तो माग दिसतोय तो माझा बंगला, आणि मी उभा राहिलोय तिथं बोट पलटी झाली…
माझं नाव विनोदकुमार साळुंखे. मी माध्यमिक शिक्षक आहे. तो फोटोत मागं दिसतोय तो माझा बंगला. आणि मी जिथं उभा राहलोय तिथ बोट पलटी झाली. बोटीत ३५ जण होते. त्यावेळी हे NDRF वाले नव्हते. सगळं आमचं आम्हीच करत होतो. पाणी वाढतं होतं, माणसं भिलेली म्हणून ग्रामपंचायतीच्या बोटीतनं माणसं बाहेर काढायचं चाल्लेल तोच हि दुर्घटना घडली.
काल बोलभिडू ब्रह्मनाळ गावात पोहचलं.
ब्रह्मनाळ गाव हे येरळा आणि कृष्णेच्या संगमावर. पूर आला की सर्वात पहिला पाणी या गावात शिरलं. चार एक हजार मतदारसंख्या असणार मोठ्ठ गाव. पंचक्रोशीत भिलवडीनंतर याच गावाचा नंबर लागतो. हे गाव नेमकं कुठ आहे तर सांगली, तासगाव, पलूस या तिन्ही तालुक्यांपासून जवळपास एकाच अंतरावर. भिलवडीतून आतल्या बाजूला. सांगलीच्या दिशेला.
ब्रम्हनाळला जाण्यासाठी आम्ही पहिला भिलवडीत पोहचलो. दूचाकीवरुन खटाव मध्ये पोहचलो. खटावच्या वेशीवरच मांड्यापर्यन्त पाणी होतं. खटावच्या एका बाजूने समांतर अशी येरळा नदी वाहते. खटाव तस चढावरचं गाव. एका बाजूने पाणी वाढतं आणि गावाच्या दोन्ही बाजूने पुढं सरकतं. त्यामुळे गावाच्या वेशीवर पाणी येतं. पुराच्या काळात इथं पंचवीस तीस फुटांच्या वर पाणी होतं. आज मांडीपर्यन्त आलय. पण हा टप्पा जास्त नाही.
गावात शिरताना असणारा दोनशे तीनशे मीटरचा उतार आणि चढ असणारा हा टप्पा. इथं आत्ता कमी पाणी असल्यानं आम्ही तेवढं अंतर पाण्यातून चालत खटावात शिरलो. आमच्याबरोबर खटावचा एक तरुण होता. त्यानं भावाची जीप घेतली आणि आपण ब्रह्मनाळचा जावू म्हणला.
जीपड्यात बसलो. दोन्ही बाजूला ऊस. जिथवर नजर जाईल तिथवर सलग ऊसाचा पट्टा. पाच दहा किलोमीटर अगदी सपाट. टिव्हीवर पंजाबमधली जमीन दाखवतात अगदी तसं. त्यामुळे कृष्णेच पाणी पात्राबाहेर पडलं की ते लांबवर पसरतं. दोन्ही बाजूला असणाऱ्या ऊसाच्या शेतीतून आम्ही नेमकं त्या ठिकाणी पोहचलो.
हे ठिकाण कस आहे तर सपाट भागातून आपणाला जाताना अचानक छोटा ओढा लागतो तशा प्रकारची. रस्ता जरा वळण घेतो तो दहा पंधऱा फुटांचा उतार. या उतारावर पाणी शिरलय. कालही गुडघाभर पाणी तिथं होतं.
घटना घडली त्या ठिकाणी गुडघाभर पाण्यात उभा राहिलो होतो.
माझ्या उजव्या हाताला एक बंगला दिसत होता. मागच्या बाजूला उजव्या दिशेला चढावर एक कौलाचं घर. डाव्या बाजूला ऊस. तेव्हा पाण्याची उंची वीस पंचवीस फुटावर होती. डाव्या बाजूला येरळा नदी. लोकांना वाटतं की नदिच पाणी वाढतय म्हणजे पाण्याचा प्रवाह नदीच्या बाहेर फेकत असेल. तसं नसतं. नदीचा प्रवाह जोरात असतो आणि नदित मोठ्या वेगानं पाणी प्रवाही होतं असतं. मागच्या डाव्या बाजूला एक बाभळीच झाड. त्या झाडामुळ पंधऱा लोकं वाचल्याचं त्या मित्रानं सांगितलं.
खटाव गावचा मित्र सांगत होता की,
त्या दिवशी आम्ही पण होतो, जसजस माणसांना कळलं तशी माणसं यायला लागली. तो आम्ही उभा राहिलो होतो तिथून मागच्या बाजूला असणारा ऊस दाखवू लागला. म्हणाला, बोट अजून वीस एक फुट पुढं आली असती तरी सगळी माणसं ऊसात अडकली असली. नदीत वाहून गेली नसती. तिथं पाण्याची उंची पण कमी होती. दूसरं म्हणजे बोट आडवी पलटी झाली असती तरी माणसं वाचली असती.
झाडीचा फास मागच्या इंजनाच्या पंख्यात आवळला. आपण गाडीला अचानक पिकअप घेताना गाडी पुढनं उचलती तशी बोट उचलली. आणि आहे अशी उभी पलटी झाली. सगळे पाण्यात. माणसांना पव्हाय येत होते. काहीजणांच्या हातात केबलची वायर घावली. त्यांनी वायर धरली. तेव्हा बाभळीच्या झाडाच्या पाच दहा फुट पाणी होतं. त्या झाडावर चार आठ जण जावून बसले. तिथलं लाल मुंगळ कडकडून चावाय लागलं पण जाणार कुठं? काहीच पर्याय नव्हता.
वरच्या कोपऱ्यावर जिथं पाणी संपत आणि बोट थांबायची ती जागा पन्नास एक फुटांवर. गावात पाणी शिरल्यानं तिथं दहा पंधरा माणसं उभा होतीच. त्यांनी आवाज ऐकला. कोणतरी ओरडत असल अस वाटतं पण बायकांचा आवाज असल्यानं माणसं पळत आली. बघतात तो बोटीचं फक्त पुढचं टोक दिसत होतं. दोघं केबलच्या वायरीला लटकत होते. दोघतीघं झाडावर. बाकीचे पोहत बाजूला सरकलेले.
तो खटावचा मित्र सगळा प्रकार त्या गुडघाभर पाण्यात उभारून सांगत होता. तो आम्हाला हे सगळ सांगत होता तेव्हा मागच्या बंगल्यातले विनोद साळुंखे आले. विनोद साळुंखेचं हे फार्महाऊस. गावच्या सुरवातीला असणारा शेतातला बंगला. बंगल्याच्या पुढे मागे दुसरं तिसरं काहीच नाही.
विनोदकुमार सांगत होते,
प्रेत काढली. चार पाच जण घावले त्यांना बंगल्यात ठेवलं. त्यानंतर मागच्या बाजूला शेतात नेलं. अंगावर काही नव्हतं म्हणून बंगल्याचं पडदं टाकलं. मिडीयासोबत बोलतात तसं ते बोलत होते. आम्ही इथलच आहे म्हणून बोलत गेल्यावर अचानक ते माझ्या एका वाक्यावर ते थांबले,
मी विचारलं दादा आई आणि मुलाचा तो पाहून लईच वाईट वाटलेलं…
तसा त्याचा आवाज जड झाला.
कोण म्हणतय ती आई तर कोण म्हणतय आज्जी. तुम्हाला सांगतो, बोटीत बसताना बोटीतच शेजारी बसलेल्या बाईने ते पोरं तिच्या काखेत दिलं. दुसऱ्याची गोष्ट आपण जिवापाड लावून धरतो. ती बाई बुडली, पोरगं गेलं पण मेल्यावर पण तिनं मिठ्ठी सैल केली नाय. ते पोरगं तसच काखेत राहिलं. प्रेत आणून शेतात ठेवलं तरी ते पोरगं काखेत. मी दोन वेळा हात बाजूला सारून पाहिलं पण पक्कड फिट्ट होती. काही केल्या पोरगं सुटत नव्हतं. शेजारच्यानं दिलेलं आपण कस जपतो, आपल्या जिवापाड. इथली माणसं तशीच आहेत.
ते ऐकल्यानंतर पुढे काही बोलण्यासारखं वाटलं नाही. जे झालं ती एक दुर्घटना होती. NDRF चे जवान प्रशिक्षित असतात. ते एक माणूस देखील जास्तीचा घेत नाहीत. जॅकेट असतात. पण दुर्देवाने तेव्हा ते इथं नव्हतं. ग्रामपंचायतीची बोट हेच एकमेव साधन तेव्हा शिल्लक होतं. त्यातून लोकं आली नाहीतर पुरात बुडली असती. चूक कोणाची होती तर वेळेची हेच खरं.
साळुंखे पुढे म्हणाले,
आम्ही गावातल्या घरात राहतोय. आत्ता या आठवणी गावच्या वेशीवर कायमच्या राहणार. तुम्ही दिवसा येणार जाणार. माणसं नसली की गाव खायला उठतं. त्या दिवशी संबध पंचक्रोशीतली माणसं रडत होती. गावच्या प्रतिष्ठित नागरिकांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी बघितलं. लोकं म्हणत्यात आतल्या लोकांनी गडबड केली. पण तस नाही, पाणी वाढत होतं आत राहिलो असतो तरी बुडलो असतो आणि तो आकडा मोठ्ठा असता. मिळलं तस आम्ही बाहेर पडलो. शेवटी हि एक दुर्घटनाच.
वेळ कुणाला चुकल्या हेच खरं !!
- सौरभ पाटील.