तेव्हा फुल कॉन्फिडन्स होता, या गेमच्या जीवावर आमच्या भावकीनं रशियापर्यंत रान हाणलं असतं

आता साल नेमकं आठवत नाय, पण ते दिवस लय भारी होते. सगळा दिवस रानात किंवा मैदानात जायचा, गुडघे फुटलेले असणं हा सन्मान समजला जायचा, जगातलं सगळ्यात मोठं टेन्शन गणिताचे मास्तर द्यायचे आणि दहा रुपये म्हणजे लय मोठी संपत्ती वाटायची.

साल आठवत नसलं तरी, हा काळ नाईंटीजच्या पोरांची जन्नत असणारा होता.

याच दरम्यान मैदानातले खेळ कमी झाले नसले, तरी व्हिडीओ गेम्स नावाचं एक नवं फॅड आलं होतं. काही काही गावात पडदे लाऊन सुरू असलेली व्हिडीओ गेम पार्लर फॉर्मात आली होती. पण कायम बंद असलेले पडदे, आतला लाल लाईट आणि वाऱ्यामुळं पडदे उडाले की आत बघताना पडलेले फटके यामुळं व्हिडीओ गेम म्हणजे बाद कार्यक्रम असं फिक्स डोक्यात बसलं होतं.

पण काळाची आणि तंत्रज्ञानाची बटणं दाबली गेली, एकटेपणाचा कंटाळा घालवण्यासाठी एक मसीहा आला. कुठंही नेता येणारी, हातात घेऊन खेळता येणारी ही गेम म्हणजे लय भारी विषय होता.

या गेमचं नाव होतं ब्रिक टॉय.

मोजून ९ बटणं, सेंटीमीटरची पट्टी मोठी वाटेल इतकी साईज, किंमत धरा २००-३०० रुपये… पण गेमचे पर्याय किती तर ९९९९. व्हिडीओ गेम ही लय बाप गोष्ट आहे, हे याच ब्रिक टॉयमुळं समजलं.

पण आपलं बालपण भारी करायला हातभार लावणाऱ्या या हातभर गेमचा इतिहास काय आहे…?

या गेमचे मूळ पुरुष घावतात, रशियामध्ये. सोव्हिएत युनियनमधल्या लोकांनी ‘Tetris’ नावाची गेम १९८४-८५ च्या दरम्यान लॉंच केली. यात काय असायचं, तर वेगवेगळे आकार स्क्रीनवरच्या रिकाम्या जागेत यायची, मग ते आकार एकमेकांमध्ये बसवायचे. आकार फिट बसले की जागा मोकळी होणार आणि नवे आकार येत राहणार.

वाचून भंजाळला असाल, तर एकदा गेम बघून घ्या…

लोकं येतात, फिट बसतात, जागा मोकळी करतात, पुन्हा नवी लोकं… दुनियादारीचा पहिला धडा इथं मिळाला.

लिहिता लिहिता जरा लयच डीप झालं. चालायचंच.

मग १९९०-९१ नंतर चायनीज लोकांना वाटलं, हे टेट्रिस तर बेसिक ए आपण याच्यापेक्षा बाप गोष्ट बनवू. म्हणून त्यांनी काय केलं, तर आधी टेट्रिसची कॉपी केली. मग त्याच्यात चायनीज मसाला ओतला (जरा जास्तच ओतला.) नंतर आपल्या भेटीला आलं… ब्रिक टॉय.

हा चायना माल असला तरी, एक स्कीम याला लागू पडली. चले तो चांद तक, नही तो शाम तक. चांद तक चाललेली ही पहिली चायनीज गोष्ट, दुसऱ्याचं नाव घेतलं की लाट यायची भीती वाटते.

ब्रिक टॉय परफेक्ट हातात बसायचं. त्याला मोजून ९ बटणं होती. एक जॉयस्टिकसारखं गोल फिरायचं, दुसरी चार चार दिशांची बटणं होती आणि वरती ऑन-ऑफ, स्टार्ट/पॉझ, साऊंड आणि रिसेट अशी चार बारकी गाभडी होती.

यात गेम कुठल्या होत्या?

पहिली होती शूटिंगवाली.

 म्हणजे थोडक्यात गोळीबार. वरुन वेगळेवेगळे आकार येणार आणि आपण खालनं गोळ्या मारायच्या. सुरुवातीला हे लय सोप्पं वाटायचं, पण नंतर स्पीड वाढायचा आणि बॉस लेव्हलला हमखास बाजार उठायचा.

दुसरी होती रेसिंगची. 

१० चौकोनांच्या डिझाईनला गाडी का म्हणावं हा प्रश्न तेव्हा खरंच पडला नाय. आजूबाजूच्या गाड्यांना अजिबात न धडकता पुढं जात राहायचं, हळूहळू स्पीड वाढायचा आणि गपकन एखादी गाडी समोर यायची… आपण धडकून बाद.

तिसरी गेम होती, टेट्रिसची फर्स्ट कॉपी.

आता डिट्टो टेट्रिस काढली असती, तर पुतीननं चायनात सैन्य घातलं असतं (पुतीन पाचशे वर्ष जगलाय या अफवेला आठवून हे लिहिलंय.) त्यामुळं, त्यांनी थोडी व्हरायटी आणली. टेट्रिसचे आकार उलटे जायचे, आधीच एखादा बेस खाली तयार असायचा. असलं काय काय… ‘याच कलरमध्ये दुसरा पॅटर्न दाखवा ना’ याची खरी सुरुवात इथूनच झाली.

चौथी फेमस गेम म्हणजे, पुन्हा शूटिंग.

यात आपण बेसला असायचो आणि वरती ब्लॉक्सच्या आडव्या रांगा, या रांगा एक एक स्टेप खाली यायच्या आणि आपल्याकडचा ब्लॉक यांना धडकून पुन्हा खाली यायचा. समजा तो ब्लॉक झेलायला आपण हुकलो किंवा खाली येणाऱ्या रांगेनं तळ गाठला, तर आपला कार्यक्रम सप्पय गंडला.

ब्रिक टॉयचा आणखी एक भारी विषय म्हणजे, इथं पुढची लेव्हल पार करायला आधीची लेव्हल पूर्ण झालीच पाहिजे असा काही हट्ट नसायचा. नुसतं क्लिक केलं की, दुसऱ्या लेव्हलपासून पार शेवटच्या लेव्हलपर्यंत जाता यायचं. 

पोरांमध्ये हवा करता यायची खरी, पण लेव्हल खेळून दाखव म्हणल्यावर पद्धतशीर बल्ल्या व्हायचा.

ही गेम मिळायची स्वस्तात, चालायची सेलवर, त्यामुळं बड्डे, परीक्षेत (चुकून) चांगले मिळालेले मार्क अशावेळी घरच्यांचं ठरलेलं गिफ्ट असायचं. दुपारी घरातले झोपले, की गेम ऑन केल्याकेल्या साऊंडचं बटण बंद करावं लागायचं. एक मात्र होतं, या गेमचं आपल्याला व्यसन लागलं नाही, उलट एक व्हिडीओ गेमही चार पोरं खेळू शकतील याचा नाद आपल्याला लागला.

ब्रिक टॉयनं आपलं बालपण तर गाजवलंच, पण या गेमचा खरा बादशहा होता आपला लाडका डिस्को डान्सर दस्तुरखुद्द मिथुन चक्रवर्ती.

कारण, आपण ब्रिक टॉयनं गेम खेळत राहिलो, तिकडं मिथुनदानं ब्रिक टॉयनं बॉम्ब उडवला.

खोटं वाटत असलं, तर हा व्हिडीओ बघा

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.