बृजभूषण सिंगांची राजकीय ताकद ज्यामुळे ते योगी आदित्यनाथ यांना देखील आव्हान देतात

बृजभूषण सिंग गेल्या काही महिन्यात सारखं हे नाव चर्चेत येत होतं. भाजपचे खासदार, कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष, उत्तरप्रदेशामधले बाहुबली अशा अनेक कारणाने हा माणूस चर्चेत असतो. मात्र या वेळी हा माणूस अत्यंत वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

बृजभूषण सिंह यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. भारताच्या प्रसिद्ध महिला पहिलवानांनी हे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्तीपटू विनेश फोगाटसह अन्य महिला पहिलवान आंदोलनाला देखील बसले होते. बृजभूषण सिंग यांनी मात्र अस काही झालंच नसल्याचं म्हणत आपल्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून ऑलम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम पदक विजेत्यांसह कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ७२ तासांत उत्तर द्यावे. असं बृजभूषण सिंह याना सांगण्यात आलं आहे. मात्र बृजभूषण सिंग यांची राजकीय ताकद पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई होणार नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह यांची नक्की राजकीय ताकद किती आहे तेच जाणून घेऊया.

30 मे 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधानांचे पत्र तिहार तुरुंगातील एका प्रभावशाली खासदारापर्यंत पोहोचले.

त्यात लिहिले होते, प्रिय ब्रिजभूषण जी, सप्रेम नमस्कार. तुमची बातमी मिळाली, तुम्हाला जामिनासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. तुमच्यात हिंमत आहे, जर अच्छे दिन आले नाहीत तर वाईट दिवस नक्कीच येणार नाहीत. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सावरकरांची आठवण ठेवा, वाचा, संगीत ऐका, आनंदी रहा, मी लवकरच येईन. हार मानू नका , घाबरू नका, हरिचे नाव घेणं सोडू नका.

पत्र लिहिणाऱ्या तत्कालीन पंतप्रधानांचे नाव होतं अटलबिहारी वाजपेयी.

केंद्रात केवळ  13 दिवस सरकार चालवणारे अटल पहिल्यांदाच पंतप्रधान झाले होते आणि ज्या खासदाराला त्यांनी हे अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक पत्र लिहिलं होतं त्याच नाव होतं ब्रिजभूषण शरण सिंह.

वाजपेयींसारखे मोठे नेते बृजभूषण यांना जेलमधून पत्र लिहतात यावरून या बाहुबली नेत्याच्या राजकीय वजनाची कल्पन येते. बाहुबली यासाठी की उत्तरप्रदेशमध्ये माफिया म्हणून बृजभूषण यांची ओळख आहे. एवढंच नाही तर दाऊदच्या शूटर्सना आसरा दिल्याचे आरोपही बृजभूषण यांच्यावर झाले होते. मात्र राजकीय कारकिर्दीच्या पुढे बृजभूषण यांची इमेज मागे पडली आहे.

स्वतः सहावेळा खासदार, मुलगा दोन वेळा आमदार यामुळे बृजभूषण शरण सिंह आज उत्तरप्रदेशामधले भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात.

त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही शिंगावर घेण्यास बृजमोहन सिंह मागे-पुढे पाहत नाहीत. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं तर दौऱ्याला असणारा विरोध मागे घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा मी योगींकडून सूचना घेत नाही असं सरळ उत्तर बृजभूषण यांनी दिला होतं.

त्याआधीही पूर्वांचलामध्ये जेव्हा घागरा नदीला पूर आला होता तेव्हा सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यास पुरतं फेल झाल्याचं म्हणत त्यांनी योगी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची  कारवाई होईल असं म्हटलं जात होतं मात्र तशी कोणतीही कारवाई बृजभूषण यांच्यावर झाली नाही. त्यानंतर त्यांनी भाजपचे अत्यंत जवळ मानले जाणाऱ्या बाबा रामदेव यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती.

पूर्वांचलमधून येणाऱ्या पतांजली साधूंचं नाव वापरून रामदेव नकली तूप, अंडरवेअर, बनियान विकून पैसे कमवत असल्याचा आरोप बृजभूषण यांनी केला होता.

मात्र तरीही भाजपश्रेष्टींकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.त्यामुळे सरळ योगी आदित्यनाथ यांना टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या बृजभूषण यांची खरे ताकद आहे उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल भागात त्यांचा असणारा दबदबा. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ देखील पूर्वांचल भागातूनच येतात. मात्र पूर्वांचलच विचार करायचा झाल्यास गोंडा, बलरामपूर, बहराइच, श्रावस्ती आणि अयोध्यापर्यंत बृजभूषण सिंग यांचा प्रभाव आहे.

आज किमान 3 लोकसभा आणि डझनभर विधानसभा तसेच पंचायत आणि स्थानिक पातळीवर बृजभूषण सिंग यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना दुखावणं भाजपाला सोपा नसणार आहे.

अजून एक गोष्ट म्हणजे उत्तर भारतात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेल्या ठाकूर समजातून बृजभूषण सिंग येतात. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात देखील ते अनेकदा हा मुद्दा हायलाइट करतात. आता इथं पण एक गोष्ट त्यांची योगी आदित्यनाथ यांच्याशी कॉमन आहे ती म्हणजे मूळचे अजयकुमार बिष्ट असलेले योगी आदित्यनाथ देखील ठाकूर समजातून येतात आणि ठाकूर समाजातील योगींच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकतात.

बृजभूषण सिंग यांची राजकीय ताकद वाढवणारी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची हिंदू नेत्याची छबी.

1993 मध्ये वादग्रस्त बाबरी मस्जिदीची वास्तू पाडण्यात आली, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 40 जणांना आरोपी बनवण्यात आले त्यात ब्रिजभूषण यांचा समावेश होता. सीबीआयने त्यासाठी त्यानं अटक देखील केली होती. त्यानंतरही राम मंदिराच्या आंदोलनात बृजभूषण पुढे होते. त्यामुळे एक कट्टर हिंदुत्ववादी नेत्याची त्यांची छबी आहे. जी पुन्हा योगी आदित्यनाथ यांच्याशी साम्य खाते.

त्यामुळे जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात बोलूनही बृजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई होता नाही. भाजप पक्षश्रेष्टींकडून कोणती समजही दिली जात नाही. त्यामुळे योगींना ऑप्शन म्हणून बृजमोहन यांना पुढं आणलं जात आहे का ? असा ही प्रश्न विचारला जात असतो. आता मात्र लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे बृजभूषण चांगलेच अडकले आहेत. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी ते आपली राजकीय ताकद वापरणार का हे येणाऱ्या काळात कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.