सलमान खुर्शीद म्हणतायत त्याप्रमाणे हिंदुत्व आक्रमक झालंय का ?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद सुरूय. सनराईज ओव्हर अयोध्या, नेशनहूड इन अवर टाईम्स असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यात एक प्रकरण आहे द सॅफ्रॉन स्काय नावाचं. पान क्रमांक ११३ पासून होणाऱ्या या प्रकरणात खुर्शीद साहेब म्हणतात,
ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व, गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.
या मुद्द्यावरून सलमान खुर्शिद यांच्यावर टीका केली जात आहे.
मग इथं काही मुद्दे उपस्थित होतात त्याप्रमाणे ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म नक्की होता तरी कसा ? हिंदू धर्माविषयी कुठं लिहून ठेवलंय का ? हिंदू धर्म समजून घ्यायचा असेल तर काय वाचावं ? आताचा हिंदू धर्म आक्रमक झालाय का ? खुर्शीद म्हणतात त्यात काही तथ्य आहे का ?
तर समजा तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व्यक्तीला विचारलंत कि बाबा रे हिंदुत्व आणि हिंदुइजम म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला उत्तर मिळेल हिंदुत्व आणि हिंदुइजम हे एकच आहेत. किंवा मग हिंदुत्व हे खरे तर एक सुपरसेट आहे ज्यामध्ये राजकारण आणि अर्थशास्त्र समाविष्ट आहे. तर हिंदुइजम हा धर्म आणि संस्कृतीपुरता मर्यादित आहे.
आता हेच जर तुम्ही जर तुम्ही एखाद्या मार्क्सवादी इतिहासकाराला, किंवा उदारमतवादी, नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या लोकांना विचाराल, तर ते म्हणतील, हिंदुत्व हे उच्चवर्णीय, उच्च आणि मध्यमवर्गीय हिंदूंची फॅसिस्ट राष्ट्रवादी, जातीय वर्चस्ववादी, पितृसत्ताक दुराचारवादी, जातीयवादी शक्ती आहे. हे हिंदुत्व भारताला स्वत:च्या बरोबरीने एकरूप करण्यासाठी डिझाइन केलेल आहे. थोडक्यात हिंदू राष्ट्राची कल्पना. आणि याच गटात मोडतात सलमान खुर्शीद.
या दोन उदाहरांवरून हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की, हिंद्त्वाबद्दलच्या प्रत्येकाच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. आता या बोलण्याला तुम्ही आधार मागत असाल तर एक लक्षात घ्या, कोणाला ख्रिस्ती धर्म समजून घ्यायचा असेल तर ते बायबल वाचू शकतात. इस्लामबद्दलची माहिती कुराण वाचल्यास मिळते. पण हिंदू धर्म जाणून घ्यायचा असेल तर असं कोणतंही शास्त्र नाही. कारण हिंदू धर्म हा कोणत्याही शास्त्रावर नव्हे तर लोकांच्या विश्वासावर आधारलेला धर्म आहे. या धर्माचा मौखिक परंपरेवर विश्वास आहे.
हिंदू धर्माबद्दल लिहिणारे देवदत्त पटनाईक म्हणतात,
उत्तर भारतातला हिंदू धर्म वेगळा आहे. दक्षिण भारतातला वेगळा आहे. पाचशे वर्षांपूर्वीचा हिंदू धर्म आणि आजचा हिंदू धर्म वेगळा आहे. प्रत्येक जात, प्रांत, भाषा या सगळ्यांत हिंदू धर्माची रूपं वेगवेगळी आहेत. ती विविधताच बहुतांश लोकांच्या आकलनाच्या बाहेरची असते. हिंदू धर्माबद्दल हजारो वर्षांपासून अनेक गैरसमज आहेत. मुसलमान भारतात आले त्यांनी हिंदूंना मूर्तिपूजक म्हटलं आणि मूर्तिपूजेवर टीका केली. त्यांना वाटलं की मूर्तिपूजा हाच हिंदू धर्म आहे.
इंग्रज आले तेव्हा त्यांनी हा धर्म म्हणजे ‘अनेकदेववाद’ असल्याचं म्हटलं आणि त्यात काही अर्थ नसल्याचं सांगत एकेश्वरवाद हेच सत्य असल्याचं सांगू लागले. त्यामुळे भारतीयांवर दबाव आला. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळातील लिखाणात तो दिसतो. त्या काळातलं, भारतीय बुद्धिजीवी वर्गाचं लेखन वाचलं तर ते एक प्रकारे बचावाच्या पवित्र्यात असल्यासारखे दिसतात.
ब्रिटिशांच्या काळातले बहुतेक बुद्धिजीवी ते जे सांगतील ते मानत होते. त्यांनी हिंदू धर्म समजून घेण्याऐवजी त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली. सगुण भक्तीवर टीका, निर्गुण भक्तीचं कौतुक, मूर्तिपूजा, रितीरिवाजांवर टीका हेच त्यांच्या लिखाणात दिसत होतं. त्यांनी पाश्चात्य धर्मांशी हिंदू धर्माची तुलना करण्यास सुरुवात केली. पाश्चात्य धर्माचं शास्त्र आणि नियम स्पष्ट होते. एक प्रकारची सुधारणांची मोहीमच सुरू झाली.
हिंदू धर्माला विशिष्ट रूप देण्याचं काम २०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी केलं. हे काम सुरू असताना त्यांचा जो काही अभ्यास होता तो राजकारणानं भारलेला होता. त्यांना ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मापेक्षा वरचढ असल्याचं दाखवायचं होतं. पुढं पटनाईक म्हणतात, हळूहळू जग धर्मनिरपेक्षतेकडे सरकू लागलं होतं. त्यावेळी इंग्रज विद्वानांची जागा डाव्या विचारवंतांनी घेण्यास सुरुवात केली.
डावे लोक धर्म मानतच नाहीत. त्यामुळे त्यांनी धर्मावर टीका केली. हिंदू धर्मावर तर त्यांचा जास्तच रोष होता. त्यांच्या लिखाणातून ते धर्माचं विश्लेषण करत नाहीत तर त्याबद्दल लोकांना समजावून सांगत आहेत, असंच वाटतं. शिवाय पुस्तकांच्या माध्यमातून एक प्रकारची मोहीम चालवत असतात.
ही विचारधारा हिंदू धर्माला केवळ महिलाविरोधी, जातीयवादी मानते आणि हिंदू धर्मातल्या महत्त्वाच्या गोष्टी जसं की वेद, यांना एक प्रकारची फसवणूक मानते. डावे विचारवंत असं समजावून सांगतात की, वेद आणि भारतीय दर्शन शास्त्र हे हत्तीच्या दातांसारखं म्हणजे फक्त दाखवण्यासाठी आहे. हिंदू धर्माचा खरा चेहरा हा जातीयवादीच आहे.
कोठेही गेलो की हिंदू धर्माविषयी लोक दोनच गोष्टी बोलत असल्याचं कानावर येतं. एक म्हणजे हिंदू मूर्तिपूजक आहेत आणि दुसरं म्हणजे ते जातीयवादी आहेत. धर्माला नागा साधूंशी, संन्याशांशी जोडण्यात येतं. एक प्रकारे हिंदू धर्म हा विचित्र असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे हिंदू धर्म मानणाऱ्यांना त्याचं वाईट वाटतं.
आणखी एक गोष्ट सांगितली जाते की, हिंदू धर्मात स्वत:चे मूळ विचार नाही. सर्व विचार युनानी, तुर्की, फारसी, इंग्रज यांच्याकडून आले आहेत. हाही एक बुद्धिजीवींनी पसरवलेला विचार आहे. आता तर अमेरिका योग वर हक्का सांगू लागली आहे. हिंदू धर्म आणि भारत यांचा काही संबंध नाही असं सांगितलं जात आहे. जेव्हा अशाप्रकारे जाणूनबुजून, सातत्याने एखाद्या श्रद्धास्थानावर हल्ला केला जातो तेव्हा राग येणं स्वाभाविक आहे.
बुद्धिजीवी असं मानतात की, हिंदू धर्मात कोणालाही पाप करण्यापासून रोखण्याची काही व्यवस्था नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी योग्य म्हणतो की अयोग्य यानं काय फरक पडतो? जर हिंदूंना असं वाटतं की त्यांच्या धर्माबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, तर तो एक विरोधाभास असून सत्य नाकारण्यासारखं आहे. असं ऐकलं की हिंदूंचा राग आणखी वाढतो.
एकूणात, हिंदुत्व चुकीचं आहे असं मानून तो धर्म समजून घेण्याऐवजी धर्म सुधारण्याचा प्रयत्न करतात, याचा लोकांना राग येतो. कधी तरी लोकांना राग येणारच होता. गेली १०० वर्ष ही परिस्थिती कायम आहे. आता तो राग प्रकर्षानं समोर आला आहे. पण भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे ते लक्षात ठेवायला हवं.
जेव्हा राग येतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते आणि हेच आपल्याला चारीबाजूंना दिसत आहे.
त्यामुळे सलमान खुर्शीद हे एका विचारसरणीला धरून बोलताना आपल्याला दिसतात. आणि हिंदू धर्मीय त्यावर व्यक्त होतात, आणि मग धर्म आक्रमक असल्याचं दिसत. आता हे वाचून तुम्ही काय शिकलात हे माहित नाही. पण तुमची आक्रमकता धर्माला वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवते याचा प्रत्येक हिंदूने विचार केला पाहिजे.