बाटलीत पाणी विकणार.! लोकांनी येड्यात काढलेलं पण आजही ४० टक्के मार्केट त्यांचच आहे..

डालडा, कोलगेट, बिस्लेरी.. वनस्पती तूप, दंतमंजन, मिनरल वॉटर… आपण कशाला काय शब्द वापरतो. कधीच वनस्पती तूप म्हणत नाही आजही डालडाच म्हणतो. कधीच टुथपेस्ट म्हणत नाही आजही कोलगेट म्हणतो.

कधीच मिनरल वॉटर म्हणत नाही आजही बिस्लेरीच म्हणतो… 

आमचा एक मित्र हॉटेलात वेटरला बिस्लेरी कुठल्या कंपनीची आहे अस विचारतो. लोकल कंपनीची बिस्लेरी असेल तर आणू नका असही सांगतो. थोडक्यात बिस्लेरी म्हणजे बाटलीतलं थंड आणि शुद्ध पाणी हे समीकरण झालय. आज मार्केटमध्ये हजारों कंपन्या आहेत. अगदी आकडेवारीत सांगायचं तर २०२० साली संपूर्ण भारतात अडीच हजारांच्या वर लहानमोठ्या मिनरल वॉटर कंपन्यांची नोंद करण्यात आलेली आहे. गावागावात चौकाचौकात पाणी बाटलीत भरून विकणाऱ्या कंपन्या आहेत.

पण इतक्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये कंपन्या येत असताना सुद्धा भारताच्या एकूण मिनरल वॉटरच्या इंडस्ट्रीत बिस्लेरीचा वाटा आजही ४० टक्क्यांच्या आसपास आहे. अगदी मिनरल वॉटरच्या मार्केटचा बाजार झाला तरी बिस्लेरीला धक्का लावू शकेल अशी कंपनी आजही आलेली नाही… 

बिस्लेरीची सुरवात कशी झाली… 

बिस्लेरीची सुरवात म्हणजेच पाणी बाटलीत भरून विकण्याच्या संकल्पनेची सुरवात. जगात बऱ्याच उलथापालथी होत असतात. त्यातूनच वेगवेगळे बिझनेस जन्माला येत असतात. म्हणजे कोरोनाने “मास्क” वापरण्याचं मार्केट उभा केलं. तशीच काहीशी गोष्ट बिस्लेरीची आहे. 

पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली होती. सडेलेली युद्धसैनिकांची प्रेत हे तर संपूर्ण युरोपसाठी कॉमन झालं होतं. त्यामुळे बऱ्याच नद्या व नैसर्गिक जलप्रवाह प्रदुषित झाले होते. लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडत होते. एकीकडे आरोग्याचे प्रश्न उभा राहत होते तर दूसरीकडे लोकं आरोग्याच्या बाबतीत शहाणी होत होती. 

याचाच फायदा म्हणून युरोपात बाटलीबंद पाणी विकण्याचा बिझनेस सुरू झाला. पहिल्या महायुद्धाने बाटलीबंद पाणी विकू शकतो इतकी कन्सेप्ट दिली. बिस्लेरीचा पाया घातला तो इटलीच्या फेलीस बिस्लेरी याने मात्र त्याचा बिझनेस बारसं धरण्यासाठी १९६० चा काळ उजडावा लागला.

१९६० च्या काळात बिस्लेरी या मार्केटमध्ये खऱ्या अर्थाने उतरली. १९६५ च्या सुमारास बिस्लेरी ब्रॅण्ड तयार झाला आणि बाटलीबंद पाणी विकण्यास सुरवात केली.. 

युरोपात बाटलीबंद पाण्याला किंमत होती. पण बिस्लेरीला भारताचं मार्केट खुणावत होतं. भारतात जम बसवता येईल म्हणून त्याने बिस्लेरी भारतीय मार्केटमध्ये विक्रीस आणली.. 

पण युरोपात जे होतं ते भारतात नव्हतं. भारतात त्या काळात आरोग्यासाठी बाटलीबंद पाणी पिणं म्हणजे मुर्खपणाचं लक्षण होतं. मुळात मुबलक आणि कुठेही उपलब्ध असणारं पाणी एखादा बाटलीत भरून विकतोय म्हणल्यानंतर त्याला येड्यात काढण्याचा प्रकार होता. 

साहजिक बिस्लेरी भारतात चालली नाही…

कट टू कथेची दूसरी स्टोरी सुरू होते. १९६१ च्या वर्षात पार्ले समुहात वाटणी झाली. चार भाऊ होते. त्यातलाच एक भाऊ जयंतीलाल चौहान. जयंतीलाल चौहान यांच्या वाट्याला पार्ले समूहाचा सॉफ्ट ड्रिन्क्स चा बिझनेस आला.

या काळात भारतात अन्नधान्य आयात करावं लागत होतं. भारतीय जनतेला दोन वेळच्या खाण्याबद्दल सुधरत नव्हतं. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी तर एकवेळचं जेवण घेण्यास सुरवात केली होती असा तो काळ. अशा काळात सॉफ्ट ड्रिन्क्स चा बिझनेस करणं म्हणजे घर विकून कोळश्याचा व्यापार करण्याचा प्रकार होता.

याच जयंतीलाल चौहान यांना मधुकर, रमेश आणि प्रकाश अशी तीन मुलं होती. यातला रमेश अमेरिकेतून बिझनेस मॅनेजमेंट शिकून आलेला. त्यानेच १९६८ च्या दरम्यान सॉफ्ट ड्रिन्क्सचा बिझनेस हातात घेतला. काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत असणाऱ्या रमेशच्या डोक्यात “सोडा” विकण्याचा विचार आला.

याच काळात म्हणजे १९६९ साली बिस्लेरी आपलं भारतातलं बस्तान गुंडाळण्याच्या तयारीत होतं.

ही बातमी रमेश चौहान यांना समजली व त्यांनी बिस्लेरीकडे कंपनी विकण्याची ऑफर ठेवली. बिस्लेरीने पण लगेच कंपनी विकून टाकली.

रमेश यांना बिस्लेरीच्या या ब्रॅण्डला सोड्यात बदलायचं होतं. त्यांनी बिस्लेरीचा सोडा लॉन्च देखील केला. पण हे करत असताना बिस्लेरीच्या पाण्याच्या प्रोडक्शनला धक्का लावला नाही. त्या काळात बबली आणि स्टिल या दोन ब्रॅण्डनेमने बिस्लेरी पाणी विकत होते.

दूसरीकडे लिम्का, थम्स अप, माझा, गोल्ड स्पॉट सारख्या सॉफ्ट ड्रिन्क्स देखील लॉन्च करण्यात आल्या. या ड्रिन्क्स चालू लागल्या आणि बिस्लेरीकडे एक दुय्यम प्रोडक्ट म्हणून बघितलं जावू लागलं.

त्याचं कारण पण तसच होतं. तेव्हा एकतर बिस्लेरीचं पाणी तेव्हा काचेच्या बाटलीतून मिळायचं आणि दूसरी गोष्ट म्हणजे विकतचं पाणी पिणारं मार्केट नव्हतं.

पण या इंडस्ट्रिच नशीब फळफळलं ते १९८५ सालात.

१९८५ साली प्लॅस्टिकच्या बाटल्या आल्या पाण्याला किंमत आली. पॅकेजिंग, वाहतूक सोप्पी झाली. किंमत कमी करता आली आणि नवी बाजारपेठ ओपन झाली.

पुढे जागतिकीकरण आलं.  या काळात कोका कोला मार्केटमध्ये आली. अशा बड्या कंपनीपुढं टिकाव लागणं शक्य नसल्यानं रमेश चौहान यांनी सॉफ्ट डिंन्क्सचा बिझनेस कोका कोलाला विकून टाकला पण एकच ब्रॅण्ड आपल्याकडे ठेवला तो म्हणजे बिस्लेरी..

यासाठी टप्याटप्याने रमेश चौहान यांनी कस मार्केटिंग केलं ते पाहू

त्याचं उत्तर आपल्याला मिळतं ते खालच्या फोटोतून.. 

Screenshot 2022 03 30 at 7.17.14 PM

ही बिस्लेरीची पहिली जाहीरात होती. यात बटलर झिरो बॅक्टेरिया एक्वॉ मिनरल बिसलेरी अशा प्रकारची जाहीरात करताना दिसतो. या जाहीरातीत बिस्लेरीने कोणाला टार्गेट केलं तर लहान मुलं, टुरिस्ट आणि बिझनेसमॅन.. जे लोकं वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात पण ते श्रीमंत आहेत अशा लोकांसाठी पाणी अशी ती जाहीरात. 

बिस्लेरीने पहिल्या टप्प्यात याच लोकांना आपलं ग्राहक केलं. बाटलीबंद पाणी पिणं हे श्रीमंतीचं आणि आरोग्याबाबतीत जागरूक असण्याचं लक्षणं आहे अस लोकांच्या पचनी पाडलं. त्यामुळे भारतातला एक हायक्लास बिस्लेरीला प्रेफरन्स देवू लागला. 

पण बिस्लेरीला माहिती होतं की अशा लोकांना पाणी विकून विकून किती विकणार. जोपर्यन्त सर्वसामान्य भारतीय माणूस बाटलीतलं पाणी पिणार नाही तोपर्यन्त या क्षेत्रात पाहीजे तितका नफा मिळवता येणार नाही.. 

त्यासाठी बिस्लेरीने भारतातल्या लग्न समारंभांना टार्गेट केलं. बऱ्यापैकी उच्चमध्यमवर्गीय लग्नामध्ये बिस्लेरीची ५०० मिली लिटरची बाटली सॅम्पल म्हणून देण्यास सुरवात केली. त्यासाठी किंमत कमी करण्यात आली. कमी किंमतीमुळे ब्रॅण्ड चालू लागला. मुंबईच्या लोकलमध्ये टार्गेट करण्यात आलं. सातत्याने प्रवास करणारे व बाहेर राहणाऱ्या नोकरदार वर्गाकडे हे बाटलीबंद पाणी घेवून जाण्यात कंपनीनं यश मिळवलं. 

पुढे मार्केट सेट होतं गेलं. जागतिकरणात ब्रॅण्ड अस्सल भारतीय आणि विश्वासू होत गेला. पाणी म्हणजे बिस्लेरी हे समीकरण घट्ट झालं आणि संपूर्ण भारतात बिस्लेरीने आपलं बस्तान बसवलं. 

पण हे करताना कुठेही पाणी मिळेल हे धोरण कंपनीने खूप उशीरा आणलं. सुरवातीला त्यांनी हॉस्पीटल, मेडिकल अशा ठिकाणी बिस्लेरी ठेवण्यास सुरवात केली. त्यामुळे एक आरोग्यविषयक ब्रॅण्डव्हॅल्यू ॲड होत गेली. 

पुढे हे मोकळं मार्केट अनेकांनी हेरलं.

छोट्या मोठ्या कंपन्या मार्केटमध्ये येवू लागल्या. बिस्लेरीचा निळा रंग घेवून प्रत्येकांने आपल्या बाटल्यांसाठी निळा रंगच वापरला. अशा वेळी २००६ मध्ये बिस्लेरीने वेगळेपण जपायला हिरव्या रंगात आपल्या बाटल्या आणल्या. तेव्हा मार्केटमध्ये असणाऱ्या सर्व बाटल्या निळ्या रंगात न्हावून गेलेल्या. जेव्हा मिनरल वॉटरच्या मार्केटचा बाजार उठू लागला तेव्हा आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू जपण्यासाठी मोठ्ठी हॉटेल्स, शॉपिंगमॉल्स, एअरपोर्ट इथे असणारं आपलं मार्केट त्यांनी सहजासहजी हलून दिल नाही त्यामुळं तो ब्रॅण्ड यशस्वी झाला.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.