धूर्त ब्रॅडमनने आपल्या आधी बॉलर्सना बॅटिंगला पाठवलं…

सगळ्यांना वाटत की क्रिकेट हा अंगमेहनतीचा खेळ आहे. पण आपल मत आहे की क्रिकेट अंगमेहनतीपेक्षा डोकॅलिटीचा खेळ आहे. या खेळात ज्याच डोकं जास्त पळतंय तो राज्य करतोय. असाच एक माणूस होऊन गेला ज्याचे विक्रम कोणालाच मोडणं कोणालाच शक्य झालं नाही आणि होणार पण नाही. नाव डॉन ब्रॅडमन !!

डॉन ब्रॅडमन हा खरोखर क्रिकेटचा डॉन होता. चाचा चौधरी पेक्षा तेज दिमाग असलेला हा प्राणी. त्याच्या हुशारीचे अनेक किस्से आहेत पण त्यातला एक किस्सा फेमस आहे. 

गोष्ट आहे १९३६-३७च्या अॅशेस टेस्ट सिरीजची. अॅशेस ही जगात सगळ्यात जुनी व मानाची मालिका मानली जाते. दर दोन वर्षांनी आलटून पालटून इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये हे मॅचेस होतात. त्यावर्षी ती सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती. द ग्रेट डॉन ब्रॅडमनला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बनवण्यात आलं होतं.

ही सिरीज बघायला तुफान गर्दी झाली होती. डॉनच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आलेली पहिलीच मॅच ऑस्ट्रेलिया ३२२ रन्सनी हरली. सिडनीमध्ये झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा इंग्लंडने विजय मिळवला. खूप अपेक्षा ठेवून आलेली ऑस्ट्रेलियन पब्लिक निराश झाली.

ज्याची एवढी हवा केली तो डॉन ब्रॅडमन कॅप्टन म्हणून सपशेल फेल गेला होता. एवढच नाही तर त्या दोन मॅचच्या चार इनिंगमध्ये तो दोनवेळा डकवर आउट झाला होता. नाही म्हणायला त्याने एका इनिंग मध्ये ८० धावा काढल्या होत्या पण ज्याचं अव्हरेज जवळपास शंभर आहे त्याच्या दृष्टीने त्या रन म्हणजे आउटऑफ फॉर्म.

डॉन ब्रॅडमन डक वर आउट होणे म्हणजे चेष्टा नाही. लोकं म्हणाले डॉनला कप्तानी झेपत नाही त्याला काढून टाका. डॉनचा तो अपमान होता. तिसऱ्या कसोटीआधी खूप राडा झाला. ऑस्ट्रेलियाने चार खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस पाठवून काढून टाकले. मिडियाने गॉसिपचा धुमाकूळ घातला.

डॉन ला काहीही करून मेलबर्न मध्ये होणारी तिसरी कसोटी जिंकावीच लागणार होती. तो आपल्या बॅटने टीकाकारांना उत्तर द्यायला हपापला होता. एक क्रिटिक म्हणाला देखील,

” the two successive ducks meant someone was bound to suffer very soon.”

ती टाईमलेस कसोटी होती. म्हणजे त्याकाळात कसोटी पाचच दिवस होणार असं काही बंधनकारक नव्हत. दोन्ही टीमचे प्रत्येकी दोन डाव होईपर्यंत सामना चालायचा मग कितीही दिवस लागोत. डॉन एखाद्या जखमी वाघाप्रमाणे मॅचची वाट बघत होता.

१ जानेवारी १९३७ . मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर लाखोनी पब्लिक गोळा झाले होते. असं म्हणतात की ती मॅच जवळपास साडे तीन लाख लोकांनी बघितली. हा एक विश्वविक्रम आहे. डॉनने त्या सिरीजमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकून बॅटिंग निवडली. मॅच सुरु झाली तोपर्यंत आभाळात ढग जमा झाले होते. आज एक तर डॉन बरसणार नाही तर पाउस हे दिसत होतं.

पण दुर्दैव डॉन ब्रॅडमन त्या इनिंग मध्ये देखील फेल गेला. त्याने फक्त १३ धावा काढल्या. एकही फोर न मारता तो आउट झाला. हा तर खूप मोठा अपेक्षाभंग होता. मककबीच्या ६३ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी सहा बाद १८१ धावा केल्या.

त्या दिवशी रात्रभर पाउस पडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा दुपारी लंच पर्यंत पाउस पडतच होता. असा पाउस कधी मेलबर्न वाल्यांनी बघितलाच नव्हता. ऑस्ट्रेलियाची इनिंग सुरु झाली तेव्हा डॉनला जाणवलं पीच मध्ये गडबड आहे. झटपट तीन विकेट गेल्या. त्याने टाईमलेस मॅच असूनही २०० रन्स झाल्यावर इनिंग डिक्लेअर केली. पॅव्हेलीयनमध्ये बसलेल्या मिडियामधल्या पंडीतानी माना हलवल्या.

डॉन ब्रॅडमनचा शेवट जवळ आला आहे असच सगळे म्हणाले.

इंग्लंड जेव्हा बॅटिंगला आली तेव्हा कळाल डॉननं तसं का केलं. पावसामूळ ते पीच चिकट झालं होतं. बॉल कसाही वळत होता, कसाही कमी जास्त उंच उडत होता. भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडाली. ७६ धावा झाल्यावर इंग्लंडचे ९ विकेट गेले. खर तर ब्रॅडमनने आपल्या बॉलरना इंग्लंडच्या विकेट घेऊ नका असा अनोखा आदेश दिला होता. त्याला इंग्लंडची फलंदाजी जास्त वेळ चालावी अशी इच्छा होती. पण इंग्लंडच्याच्या कॅप्टनने इनिंग डिक्लेअर केली. याच पिचवर ऑस्ट्रेलियाला सहज गुंडाळून दुसऱ्या डावात मॅच जिंकू असा त्यांना विश्वास होता.

पण त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये अस्सल ऑस्ट्रेलियन धूर्तपणाचा मूर्तिमंत उदाहरण डॉन उभा होता. त्याला माहित होत पीच अजूनही खराब आहे. पण आता खेळण्याशिवाय पर्याय नाही.

त्याने आयडिया लढवली की अख्खी बॅटिंग ऑर्डर चेंज करू. आधी बॉलर्स बॅटिंगला जातील आणि मग पीचची कंडीशन सुधारल्यावर बॅट्समन. फ्लीटवूड आणि ओरीली या बॉलर्सनी ऑस्ट्रेलियन इनिंगची सुरवात केली. फ्लीटवूडने डॉनला विचारले देखील होते की मीच का?? तो त्याला म्हणाला,

“चांगल्या विकेटवर तूझी बॅट कधी बॉल स्पर्श करू शकत नाही. मग आजच्या वाईट पीचवर आउट होण्याची सगळ्यात कमी रिस्क तुझीच आहे.”

त्या दिवशी फ्लीटवूडने किल्ला लढवला. पण तिसऱ्या दिवशी सकाळी तो आउट झाला. त्याच्यानंतर आला वार्ड. एका पाठोपाठ बॉलर्स लढत राहिले. नेहमी ३ किंवा ४ नंबरला येणारा ब्रॅडमन सात नंबरला आला. त्या दिवशी तो आजारी होता. पण त्याही अवस्थेत तो जे काय खेळलाय त्याला तोड नाही.

सुरवातीला पीचचा अंदाज घेण्यासाठी अगदी सांभाळून खेळणारा डॉन एकदा जम बसल्यावर आक्रमक झाला. बावीस फोर मारून त्याने २७० धावा बनवल्या. या इनिंगमध्ये त्याने ऑफ साईडला बॉल मारण्याचा जराही प्रयत्न केला नाही. एकही बॉल हवेत मारला नाही. बॅकफुटवर जाऊन जाऊन त्याने सगळ्या धावा कुटल्या. सोबत जॅक फिंगलटननेही सेंच्युरी मारली.  

ऑस्ट्रेलियाने लढाऊ झुंज देऊन ५६४ धावा केल्या होत्या. हा डोंगर सर करणे इंग्लंडला जमणार नव्हते. ३२३ रन मध्ये त्यांची इनिंग आटोपली.  ऑस्ट्रेलियाने ती मॅच जिंकली. पण त्यानंतर एखादं धरण फुटल्यावर जस पाणी वाहत त्या प्रमाणे डॉनने त्या सिरीजमध्ये धावा बनवल्या. जे लोक त्याच्या बॅटिंग वर त्याच्या कॅप्टनसीवर शंका घेत होते त्या सगळ्यांना उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाने ब्रॅडमनने बनवलेल्या दोन द्विशतक आणि एक सेन्चुरीच्या जोरावर अॅशेस जिंकली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.