द काश्मीर फाईल्स, झुंड, पावनखिंड | आत्तापर्यन्त सर्वाधिक कमाई कोणाची..?

भाई, कोरोनाची लांबसडक सुट्टी संपल्यानंतर थेटर्सच दर्शन होतंय. घरात बसून बसून मूडचा पार फालुदा झाल्याने हौशे, नऊशे, गौशे सगळेच थेटरकडे पळताय. लांबसडक रांग चित्रपट गृहांबाहेर लागतेय. म्हणून परत निर्बंध लागतात की काय ही भीती काहींना वाटतेय. त्यामुळे अजूनच पटपट जाऊन ते चित्रपट बघून येताय.

काय आहे ना, या चित्रपटांचा फील घरी बसून बघण्यात नाहीच, यावर सगळ्यांचंच एकमत आहे. 

त्यातच पावनखिंड, झुंड, द काश्मीर फाईल्स असे एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट सध्या प्रदर्शित होतायेत म्हटल्यावर एक झाला की एक चित्रपट बघताना खिशाचं गणित बिघडतंय. आपले पैसे जरी खपाखप जात असले तरी तेवढ्याच स्पीडने हे चित्रपट त्यांची कमाई करताय हे मात्र नक्की. म्हणूनच मग आमच्या डोक्यात ट्यूब पेटली की, विधानसभेत सुद्धा आमदारांना त्यांच्यावर बोलायला भाग पडणाऱ्या आणि पडद्यावर एकमेकांना काटेकी टक्कर देणाऱ्या या तिन्ही चित्रपटांमध्ये कोणाचा खिसा जास्त वाजतोय हे बघावं. 

त्यांनी किती कलेक्शन केलंय? किती स्क्रीन्सवर ते आलेत? किती चालले? आणि डिस्ट्रीबुट कसे झाले? अशी तुलना जरा करावी. बस्स, माहिती गोळा केली आणि आलो तुमच्याशी शेअर करायला. 

जरा आपण सिक्वेन्सने जाऊया… तेव्हा सुरुवात करूया सगळ्यात पहिले रिलीज झालेल्या ‘पावनखिंड’पासून.

 मराठी भाषेतला हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ ला रिलीज झाला. ऍक्शन, हिस्टोरिकेल आणि थ्रिल्लर असा हा चित्रपट. दिगपाल लांजेकर यांनी याचं दिग्दर्शन केलंय. ज्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे १२ कोटी. ट्रेलरनेच थरार निर्माण हा चित्रपट रिलीज होऊन आता २६ दिवस झालेत.

तेव्हा आतापर्यंत किती कमावलेत यावर नजर टाकूया. 

पण एक लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे, चित्रपट रिलीज झाला तेव्हा पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील ५०% स्क्रीन्स पावनखिंडने फुल्ल होत्या. जवळपास १९०० स्क्रिन काउंट होता. तर पावनखिंडने बॉक्स ऑफिसवर पहिल्या २५ दिवसांत सुमारे ३३.५ कोटी कमाई केली. 

याचं डिस्ट्रीब्यूशन बघितलं तर पहिल्या आठवड्यात  जवळपास १२.१७ कोटी कमावले, दुसऱ्या आठवड्यात ९.९१ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ७.२३ कोटी  तर या आठवड्यात मंगळवार १५ मार्चपर्यंत ३३.४० कोटींची  कमाई झालीये. म्हणजे चित्रपट या आठवड्याअखेर त्याच्या प्रोडक्शन कॉस्टच्या तिप्पट कमाई करेल, असा अंदाज दिला जातोय. 

आता येऊया झुंडकडे…

 हिंदी भाषेतला हा चित्रपट रिलीज झाला. ज्याचं दिग्दर्शन मराठमोळ्या नागराज मंजुळे यांनी केलंय. आणि त्यांनीच याची पटकथा लिहिली आहे. याची प्रोडक्शन कॉस्ट आहे २२ कोटी. मराठी सिनेसृष्टीत धूर करणारे नागराज जेव्हा हिंदी चित्रपट आणताय हे कळलं तेव्हापासून याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. त्यातच बिग बी अमिताभ यात असणार आणि त्यांच्या सोबतीला महाराष्ट्राची लाडकी जोडी आर्ची आणि परशा असणार हे जेव्हा समोर आलं तेव्हा तर उत्सुकता शिगेला पोहोचली. 

एकटक या चित्रपटाची वाट सगळे बघू लागले आणि अखेर प्रतीक्षा संपली ५ मार्च २०२२ ला. 

म्हणजे चित्रपट रिलीज होऊन आता ११ दिवस झालेत. आतापर्यंत जवळपास २००० पेक्षा जास्त स्क्रिन्स या चित्रपटाला भारतात मिळाल्या.  तर झुंडने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १.५ कोटींची कमाई केली. आणि पुढे २ दिवस लागतात २ ते २.५ कोटींच्या वर कमाई राहिली. त्यानुसार  पहिल्या आठवड्यात  झुंडने जवळपास १०.५ कोटी कमावले. 

आता दुसरा आठवडा सुरु असून मंगळवार १५ मार्चपर्यंत १३.८९ कोटींची कमाई  झालीये. तर गेल्या वीकेण्डला म्हणजे शनिवार-रविवारला संपूर्ण आठवड्याच्या तुलनेत चित्रपट जास्त चालला असं दिसलं. या गणितानुसार बघितलं तर या वीकेंडला देखील चित्रपट हवा करू शकतो, असं ग्राह्य धरलं तर प्रोडक्शन कॉस्टचा टप्पा चित्रपट पार करण्याचा अंदाज आहे.

आता ज्या चित्रपटाने वादंग निर्माण केलाय, अगदी ट्विटर, फेसबुक, इन्स्टा  असे सगळे सोशल मीडिया जणू हॅक केलेत तो चित्रपट बघूया… 

द काश्मीर फाईल्स. 

हिंदी भाषेतला हा चित्रपट ११ मार्च २०२२ ला रिलीज झाला. ज्याचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलंय. चित्रपटाची प्रोडक्शन कॉस्ट आहे २० कोटी. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला खूप समस्यांचा सामना करावा लागला. त्यातून पहिल्या दिवशी फक्त ६०० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज झाला. मात्र दोनच दिवसात रविवारी ही संख्या २००० स्क्रीन्सच्या जवळपास गेली आहे. ज्याने हिंदी चित्रपट सृष्टीत इतिहास रचल्याचं बोललं जातंय. 

हा चित्रपट रिलीज होऊन फक्त ५ दिवस झालेत. कमी स्क्रिन्स मिळाल्या तरी देखील पहिल्या दिवशी जवळपास ३.५५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ८.५ कोटी, तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी आणि सोमवारी १५.५ कोटींची कमाई केली. म्हणजे ४२.२० कोटी इथेच झाले. या चित्रपटाची वाढ बघता विकेंड वगैरेचं बंधन याला काही दिसेना. म्हणून साहजिकच झुंड आणि पावनखिंड यांना सरळ हाताने या चित्रपटाने मागे टाकलेलं दिसतंय. 

आता या चित्रपटाचं वादात राहणं चित्रपटासाठी वरदान ठरलं आहे, हे मात्र नक्की. 

पण तरी या चित्रपटाला बाजूला ठेवून जर आपण पावनखिंड आणि झुंड याची तुलना करायचं म्हटलं. तर पहिला आठवडा आपण बघू शकतो. पावनखिंडने पहिल्या आठवड्यात १२.१७ कोटी आणि झुंडने १०.५ कोटी कमावले. म्हणजे साहजिकच इतिहासाची तलवार परत एकदा युद्धात गाजली आहे, हे स्पष्ट होतंय. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.