हा गडी खऱ्या आयुष्यात GTA Vice City खेळला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली…
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हातात कॉम्प्युटर आल्यावर एक गेम खेळण्यात आयुष्यातला लई वेळ घालवला. ही गेम म्हणजे GTA Vice City. शाळेतून घरी आल्यावर, घरनं पैशे ढापून किंवा उधारी करुन सायबर कॅफेत बसून ही गेम खेळण्यात लय वेळ घालवला आणि त्याचा कणभरही गम नाय.
Vice City ही पबजी, फ्री-फायर, कँडी क्रश या सगळ्या गेम्सपेक्षा बाप होती. याच्यात काय होतं, तर वेगवेगळी मिशन्स पूर्ण करायची आणि गेम कम्प्लिट करायची. यात भारी लोकेशन्स होते, गन्स होत्या, जिंदगीत कधी पाहिल्या नाहीत अशा लय वांड गाड्या होत्या आणि न लाजता सांगायचं झालं, तर चित्रातल्या पोरीही होत्या.
आता Vice City चा मेन विषय मिशन्स पूर्ण करणं हा होता, मात्र पोरं काय करायची… तर गाडी फिरवत बसायची, उगा बंदुका घेऊन लोकांना मारायची. असले किडे केले की पोलीस मागं लागायचे. मग जे आगाऊ भिडू होते, ते या पोलिसांना गाडीनंच उडव, गोळ्याच मार असे उद्द्योग करायचे.
तुम्ही कधीतरी ऐकलं असेलच की, गेम खेळण्यानं मनावर परिणाम होतो, माणसं बिघडतात. पहिल्या फटक्यात विश्वास बसला नसेल, कारण आमचाही बसला नव्हता. मग आम्ही एक स्टोरी वाचली, एका गड्याची… जो आधी कॉम्प्युटरवर गेम खेळला आणि मग खऱ्या आयुष्यातही…
याचा परिणाम काय झाला? तर त्याला फाशीची शिक्षा झाली…
डेविन मुरे, अठरा वर्षांचं पोरगं. त्याची निवड अमेरिकेच्या एअर फोर्समध्ये झाली होती, सुट्टी संपली की गडी ट्रेनिंगसाठी जाणार होता. सुट्टीच्या काळात काय करायचं म्हणून हा दिवसभर Vice City खेळत बसायचा. आता Vice City मध्ये एक मिशन होतं, आपल्याला पोलिसांची कार चोरायची असते, मग पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलिसांवर फायरिंग करुन बाहेर पडलं की मिशन पूर्ण.
मुरे हे मिशन लई वेळा खेळला असणार.
कारण, ७ जून २००३ ला त्यानं एक गाडी चोरली. गाडी चोरुन पळालेला मुरे पोलिसांना सापडायला वेळ लागला नाही. पोलिसांनी त्याला चौकीत नेला, तिकडं त्याच्यावर कारवाई करण्याआधीच त्यानं एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढली आणि पोलिसालाच मारलं. एकाला मारुन शांत बसला नाही, तर त्यानं दुसऱ्या पोलिसालाही मारलं. मुरे चौकीतून पळाला आणि त्यानं तिसऱ्या पोलिसालाही गोळी घातली.
१८ वर्षांचं पोरगं, हातात पहिल्यांदा बंदूक घेतलेलं… पण त्यानं तीन पोलिसांना मारलं आणि तिघांनाही हेडशॉट बसला.
कुठल्याही ट्रेनिंग शिवाय… तीन हेडशॉट..!
पुढं पोलीस चौकशीत मुरेनं सांगितलं की, “GTA Vice City नं माझा मेंदू खाल्ला होता. मला जेलमध्ये जायचं नव्हतं, म्हणून मी त्या पोलिसांना मारलं.”
प्रकरण कोर्टात गेलं आणि निकाल बराच लांबला. मुरेच्या वकिलांनी दावा केला, की तो मानसिक रुग्ण आहे आणि त्या आजारामुळं त्यानं असं काहीतरी केलं. तो लहान असताना त्याच्या वडिलांनी त्याला लय हाणला होता, त्याचा परिणाम त्याच्या मनावर झाला होता. त्यामुळं कोर्टानं त्याला निर्दोष ठरवलंही होतं.
एवढंच नाही, तर vice city बनवणाऱ्या रॉकस्टार गेम्सलाही कोर्टात खेचण्यात आलं. पुढं मात्र मुरेला दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
एका गेमपायी मुरेनं स्वतःचं आयुष्य तर उध्वस्त केलंच पण सोबतच आणखी तीन जणांच्या आयुष्याचीही राखरांगोळी केली. चौकशी दरम्यानचं त्याचं एक वाक्य व्हिडीओ गेम्स खेळणाऱ्यांसाठी आणि त्याचा नाद लागलेल्यांसाठी डोळे उघडणारं होतं, तो म्हणाला होता…
Life is a video game. Everybody’s got to die sometime.
हे ही वाच भिडू:
- पबजीच्याही आधी दोन पिढ्यांची मेहबूबा GTA Vice City होती…
- दहा वर्षांपूर्वी आम्ही फेसबुकवर ऑनलाईन शेती करायचो.
- जावेद जाफ्रीची टपोरी भाषा, जपानी गेम्सचा तडका; ‘ताकेशीज कॅसल’ हा बाप विषय परत येतोय