ब्रह्मानन्दम : थपडा खाऊन स्टार बनलेला माणूस.

ब्रह्मानन्दमच्या नावावर सर्वाधिक सिनेमांमध्ये (एक हजार पेक्षा जास्त) काम करण्याचा विक्रम आहे. हा झाला कागदोपत्री विक्रम. पण त्याच्या नावावर अजून एक अनधिकृत विक्रम जमा आहे. ऑन स्क्रीन सगळ्यात जास्त थोबाडीत खाण्याचा आगळावेगळा विक्रम.

तो काम करत असलेल्या प्रत्येक सिनेमात नायक, नायिका, खलनायक सगळे ब्रह्मानन्दमच्या गालांवर हात साफ करून घेतात. एकदा नाही, अनेकदा. ब्रह्मानन्दम थोबाडावर थप्पड खात असतो आणि थेटरात बसलेलं पब्लिक नुसतं खिदळत असत.

असा एक पण सिनेमा नाही ज्यात ब्रह्मानन्दम थोबाडात खात नाही. ब्रह्मानन्दमला स्क्रीनवर थोबाडीत देणारे नायक, नायिका त्याच्या अर्ध्या वयाचे पण नसतात. बहुतेकदा त्यांचं वय ब्रह्मानन्दमच्या एकूण कारकिर्दीएवढं (तब्बल पस्तीस वर्ष) पण नसत. पण दिग्दर्शक आणि लेखकांना पब्लिकला काय आवडतं हे चांगलंच कळत.

थोबाडीत खाल्ल्यावर ब्रह्मानन्दमच्या चेहऱ्यावर जे भाव येतात, त्यात काय नसत ? चारचौघात थोबाडीत खाल्ल्यावर नजरेमध्ये येणारी शरमेची भावना, अपमान झाल्याची भावना, त्याचबरोबर आपण कशाला यांच्या (थोबाडीत दिलेल्याच्या) वाटी गेलो याची उपरती आणि असं बरच त्याच्या नजरेत तरळत असत. पब्लिकला हा असा अवमानित झालेला ब्रह्मानन्दम तुफान आवडतो .

 

ब्रह्मानन्दम नावाला तेलगू सिनेमांमध्ये काम करत असला तरी सिनेमाच्या प्रेमात असलेल्या या देशात त्याला ओळखत नाही, असा चित्रपट रसिक सापडणं अवघड आहे .ब्रह्मानन्दमची लोकप्रियता वाढली ती विविध चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या डब चित्रपटांमधून.

तेलगू भाषिक राज्यांमध्ये पण तो लोकप्रिय आहेच. पण या डब सिनेमांमुळे त्याला देशभरात ओळख मिळाली. खरं तर काही अपवाद वगळता या डब सिनेमांमधल्या डबिंगचा आणि त्यातल्या हिंदी संवादांचा दर्जा काही फारसा चांगला नसतो. पण ब्रह्मानन्दम चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सने या वाईट दर्जा असणाऱ्या सिनेमात पण तो बाजी मारून जातो.

या सिनेमांचं हिंदी डबिंग करणाऱ्या निर्मात्यांनी ब्रह्मानन्दमला आवाज देणारा एक भारी माणूस शोधून काढला आहे. प्रत्येक हिंदी डबमध्ये तो एकच आवाज ब्रह्मानन्दमसाठी वापरला जातो. त्याचा आवाज ब्रह्मानन्दमला सुपरफिट बसतो. मी एकदा हैद्राबादला थेटरात ब्रह्मानन्दमचा तेलगू सिनेमा बघितला होता .त्यात ब्रह्मानन्दमचा ओरिजनल आवाज हा वेगळा आहे, हे पचवायला मला जड गेलं होत.

ब्रह्मानन्दमच्या भूमिकांचा एक ठरलेला साचा आहे. ब्रह्मानन्दम बहुतेक रवी तेजा, ज्युनियर एनटीआर, रामचरण, पवन कल्याण अशा अभिनेत्यांचा साईड किक असतो किंवा त्यांचा प्रतिस्पर्धी असतो. आपल्या धांदरटपणामुळे तो विचित्र परिस्थितीमध्ये अडकतो आणि मग मार खातो.

बहुतेक सिनेमात ब्रह्मानन्दमचा जो कथानकातला ट्रॅक असतो, त्याचा मुख्य कथानकाशी फारसा संबंध नसतो. ब्रह्मानन्दमचा उपयोग सिनेमातल्या हाणामारीला, गंभीर प्रसंगांना कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ‘कॉमिक रिलीफ ‘म्हणून होतो.

रावडी राठोड सिनेमा ज्या तेलगू सिनेमावरून घेतला आहे त्या सिनेमात तो रवी तेजाचा सहाय्यक चोर असतो. त्याच्या धांदरटपणामुळेच रवी तेजा विचित्र परिस्थितीमध्ये अडकत जातो. एका सिनेमात ब्रह्मानन्दमच्या पात्राचं नाव मायकेल जॅक्सन असत. तो मुलींना डान्स शिकवत असतो. इतकंच नव्हे तर रवितेजाचा प्रेमातला प्रतिस्पर्धी असतो. एका सिनेमात तो गुंडाचा सीए असतो. त्यांच्या दहशतीखाली त्यांचा मार खाऊन काम करत असतो. भरीस भर म्हणून त्याचा असिस्टंट त्या गुंडांच्या मुलीच्या प्रेमात पडतो.एका सिनेमात तो किलबिल पांडे नावाचा प्रामाणिक ऑफिसर असतो.

ब्रह्मानन्दमने गंभीर भूमिका केल्याचं नाहीत असं नाही. पण त्या भूमिकांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ब्रह्मानन्दमची विनोदी अभिनेता म्हणून लोकांच्या मनात इमेज इतकी ठसली होती की त्याला बघूनच लोकांना हसू फ़ुटायचं. सिनेमाच्या परिणामकारकतेला हा मोठा धक्का असायचा .त्यामुळे ब्रह्मानन्दमला गंभीर भूमिका मिळणं बंदच झालं.

पण तेलगू फिल्म इंडस्ट्रीने आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने ब्रह्मानन्दमला भरभरून दिलं.आलिशान गाड्यांचा ताफा, हैद्राबादमधल्या आलिशान वस्तीमध्ये बंगला, ढिगाने पुरस्कार असं काही सगळं ब्रह्मानन्दमला मिळालं. एका नटाला जे जे हवं असतं ते ब्रह्मानन्दमला भरभरून मिळालं. फक्त एकच गोष्ट मिळाली नाही. आव्हानात्मक भूमिका.

ब्रह्मानन्दमला एका विशिष्ट इमेजमध्ये अडकू देण्यात निर्मात्यांचा मोठा फायदा होता. ब्रह्मानन्दमने पण आपली विनोदी प्रतिमा तोडण्याचा फारसा प्रयत्न वगैरे केला नाही. एक नट म्हणून तो खरच महत्वाकांक्षी आहे का, असा प्रश्न पडतो. खरतर तो सध्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे की तो आव्हानात्मक भूमिकांसाठी थांबू शकतो. किंवा स्वतः निर्माता बनू शकतो. पण प्रेक्षकांच्या मनात आपली विनोदी अभिनेत्याची भूमिका आपण मोडू शकू का याबद्दल त्याच्या मनात शंका असाव्यात.

file Photo

महाराष्ट्राच आणि ब्रह्मानन्दमचं जवळच कनेक्शन आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या निमशहरी आणि ग्रामीण भागात तेलगू सिनेमांची प्रचंड लोकप्रियता आहे. भाषा कळत नसून पण मनोरंजनाची हमखास खात्री देणाऱ्या या सिनेमांना लोक तुफान गर्दी करतात. त्या सिनेमातली गाणी या भागातल्या लग्नांमध्ये तुफान वाजतात. महेशबाबू, रवितेजा सारखे नायक इथे पण लोकप्रिय आहेत.

एकूणच तेलगू न बोलणाऱ्या निमशहरी आणि ग्रामीण भागात तेलगू सिनेमाचा अविभाज्य हिस्सा असणारा ब्रह्मानन्दमपण तुफान लोकप्रिय आहे. त्याची ही देशभरातली लोकप्रियता त्याला मानाचा ‘पद्मश्री ‘ देऊन गेला असेल. ब्रह्मानन्दमचा वापर बॉलीवूडने का केला नाही हे एक गूढच आहे. अनिस बाझमीने त्याला ‘वेलकम ‘ साठी साईन केलं होत. पण ते काही जमलं नाही.

ब्रह्मानन्दमला फावल्या वेळेत मुर्त्या बनवण्याची सवय आहे. त्याला फिल्मी पार्ट्यांमध्ये रमायला फारसं आवडत नाही . संध्याकाळी सात नंतर सहसा तो घराबाहेर जात नाही. त्याला अध्यात्मात प्रचंड रस असला तरी तो फारसा देव देव करणाऱ्यातला नाही. त्याला सिनेमातला पहिला ब्रेक देणाऱ्या दिग्दर्शकाची मोठी तसबीर त्याच्या घरात लावली आहे .

twitter

मला कधी कधी प्रश्न पडतो एका गोड मुलीचा आजोबा असलेल्या ब्रह्मानन्दम किती दिवस थप्पडखाऊ भूमिका करणार?

नटाला पडद्यावर दिग्दर्शक म्हणेल ते करावं लागतं ही ऑर्ग्यूमेंट नको. प्रत्येक नटाची स्वतःची अशी एक विचारप्रक्रिया असते. ब्रह्मानन्दम सारख्या बुद्धिमान नटाची पण ती असेलच.

वर्षांनुवर्षे अशा थपडा खाऊन खाऊन (भले खोट्या खोट्या असतील) ब्रह्मानन्दम ला ‘बस झालं आता !’ अशी भावना येत असेल काय ? ब्रह्मानन्दमच्या घरच्यांना त्याने असल्या भूमिका करणं थांबवावं असं वाटत असेल का ? प्रश्न आणि प्रश्न.

शक्यता अशी आहे की, असं काहीही नसेल. पण अशीही शक्यता आहे की, या प्रश्नांची उत्तर होकारात्मक असतील. लोकांना अडखळणारा, धडपडणारा, जखमी होणारा विदूषक आवडतो हा तर जुनाच नियम आहे .ब्रह्मानन्दमच्या नावावर कितीही विक्रम असले, त्याला कितीही पुरस्कार मिळाले असले आणि त्याने कितीही पैसा कमावला असेल तरी तो शेवटी तो बहुसंख्य लोकांसाठी विदूषकच आहे, हेच सत्य आहे.

आज तो त्रेसष्ठ वर्षांचा झाला. काही दिवसांपूर्वी त्याला हृदयविकारामुळे मुंबईत एका दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होत. ब्रम्हानंदमच्या अखंड चाललेल्या गडबडीला अखेर सक्तीने ब्रेक घ्यावा लागलाय. पण हा भिडू बरा झाल्यावर पब्लिकला हसवायला परत येईल हे नक्की.

  • अमोल उदगीरकर

 

2 Comments
  1. Shubh says

    बाॅलीवूडमध्ये ब्रम्हानंदम आहे की हो सुर्यवंशम मधे बघा नीट एकदा

  2. Prakash says

    Bramhanand you are great sir
    I love you too much

Leave A Reply

Your email address will not be published.