नाशिकचा जन्म, ठाण्यातून आमदार; जितेंद्र आव्हाड यांचा राजकारणातला प्रवास असा आहे

राज्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून एक नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड.

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती आधारलेला हर हर महादेव हा ऐतिहासिक सिनेमा वादात सापडला आहे. वादामागचं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे असा आरोप ठाण्याचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

आव्हाड यांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला. इथपर्यंत सगळं ठीक होतं परंतु ७ नोव्हेंबरला ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चित्रपट सुरु असतांना जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करून थिएटरमधून हुसकावून लावलं असा आरोप मनसेने केला होता. 

विवियाना मॉलच्या घटनेमुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

या खटल्यात ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना शनिवारी अटक केली आणि रविवारी त्यांची जामिनावर सुटका केली होती. पण आज पुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारण एका महिलेने आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावला आहे. एका कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून धक्का दिला होता, असा आरोप त्या महिलेने केला आहे. यावरूनच पोलिसांनी आव्हाडांच्या विरोधात कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

तीन दिवसांमध्ये दाखल करण्यात आलेले हे दोन्ही गुन्हे खोटे असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं आहे आणि या प्रकरणामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक राजकीय नेते त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर आव्हाड खरंच कोणतं पॉल उचलतात ते वेळ आल्यावर कळेलच.

परंतु राजीनाम्यामुळे चर्चेत आलेले जितेंद्र आव्हाड राजकारणात कसे आले यामागचा इतिहास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.

जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र ठाण्याच्या राजकारणात इतके महत्वपूर्ण नेते असलेले जितेंद्र आव्हाड हे काही मुळचे ठाण्यातले नाहीत. त्यांचा परिवार हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ता गावचा आहे.

दुष्काळी भाग असलेल्या सिन्नर तालुक्यातून अनेक लोकांनी मुंबई आणि ठाणे या भागात स्थलांतरण केलं होत. या स्थलांतरांमध्येच आव्हाड यांचे वडील सतीश आव्हाड हे कुटुंबासह ठाण्यात स्थलांतरित झाले. सुरुवातीला ते ताडदेव येथील श्रीपत भवन चाळीत राहत होते.

सतीश आव्हाड हे सुरुवातीला गिरणी कामगार म्हणून काम करत होते. तसेच मुकुंद या स्टील उत्पादनं बनवणाऱ्या कंपनीत सुद्धा त्यांनी काम केलं होतं. एकदा कंपनी आणि मजुरांमध्ये काही कारणावरून मतभेद निर्माण झाले होते. तेव्हा सतीश आव्हाड यांनी कामगारांसाठी लढा उभारला होता. 

वडिलांचा हाच गुण जितेंद्र आव्हाड यांनी स्वीकारला आणि विद्यार्थीदशेतच राजकारणात पाऊल ठेवलं.

आव्हाड यांनी राजकारणात पहिलं यश मिळवलं ते सेंट जॉन स्कुलच्या पार्लियामेंट निवडणुकीत. १९७९ मध्ये दहावीत असताना ते स्कुलचे पंतप्रधान झाले होते. त्यानंतर १९८०-८१ मध्ये ज्युनिअर कॉलेजमध्ये असतांना ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले. याच माध्यमातून १९८२ मध्ये कॉलेजने वाढवलेल्या फी च्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं. तर १९८७-८८ मध्ये आव्हाड हे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्रतिनिधी म्हणून निवडून गेले होते. 

युवक काँग्रेसमधून राजकारणात पाऊल ठेवणारे आव्हाड हे १९८०-८७ पर्यंत ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. १९८८-९३ दरम्यान ते एन. यु. एस. आय. विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. तर १९९३-९८ दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं.

दोन दशकं काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणारे आव्हाड १९९९ मध्ये शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

१९९९ ते २००८ पर्यंत राष्ट्रवादीच्या युवक आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या आव्हाडांना २००२ आणि २००८ मध्ये दोन वेळ विधानपरिषद आमदार म्हणून निवडण्यात आलं होतं. दुसऱ्यांदा विधानपरिषद आमदार असतांना २००९ च्या विधासभा निवडणुकीत आव्हाड यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

२००९ मध्ये शिवसेनेचे राजन किणे यांना १५ हजार ६८९ मतांनी हरवलं आणि पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २००९ नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सुद्धा त्यांनी विजय मिळवला आणि मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवलाय. मतदारसंघ राखण्यासोबतच निवडून येण्याच्या टक्केवारीत सुद्धा वाढ झालीय.

जितेंद्र आव्हाडांना २००९ मध्ये ६१ हजार, २०१४ मध्ये ८६ हजार तर २०१९ मध्ये १ लाख ९ हजार मतं मिळाली आहेत. यावरून मतदारसंघात त्यांचा वाढलेला प्रभाव स्पष्ट दिसतो. 

तीनदा विधानसभेवर निवडून जाणारे आव्हाड  हे दोनदा मंत्री सुद्धा राहिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा विधानपरिषदेवर गेलेल्या आव्हाडांनी वेगवगेळ्या समित्यांच अध्यपद सांभाळलं आहे. २००८-०९ मध्ये ते विधान परिषदेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद होते तर २०१४-१९ दरम्यान विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय. याचदरम्यान मे २०१४ ते सप्टेंबर २०१४ या काळात ते राज्याचे फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री सुद्धा होते.

मुस्लिमबहुल मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार असलेले आव्हाड २००८ मध्ये मदरसा बोर्ड समितीचे सदस्य सुद्धा होते. २०१५ मध्ये राज्यातील दहीहंडी सणाला जागतिक करण्यासाठी स्पेनचा अभ्यासदौरा सुद्धा केला होता. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये आव्हाडांना गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक विकास मंत्रिपद देण्यात आलं होतं.

आव्हाडांना देण्यात आलेले मंत्रिपद हे ठाणे जिल्ह्याबरोबरच नाशिक जिल्हा आणि वंजारी समाजासाठी सुद्धा महत्वपूर्ण होतं.

आव्हाड यांचं कुटुंब जर ठाण्यात स्थलांतरित झालं असलं तरी त्यांची नाशिकशी असलेली नाळ तुटलेली नाही. त्यांचे नातेवाईक आणि नाशिकच्या जनतेशी असलेला त्यांचा संबंध बराच घट्ट आहे. तसेच आव्हाड हे वंजारी समाजातून असल्यामुळे याचं पाठबळ सुद्धा त्यांना आहे. नाशिकच्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. तसेच नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये त्यांच्या संस्थांची अनेक महाविद्यालयं सुद्धा आहेत.

आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळेच आव्हाडांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शरद पवारांबद्दल बोलतांना आव्हाड अनेकदा भावनिक होतात, “शरद पवार यांच्यामुळेच एका साध्या गिरणी कामगाराचा मुलगा मंत्रिपदापर्यंत पोहचू शकला.” असे ते सांगतात.

जितेंद्र आव्हाड यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने जेष्ठ पत्रकार रवींद्र पोखरकर यांच्याशी संपर्क साधला.

ते सांगतात की, “जितेंद्र आव्हाड हे सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत होते त्यामुळे त्यांचं राजकारण कायम पुरोगामी विचारांवरच आधारलेलं राहिलेलं आहे. आव्हाड मुळात ठाण्याचे जरी नसले तरी ठाण्यातल्या स्थानिक भूमिपुत्रांना महानगरपालिकांमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी ते आघाडीवर आहेत. त्यामुळेच आव्हाड यांची लोकप्रियता मतदारसंघात वाढलेली आहे.”

पुढे ते सांगतात की, “एक सामान्य आमदार असतांना त्यांनी सुद्धा मुंब्रा कळवा रेल्वे स्टेशन विकसित केला. मतदार संघातील रस्त्यांचं रुंदीकरण आणि बांधकाम केलं. हा मतदारसंघ धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आहे. इथे पूर्वी दंगली व्हायच्या, परंतु आव्हाड यांनी इथे सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन अनेक विकासकामे केली, धार्मिक सहिष्णुता निर्माण केली, रोजगार मेळावे घेतले त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मुंब्रा-कळवा भागाचा विकास झाला आहे.” असं रवींद्र पोखरकर यांनी सांगितलं.

जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींचे अनेक मुद्दे मांडलेले आहेत. राज्यात ओबीसी मुख्यमंत्री व्हावा असं विधान सुद्धा त्यांनी केलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी विद्यार्थीदशेत राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या आव्हाड यांनी ठाण्यात राष्ट्रवादीला मजबूत करण्याचं काम केलाय. प्रतिस्पर्धी शिवसेनेचा बालेकिल्ला गेली ३ वेळ जिंकून मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.