आपल्या घरात बीपीएलचा टीव्ही असणे हे त्याकाळात श्रीमंतीचं लक्षण वाटायचं..

साल १९९५. मुंबई मध्ये एका कंपनीने आपल्या जाहिरातीसाठी अमिताभ बच्चनला साइन केलं. त्यासाठी किंमत मोजली तब्बल १५ कोटी रुपये. तेव्हाच्या मानाने हा रेकॉर्ड होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिटायर झालेला सुपरस्टार म्हणवल्या जाणाऱ्या बच्चनला एवढे पैसे मोजणारी कंपनी कोण याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती.

बच्चनवाल्या जाहिरातीची टॅगलाईन होती,

बिलिव्ह इन द बेस्ट

ती कंपनी होती, बीपीएल. ती टीव्ही बनवणारी कंपनी होती. बच्चनला आपल्या करियरची डुबती नैय्या सावरण्यासाठी त्यांची गरज होती पण त्या पेक्षाही बीपीएलला बच्चनची जास्त गरज होती.

नव्वदच्या दशकातला हा काळ. अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांच्या कृपेने भारतात जागतिकीकरण आलं होतं. सगळ्यात मोठा इफेक्ट दिसत होता आपल्या घरातल्या टीव्हीवर. फक्त ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन  दिसणारा टीव्ही आता कलर होऊ लागला होता. महाभारत रामायणमुळे लोकांना टीव्हीची सवय झाली होती.

केबल वरच्या शेकडो चॅनल्सच जग दिसल्यावर तर या सवयीचं वेडात रूपांतर झालं.

खुल्या आर्थिक धोरणामुळे जगभरातून दिग्गज टीव्ही कंपन्या भारतात एंट्री करत होत्या. भारतातल्या कंपन्या यात वाहून जातील असच म्हटलं गेलं. पण बीपीएल व्हिडीओकॉन या कंपन्यांनी ठरवलेलं,

परदेशी कंपन्यांना पुरून उरायचं.

बीपीएल च खरं नाव ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरी. हां नाव ब्रिटिश असलं तरी ही अस्सल भारतीय कंपनी होती. याची स्थापना झाली होती केरळ पल्लकड येथे. टी.पी.जी नाम्बियार नावाचा होतकरू इंजिनियर इंग्लंड अमेरिका इथे शिकून नोकरी करून मातृभूमीत नशीब उजळण्यासाठी आला होता.

अफाट लोकसंख्या असणाऱ्या भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तुंना उज्वल भविष्य असणार आहे याचा त्याला अंदाज होता.

साठच दशक सुरु होतं. भारतात लायसन्स राजची चलती होती. प्रत्येक गोष्टीला सरकारी ऑफिसचे  झिजवावे लागत होते. हजारो परवानग्या, शेकडो अधिकाऱ्यांची मनधरणी करून नाम्बियार यांनी १९६३ साली आपल्या कंपनीची स्थापना केली. नाव दिलं ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरी.

सुरवातीला हि कंपनी संरक्षण दलांसाठी काम करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्सला पॅनल बनवून द्यायची. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे छोटेसे सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून नाम्बियार यांनी आपली ओळख निर्माण केली. कामाची गुणवत्ता, वेळेत डिलिव्हरी यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये देखील त्यांचं चांगलं नाव झालं.

हळूहळू बीपीएलच बस्तान बसत गेलं. पुढे कंपनीच हेडक्वार्टर बेंगलोरला हलवण्यात आलं.

साल १९८२ भारतासाठी एक क्रांतिकारी वर्ष ठरले. त्या वर्षी दिल्लीत एशियाड गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं होत. आता आपण गरीब देश राहिलो नसून एक महासत्ता बनण्याच्या देशाने आपली वाटचाल चालू आहे हे दाखवण्याची संधी एशियाड गेम्सच्या निमित्ताने चालून अली होती.

पंतप्रधान इंदिरा गांधींचे थोरले चिरंजीव राजीव गांधी यांच्याकडे या स्पर्धेचे नियोजन सोपवण्यात आले होते. स्टेडियम तयार करणे, खेळांचे आयोजन करणे या गोष्टी सुरु होत्या. मात्र राजीव गांधींच्या डोक्यात होते कि हा ग्रँड समारोह भारतीयांनी कलर टीव्हीवरून पाहावा. अजून भारतात तेव्हा दूरदर्शन ब्लॅक अँड व्हाईट होते. राजीव गांधींच्या हट्टामुळे पंतप्रधानांनी या दृष्टीने पावले उचलण्यास सुरवात केली.

तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी जिद्दीने हा प्रकल्प मार्गी लावला. एशियाड गेम्स यशस्वी झाल्याचं पण त्याहूनही महत्वाचं त्यानिमित्तानं भारताला कलर टीव्ही मिळाला.

अनेक भारतीय कंपन्या कलर टीव्ही बनवण्याच्या मागे लागल्या. बीपीएलने देखील यात पाऊल टाकलं. रंगीत टीव्हीचे तंत्रज्ञान भारतात संशोधन करायला वेळ आणि पैसे भरपूर खर्च होणार होता. बीपीएलने जपानच्या सन्यो कंपनीशी टेक्नॉलॉजी हस्तांतरणाची करार केले.

त्यांच्या मदतीने बीपीएलच्या नाम्बियार यांनी भारताचं रंगीत टीव्हीचं स्वप्न साकार केलं.

पुढे जेव्हा जागतिकीकरण आलं तेव्हा सर्वाना वाटलं होत कि भारतीय टीव्ही कंपन्या या लाटेत उडून जातील. मात्र तस घडलं नाही. बीपीएलने व्यवस्थित नियोजन करून सॅमसंग, एलजी या प्रथितयश कंपन्यांशी टक्कर दिली. त्यासाठी त्यांनी मार्केटिंगवर पैसा खर्च केला.

बीपीएलला भारतीय मानसिकता ठाऊक होती. इथल्या गावाकडच्या लोकांची नस त्यांनी अचूक पकडली होती. नव्वदच्या दशकात घरात बीपीएलचा टीव्ही असणे हे श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. अनेक दिवस बुकिंग साठी नम्बर लागायचे. बीपीएलने भारतातच नाही तर जगभरात आपला ब्रँड लक्झरी आयटम म्हणून प्रस्थापित केला होता.

क्रिकेटचे सामने आयोजित करण्यापासून ते समाजसेवे साठी पैसे खर्च करण्यापर्यंत बीपीएल सगळ्यात आघाडीवर असायचे. दरवर्षी दहा लाख टीव्ही खपवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हा एकप्रकारचा विक्रमच होता.

पण हेच अच्छे दिन कायम राहणाऱ्यातले नव्हते.

नवीन सहस्त्रक उगवलं तसं वेगाने टेक्नॉलॉजीमध्ये बदल होऊ लागला. कॉम्प्युटरच युग आलं. घरोघरी इंटरनेट लॅपटॉप दिसू लागले. घरातले टीव्ही देखील एलईडी, एलसीडी बनले. या टेक्नॉलॉजीमधल्या बदलांसाठी मोठं भांडवल लागणार होतं. बीपीएल व्हिडीओकान यांच्याकडे ते नव्हतं.

बीपीएल ची सन्यो बरोबरची भागीदारी काही वादामुळे संपुष्टात आली. इथेच बीपीएल या भारताच्या आयकोनिक ब्रँडचा अंत झाला.

गेल्या काही वर्षांपूर्वी नांबियार यांच्या बीपीएल टिव्हीने पुनरागमन केले मात्र पूर्वीचा थाट, पूर्वीचे वैभव आता दिसत नाही हे देखील तितकेच खरे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.