आई गमावल्याचं दुःख बाजूला सारून, पठ्ठ्या देशासाठी मेडल घेऊन आलाय

सप्टेंबर महिन्यातली गोष्ट आहे, आकाश कुमार नावाच्या बॉक्सरनं नॅशनल टायटल मारलं. हरियाणामधल्या आपल्या पलुवा या गावी पोहोचल्यावर आपलं जंगी स्वागत होईल, आपल्याला घ्यायला गर्दी जमली असेल, आपलं घर रोषणाईनं नटलं असेल अशी अपेक्षा आकाशला होती. कुठल्याही चॅम्पियनला असं वाटत असणारच की हो!

पण परिस्थिती वेगळी होती. ना आकाशला कुणी घ्यायला आलं, ना त्याच्या घराला रोषणाई होती. होती ती दुःखाची झालर.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याआधीच आकाशची आई आजारी होती. आपल्या पोरानं मेडल जिंकावं हे स्वप्न त्या माऊलीनं पाहिलं होतं. मनावर दगड ठेवून आकाश सरावासाठी गेला. आपल्या आईची चिंता त्याला सतावत होतीच. त्यानं तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याचा हट्ट धरला. त्याची आईही सगळं अवसान पणाला लावून त्याच्याशी बोलली आणि म्हणाली, ‘मै ठीक हू बेटा, ठीक हो जाऊंगी. तुम बस मेडल पे ध्यान दो.’

राष्ट्रीय स्पर्धेतल्या आकाशच्या पहिल्या फाईटचा आदला दिवस. त्याच्या आईची आजारपणाशी सुरू असलेली झुंज थांबली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आकाशचं कुटुंब, कोच आणि टीममेट्सनं ही गोष्ट त्याच्यापासून लपवली. आकाशनं सगळं लक्ष स्पर्धेत दिलं आणि नॅशनल टायटल मारलं.

घरी परतल्यावर आकाशसमोर दोन आव्हानं होती. आई गमावल्याचं दुःख पचवणं आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तयारी करणं.

वयाच्या आठव्या वर्षीच आपले वडील गमावणाऱ्या आकाशला त्याच्या मोठ्या भावानं भवर कुमारनं वाढवलं. नॅशनल गोल्ड जिंकून घरी परत आल्यावर, आकाश फार कुणाशी बोलला नाही. जवळपास दहा रात्री तो फक्त रडत होता. त्यानंतर, तो नॅशनल कॅम्पला गेला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी सुरू केली, असं भवर सांगतो.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आकाशचा प्रवास झोकात सुरू होता. त्याच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं, व्हेनेझुएलाचा ऑलिम्पिक मेडल विजेता बॉक्सर योएल फिनोलचं. उपांत्यपूर्व सामन्यात योएलचं आव्हान परतवून लावलं, तर आकाशचं मेडल पक्कं होणार होतं.

असं म्हणतात, चॅलेंज जितकं टफ असतं, चॅम्पियन्सचा खेळ तितकाच भारी होतो. आकाशनं योएलची ताकद, अनुभव आणि चपळता सगळ्यावर मात केली आणि फाईट जिंकली. तेही ५-० अशा दमदार फरकानं. आकाशचं आणि पर्यायानं भारताचं मेडल पक्कं झालं.

उपांत्य फेरीत मात्र कझाकस्तानच्या मखमूदनं आकाशला नमवलं आणि फायनल गाठण्याचं त्याचं स्वप्न भंगलं.

वयाच्या २१ व्या वर्षी आकाश कुमारनं भारतासाठी ब्रॉंझ मेडल आणलं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकणारा तो सातवा भारतीय बॉक्सर ठरलाय. याआधी अमित पंघल, विजेंदर सिंग, विकास कृष्णन, शिवा थापा, गौरव बिधुरी आणि मनिष कौशिक यांनी भारताला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकून दिलं होतं. आकाशच्या मेडलमुळं भारताचा पंच आणखी सॉलिड झालाय.

पैलवानांच्या घरात वाढलेल्या आकाशचं यश बघायला दुर्दैवानं त्याचे आई-वडील हयात नाहीत, पण सगळा देश आकाशकडं अभिमानानं बघतोय हे नक्की!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.