६२ च्या चीनच्या युद्धात आपण शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे “बीएसएफ”

बीएसएफची मोठी कारवाई, एवढे दहशतवादी ठार, पाकचे इतके बंकर्स उद्धस्त अशा अनेक अभिमानास्पद बातम्या आपण बऱ्याचदा ऐकत असतो. त्यामुळे या जवानांना एक तरी कडक सॅल्युट करुच वाटतो. तर भिडूनों आज तशी संधी आहे. एक सॅल्युट तर कराच.

कारण बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या धगधगत्या पराक्रमाला आज ५६ वर्ष पुर्ण होत आहेत.

जीवनसंपे पर्यंत कर्तव्य (Dying unto death) या घोषवाक्याखाली मागील वर्षानुवर्ष हे जवान आपले आणि आपल्या देशांच्या सीमांचे डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत. सोबतच दहशतवादी हल्ले आणि तस्करी रोखण्यासाठी या निमलष्करी दलाची विशेष ओळख आहे.

तब्बल १८६ बटालियन आणि २.४ लाख जवान असणाऱ्या या दलाला India’s First wall of Defense म्हणजे भारताची पहिली संरक्षक भिंत म्हणतात. शत्रुकडून कोणताही हल्ला झाला तर सगळ्यात आधी हे जवान तो आपल्या अंगावर झेलतात आणि परतवुन लावतात.

त्यामुळे सहाजिकच एवढ्या मोठ्या दलाची स्थापना इतिहासात कशी झाली हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच.

तर असा आहे बीएसएफच्या स्थापनेचा इतिहास..

१९६२ मध्ये चीन विरुद्धच्या युद्धात भारताचा पराभव झाला. त्याकाळातील याच एक मुख्य कारण आपली अपुरी लष्करी तयारी हे सांगितले जाते. पण त्यासोबतच आपल्याकडे त्यावेळी सीमेवरच्या सुरक्षेसाठी कोणतीही विशेष फौज नव्हती.

त्या ऐवजी त्या – त्या संबंधित राज्यातील पोलिसच भारतीय सीमांचे रक्षण करायचे.

१९६२ साली चीन सोबतच्या युद्धाला सुरुवात झाल्या नंतर पाचव्या दिवशीच चीनच्या बाजूला असणाऱ्या सीमांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून सगळ्यात मोठा उपाय शोधला गेला. हा उपाय इंडो – तिबेट बॉर्डर पोलिस या फौजेची स्थापना करण्याचा होता. मात्र यानंतर देखील भारत युद्ध हरलाच.

चीनचे युद्ध हारल्यानंतर आता दुसरा मोठा धोका होता पाकिस्तानला जोडून असणाऱ्या सीमांचा. ज्या सगळ्यात जास्त असुरक्षित होत्या. चीन आणि तिबेटसाठी आयटीबीपी फौजेची स्थापना झाली होती. पण पाकिस्तानला लागुन असणाऱ्या सीमांच्या रक्षणाची जबाबदारी अद्यापही राज्यांच्या पोलिसांवरच होती.

यामुळे पाकिस्तान हल्ला करु शकतो. आपल्या अपुऱ्या तयारीचा फायदा उचलू शकतो अशी भिती वारंवार व्यक्त केली जायची. त्यामुळे एका वेगळ्या फोर्सची गरज प्रकर्षाने जाणव होती.

अशातच १९६५ मध्ये ही भिती खरी ठरली. शेजारच्याच या देशाने भारताविरुद्ध युद्ध पुकारले. अगदी गुजरातमधील कच्छ पर्यंत पाकिस्तानने सैन्य घुसवले. यावरुनच आपण अंदाज लावू शकतो की आपल्या सीमांची परिस्थिती किती नाजूक होती.

अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या सैन्याने हार न मानता पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकले.

याच युद्धानंतर केंद्र सरकारने एक केंद्रीय सुरक्षा एजन्सीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्यावर फक्त भारतीय सीमांचे रक्षण करणे एवढीच जबाबदारी असेल. आणि या निर्णयाद्वारे १ डिसेंबर १९६५ ला सीमा सुरक्षा दल अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना केली गेली.

त्यामुळे राज्यांच्या पोलिसांवरील ताण हलका होण्यासाठी मदत झाली. सोबतच सीमा देखील सुरक्षित झाल्या.

त्यानंतर लगेच बांग्लादेश युद्धाची सुरुवात झाली. बीएसएफचे संस्थापक के. एफ. रुस्तमजी यांनी १९७१ च्या या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे बीएसएफचे सुरक्षेमधील योगदान लक्षात घेता समुद्रांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाच्या स्थापनेसाठी ही त्यांना पाचारण करण्यात आले.

बीएसएफचे जवान केवळ सीमांचेच रक्षण करतात असे नाही तर भुकंप, महापूर अशा बाधित लोकांच्या बचावाचे देखील कार्य करतात. २००१ च्या भूज भूकंपात पीडितांना मदत करण्यासाठी सर्वाच्या आधी बीएसएफचे जवान पोहोचले होते.

बीएसएफकडे देशाच्या अंतर्गत रक्षणाची जबाबदारी…

त्यानंतर बीएसएफ कडे देशाच्या अंतर्गत रक्षणाची देखील जबाबदारी देण्यात आली. आपल्या देशातील गडचिरोली, छत्तीसगडचा काही भाग, झारखंड इथे अनेक नक्षल प्रभावित क्षेत्र आहेत. जिथे बीएसएफ काम करते.

छत्तीसगडचे सांगायचे तर २००९ मध्ये राज्यांतर्गत नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी बीएसएफची एक तुकडी कांकेर जिल्ह्यात तैनात केली होती. तेव्हापासून या तुकडीचा दबदबा तिथे दिसून येतो.

हे देखील खरे आहे की आज ही इथे नक्षलवादी हल्ले होतच असतात पण नागरिकांच्या मनातील भिती घालवण्यात बीएसएफ यशस्वी झाले आहे.

निमलष्करी दलाचा दर्जा…

भारतीय सेना आणि बीएसएफ यामध्ये एक बेसिक फरक आहे. बीएसएफ सेंट्रल आर्म्ड पुलिस फोर्स (CAPF) मध्ये येते. जे सुरक्षा दल गृह मंत्रालयाच्या अखत्यारिमध्ये असते. तर भारतीय सेना ही संरक्षण मंत्रालयाच्या अधिन असते.

बीएसएफचे जवान जास्तीत पीस-टाइम च्या दरम्यान सीमेवर तैनात असतात. तर भारतीय सेना युद्धाच्या दरम्यान सीमेवर जाते. इतर काळात भारतीय सेनेचे जवान युद्धासाठी स्वतःला तयार करतात. ट्रेनिंग घेतात. सोबतच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन देखील करतात.

आज कशी आहे बीएसएफ..?

पाकिस्तान लगतच्या जवळपास सगळ्याच सीमेवर बीएसएफचे जवान तैनात असतात. आज दुर्गम भागात जाण्यासाठी बीएसएफकडे उंट आणि श्वानपथकाची वेगळी फौज देखील आहे.

दंगल आटोक्यात आणण्यासाठी ज्या अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर होतो, तो अश्रुधूर निर्माण करणारे Tear Smoke unit युनिट बीएसएफतर्फे चालवले जाते. आधी केवळ पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या संस्थेत आता स्त्रियांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. बीएसएफच्या काही अधिकाऱ्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमांवर पाठवले जाते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.