळी आम्ही काहीतरी मदत करण्याच्या विचार केला. आमच्या पातळीवर पैसे आणि मदत गोळा झाली पण बघता बघता गर्दी वाढली आणि सामान्य बीडकर देखील मदतीसाठी धावून आले.

ते म्हणाले की,

आम्ही जिथे होतो तिथे सहा सफाईकामगार महिला आपल्या कामाच्या मागणीसाठी उपोषणाला बसल्या होत्या. त्या जवळ आल्या आणि त्यांनी कशासाठी मदत गोळा करताय अस विचारलं. महापूराचं सांगताच त्या सहा जणींनी दहा दहा रुपये गोळा केले आणि दिले. आत्तापर्यन्त ४ हजार पाण्याच्या बाटल्या आणि १ हजार बिस्किटचे पुडे आहेत. मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. अशीच स्थिती संपुर्ण मराठवाड्याची आहे. प्रत्येक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू आहे.

महापूराच्या मदतीला धावून येतो कोरडा दुष्काळ. राजकारण माणसाला वेगळं करत, फुट पाडतं माणसांमध्ये. संकट माणसांना एकत्र आणतं. राजकारण हे संकटापेक्षा मोठ्ठ संकट आहे. अशा वेळी राजकारणाच्या पलीकडे बघण्याची, समस्येकडे माणूस म्हणून बघण्याची शक्ती आपणा सगळ्यांना मिळो. जत सारखी मराठवाड्यासारखी माणसं वाढोत.

 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.