अमेरिकेला नाचवणारा बोस स्पिकर एका भारतीय माणसाने बनवलाय

गल्ली असो वा दिल्ली, लगीनघाई असो की गणपती, नेत्याची प्रचारसभा असू दे नाही तर विजयानंतरचा धुमधडाका स्पिकरशिवाय कार्यकर्त्यांना जोश येत नाही. डिजेला आईची शपथ घालून घालून आवाज वाढवला जातो, पोलीस मामा काठी घाले पर्यंत नाचून नाचून पोरं राडा करत्यात.

कोल्हापुरात तर स्पीकरला परवानगी दिली नाय यावरून सरकारे पडत्यात. एक स्पिकर सगळा देश हलवून सोडतो.

पण तुम्हाला महित आहे काय भारताच्या माणसाने शोधलेला स्पिकर अख्खी अमेरिका नाचवतो?

बोस स्पिकर त्याच नाव आणि बनवणारा होता अमर गोपाळ बोस.

सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगणारी बंगालची बोस फॅमिली. अमर यांचे वडील नोनी गोपाळ बोस हे देखील एक स्वातंत्र्यसैनिक होते. एकोणिशे वीस च्या दरम्यान त्यांना अटकेचे आदेश देण्यात आले होते.

सुभाषबाबूंच्या प्रमाणे गोपाळ बोस यांनी ब्रिटिशांना झुकांडी दिली व वेषांतर करून भारतातून पळाले.

सुभाषबाबू जर्मनीला गेले होते तर गोपाळ बोस पोहचले अमेरिकेला. तिथे भेटलेल्या शारलेट नावाच्या मुलीशी लग्न केलं व तिथेच आपला संसार थाटला.

गोपाळ बोस यांची ही अमेरिकन बायको एक टीपीकल सोज्वळ भारतीय गृहिणी बनली. शारलेट लग्नानंतर शाकाहारी बनली व तिने आयुष्यभर हिंदुधर्माचे आचरण केले.

अशा या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे अमर बोस.

२ नोव्हेंबर १९२९ साली फिलाडेल्फिया शहरात त्यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासून हे पोरगं खटपट्या होतं. गणितापासून ते सायन्स पर्यंत प्रत्येक गोष्टीत डोकं सुपीक.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी आपल्या शाळेतल्या मित्रांना सोबत घेऊन रेडिओ दुरुस्तीचा बिझनेस सुरू केला.

वय वर्षे १३ वर्षांचा हा पोरगा आपली पॉकेटमनी सोडून घरखर्चालाही देता येतील एवढे पैसे कमवत होता.

कॉलेजसाठी त्यांची अमेरिकेतील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये निवड झाली. तिथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग केले. एक वर्ष नेदरलँड तर एक वर्ष दिल्लीमध्ये राहून संशोधन केले.

एमआयटी मध्ये परत गेल्यावर आपली पीएचडी पूर्ण केली व तिथेच प्रोफेसरपदाच्या नोकरीला लागले.

कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना व्हायोलिन वाजवण्याची आवड होती. पण त्याकाळचे स्पिकर व साउंड सिस्टीम यावर त्यांचा काडीचाही विश्वास नव्हता. याच व्हायोलिन प्रेमातून ते स्पिकरच्या संशोधनात पडले.

साउंड टेक्नॉलॉजीवर त्यांनी गाढा अभ्यास केला. विशेषतः अकॉस्टिक्सवर त्यांनी केलेलं संशोधन बरंच गाजलं.

स्टिरिओ लाऊडस्पीकरवरच्या त्यांच्या रिसरचवर त्यांना दोन पेटंट देखील मिळाले. पण अमर बोस हे फक्त एक संशोधक प्रोफेसर होते अस नाही तर त्यांच्याकडे बिझनेसमन होण्याचं डोकं देखील होतं.

आपल्या प्रोफेसर यांनी केलेल्या एंजल इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने त्यांनी अमेरिकेत बोस कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली. ते साल होत १९६४. पुढच्या दोनच वर्षात त्यांनी आपला पहिला बोस स्पिकर बाजारात आणला.

या बोस स्पिकरने काही दिवसातच अमेरिकेला वेड लावलं.

आकर्षक स्पीकर्स, रेडियो, कार सस्पेन्शन सिस्टीम, हेड फोन्स याबरोबरच अनेक दर्जेदार उत्पन्नांमुळे बोस कंपनीने जगभरात आपला दबदबा निर्माण केला.

एका भारतीय कॉलेज मास्तरने बनवलेली ऑडिओ कंपनी हजारो कोटींची बनली.

जवळपास ४५ वर्षे अमर बोस यांनी ही कंपनी सांभाळली, मोठी केली. आपल्या रिटायरमेंट नंतर २०११ मध्ये त्यांनी या कंपनीचे बहुतांश शेअर्स एमआयटी शिक्षणसंस्थेला दिले. त्या शेअर्समधून मिळणारा लाभांश शिक्षण आणि संशोधनावर खर्च केला जात आहे.

४० वर्षे जिथे शिक्षक म्हणून शिकवलं त्या एमआयटीला हे दान देऊन बोस यांनी आपल्या दानशूरपणाचेही दर्शन साऱ्यांना घडवले होते.

बोस यांनी त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिकन कला व विज्ञान अकादमी तसेच राष्ट्रीय अभियांत्रीकी अकादमीचे ते सदस्य होते.

१२ जुलै २०१३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

आजही ९ हजार अमेरिकन कर्मचारी या कंपनीत काम करतात. जगातील सर्वात दर्जेदार साउंड सिस्टीम मध्ये बोस कॉर्पोरेशनचा नंबर वरचा लागतो. सहाजिकच त्यांचे प्रोडक्ट महाग असतात.

याच कारणामुळे भारतात सुरवातीला बोसचे सिस्टीम दिसत नव्हते असले तर बॉस, बास असे त्यांच्या नावाचे ड्युप्लिकेट स्पिकर, हेडफोन असायचे.

मात्र आजकाल गल्लीतल्या मंडपातही ओरिजिनल बोसचा स्पिकर दणाणून सोडत असला तर आश्चर्य वाटायला नको. फक्त पुढच्या वेळी बोस स्पिकर दिसला तर कॉलर ताठ करून अमेरिकेला नाचवणारा स्पिकर एका बॉस भारतीय माणसाने बनवलाय हे सांगायला विसरू नका.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.