शम्मी कपूर आणि वहिदा रहमान दोघेही ग्रेट होते, पण एकदाही सिनेमात एकत्र काम केलं नाही
हिंदी सिनेमाच्या दुनियेत समकालीन असून देखील एकत्र काम न करू शकणारे अनेक जोड्या आहेत. एकाच काळात एकाच क्षेत्रात असून देखील त्यांना निर्मात्याने एखाद्या चित्रपटात एकत्र का घेतले नाही हा प्रश्नच आहे.
चाळीसच्या दशकामध्ये कुंदनलाल सहगल आणि नूरजहाँ टॉपचे कलाकार होते.
परंतु या दोघांनी एकत्र कधीच काम केले नाही. या दोघांना एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव आला होता. परंतु त्यापूर्वीच कुंदनलाल सहगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाल्यामुळे व लगेच भारताची फाळणी झाल्यामुळे नूरजहाँ पाकिस्तान आणि निघून गेली आणि हा चित्रपट केवळ कागदावरच राहिला. याच चित्रपटाचे कथानक घेऊन पुढे गुरुदत्त यांनी १९६० साली ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट बनवला होता!
पन्नासच्या दशकात दिलीप कुमार आणि नूतन हे कधीच एकत्र आले नाही खरं तर दोघेही आघाडीचे कलावंत होते. परंतु योग मात्र एकत्र काम करण्याचा आलाच नाही. याच दशकात या दोघांना घेऊन रमेश सैगल यांनी ‘शिकवा’ या नावाच्या चित्रपटाची सुरुवात केली होती पण काही कारणाने हा चित्रपट बनला नाही, डब्यात गेला.
त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी म्हणजे १९८६ साली सुभाष घई यांनी दोघांना ‘कर्मा’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र आणले! प्रत्येक दशकात अशी उदाहरणे सापडतात सत्तरच्या दशकात राजेश खन्ना आणि जया भादुरी भलेही ‘ऋषिकेश मुखर्जी यांच्या बावर्ची’ या चित्रपटात एकत्र आले असले तरी त्या चित्रपटात जया काही राजेशची नायिका नव्हती.
त्यामुळे नायक नायिका म्हणून जया भादुरी आणि राजेश खन्ना कधीच एकत्र आले नाही.(जितेंद्र आणि स्मिता पाटील, अमिताभ आणि रीना रॉय असे बरीच उदाहरणे सापडतील) साठच्या दशकात शम्मी कपूर बॉक्स ऑफिस वरील सुपरहिट अभिनेता होता. प्रत्येक नायिका त्याच्यासोबत काम करायला उत्सुक असायची.
बऱ्याच नायिकांचा तर पहिला चित्रपट शम्मी कपूर सोबत होता आणि त्या नायिकांनी पुढे मोठी अभिनयाची इनिंग खेळली. आशा पारेख सोबतचा ‘दिल देखो देखो’ शर्मिला टागोर सोबतचा ‘कश्मीर की कली’ आणि कल्पना सोबतच ‘प्रोफेसर’ ही त्याचीच उदाहरणे! त्याच प्रमाणे याच काळात वहिदा रहमान सुध्दा आघाडीची अभिनेत्री होती.
दिलीप कुमार (दिल दिया दर्द लिया), राजकपूर (तिसरी कसम) देव आंनद (गाईड) या त्रिदेवा सोबतच त्या काळातील हरेक अभिनेत्यासोबत नायिका महणून रुपेरी पडद्यावर चमकली.
परंतु वहिदा रहमान ला शम्मी कपूर सोबत नायिकेची भूमिका करायला मिळाली नाही. ही जोडी एकाही सिनेमात एकत्र आली नाही. कां? याला उत्तर नाही. दोघेही परस्परांसोबत काम करायला खूप उत्सुक होते पण योग आला नाही. या दोघांची केमिस्ट्री काही प्रेक्षकांना पहाता आली नाही. या दोघांनी एकत्र यावे असा प्रयत्न देखील कधी झाल्याचे आठवत नाही. त्यामुळे वहिदा ला कायम आपण काहीतरी मिस केले आहे असे वाटायचे.
सत्तरच्या दशकामध्ये मनमोहन देसाई ‘नसीब’ हा चित्रपट बनवत होते.
या चित्रपटात एक गाणे होते ‘जॉन जॉनी जनार्दन तर्रम पम पम पम’ या गाण्यात मनमोहन देसाई यांना बॉलीवूडमधील अनेक कलाकार चमकवायचे होते. खरंतर ‘धरम वीर’ या त्यांच्या चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव झाला होता आणि त्याच्या पार्टीच्या वेळी अनेक कलावंत उपस्थित राहणार होते.
मौका साधून म्हणून देसाई यांनी वरील गाणे चित्रित करायचे ठरवले. त्यावेळी त्यांनी वहिदा रहमान हिला देखील फोन केला आणि या गाण्याच्या चित्रीकरणात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.
वहिदाने विचारले, “आणखी कोण कोण स्टार येत आहेत?” त्यांनी कलावंतांची नावे सांगायला सुरुवात केली आणि ज्यावेळी शम्मी कपूरचे नाव त्यांच्या तोंडातून आले त्यावेळी ती म्हणाली,” बास बास बास… जर तुम्ही शम्मी कपूर सोबत माझी एन्ट्री करणार असाल तर मी चित्रीकरणाला नक्की येईल!”
मनमोहन देसाई यांनी होकार दिला आणि या गाण्यांमध्ये शम्मी कपूर आणि वहिदा रहमान हातात हात घालून पार्टीला एकत्र एन्ट्री घेतात असा शॉट घेतला. नायक नायिका म्हणून जरी ते एकत्र आले नसले तरी या गाण्यात त्याच स्टाईलने ते दिसतात.
पुढे १९८६ साली मनमोहन देसाई यांचे पुत्र केतन देसाई यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला ‘अल्लारखा’. या सिनेमात शम्मी कपूर आणि वहिदा रहमान यांनी एकत्र भूमिका केल्या. पण वहिदाचे चे दुर्दैव चरित्र भूमिकेत देखील या सिनेमात तिचा नायक शम्मी कपूर नव्हता तर विश्वजित होता. तिने तिच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे!
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- मुख्यमंत्री होण्यासाठी जांबुवंतराव धोटे सिनेमात हिरो झाले परंतु झालं भलतंच…
- आमिर खानचा पिक्चर हिट होण्याचा मनस्ताप, मुंबईच्या लेडी डॉक्टरांना झाला होता..
- झुंड असो किंवा पावनखिंड, पिक्चरच्या १००-२०० कोटी कमाईमागचं गणित असं असतंय