जनता दलापासून ते शेतकरी संघटनेच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनाच एकेकाळी मायावतींनी झुकवलंय
उत्तरप्रदेशच्या राजकारणात मोठं होण्यासाठी धाडस लागतंय, आणि ते धाडस एकेकाळी मायावतींनी दाखवलं होत!
आपल्या वादग्रस्त आणि अतार्किक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राज नारायण मंत्रीपदी असताना एकदा एका मोठया कॉन्फरन्ससाठी गेले होते. त्यादिवशीच्या भाषणात ते दलितांच्या हिताच्या अनेक गोष्टी बोलले, पण एक चूक केली. आपल्या भाषणादरम्यान नेहमी प्रमाणे असाचं एक वादग्रस्त शब्द ते सतत बोलत होते. काँग्रेस सदस्यांसारखं ते देखील महात्मा गांधींनी दिलेला ‘हरिजन’ शब्द वापरत राहिले.
समोर एक २२ वर्षांच्या मायावती बसल्या होत्या. त्यावेळी कोणत्याही प्रकारे राजकारणात नसलेल्या दिल्ली विद्यापीठामधून वकिलीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या मायावतींना हा शब्द सहन झाला नाही. जेव्हा बोलण्याची वेळ आली तेव्हा मायावतींनी भाषणात राज नारायण, जनता पक्ष आणि काँग्रेस सगळ्यांचेच धिंडवडे काढले. त्या म्हणाल्या,
गांधींनी आम्हाला बेइज्जत करण्यासाठी हा शब्द बनवला होता. देवाची मुलं म्हणजे हरिजन. जर आम्ही हरिजन असू तर देवदासींच्या मुलांचं काय? आणि त्या मुलांचं काय ज्यांना आपल्या वडिलांच्या मुलांचं नावच माहित नाही. जर शब्दामध्ये बोलायचं म्हंटल तर मग ते देखील हरिजनच झाले ना? आमचा देव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी कधी हरिजन हा शब्द वापरला नाही. अगदी संविधान बनवलं तर लिहिले अनुसूचित जाती. मग हे सगळे आम्हाला सारखं हरिजन का म्हणतात?
मायावती यांच्या या तुफानी भाषणानंतर तिथे असलेले दलित समाजातील लोक प्रेरित झाले. राज नारायण मुर्दाबाद, जनता पक्ष मुर्दाबाद अशा घोषणा चालू झाल्या. घोषणा दिल्या होत्या बामसेफच्या कार्यकर्त्यांनी. बामसेफ म्हणजेच काशीराम यांनी स्थापन केलेला बॅकवॉर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज इंप्लाईज फेडरेशन.
बामसेफच्या कार्यकर्त्यांनी काशीराम याना मायावतींबद्दल आणि घडलेला सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर कांशीराम न राहून मायावती यांची भेट घेतली. यानंतरचा इतिहास सगळ्यांसमोर आहे.
दिल्लीतल्या गौतम बुद्ध नगरमध्ये टपाल कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या प्रभुदास आणि त्यांच्या पत्नी रामरती यांनी मायावतींना जन्म दिला. गरीब आणि दलित कुटुंबात जन्मलेली ही मुलगी भारताच्या सर्वात सर्वात दुर्बल घटकातीलसर्वात शक्तिशाली स्त्री बनेल आणि भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक अशा उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री होईल, हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा कधी आलं नसेल.
१५ जानेवारी १९५६ जन्मलेल्या मायावतींना ६ भाऊ आणि २ बहिणी. जातीने मागास असणाऱ्या मायावतींना कुटुंबात सुद्धा मागासलेपणाची वागणूक मिळाली. त्यांचे भाऊ खाजगी शाळेत, तर बहिणी आणि त्या सरकारी शाळेत जायच्या. मायावतींना कलेक्टर बनायचं होत, पण नशिबात काहीतरी दुसरंच वाढून ठेवलं होत. ज्यावेळी काशीराम यांनी मायावतींना आपल्या पक्षात घेतलं तेव्हा काशीराम म्हंटले होते,
‘तुम्हारे इरादे, हौसले और कुछ खासियत मेरी नज़र में आई हैं. मैं एक दिन तुम्हें इतनी बड़ी लीडर बना दूंगा कि एक कलेक्टर नहीं बल्कि तमाम कलेक्टर तुम्हारे सामने फाइल लिए खड़े होंगे. तभी तुम लोगों के लिए ठीक से काम कर पाओगी.’
मायावती कांशीराम यांच्या सोबत जोडल्या गेल्या. १९८४ मध्ये बहुजन समाजवादी पक्षाची स्थापना झाली. उत्तरप्रदेशमधील कैराना या विधानसभा मतदारसंघातून मायावतींनी निवडणूक लढवली, पण पराभव झाला. पुन्हा १९८५ मध्ये कांशीराम यांनी बिजनौर मधून लोकसभेच्या पोटनिवडणुकीला उभं केलं, पण पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. मात्र यावेळी मायावतींनी जवळपास १ लाख पेक्षा जास्त मत घेतली.
अखेरीस १९८९ मध्ये मायावती आणि कांशीराम यांनी आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बिजनौरमधून त्यांनी ९ हजार मतांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली.
विशेष म्हणजे तेव्हा उत्तरप्रदेशमध्ये जनता दलाची लाट होती. यानंतर मायावती, कांशीराम आणि बहुजन समाजवादी पक्षानं मागं वळून बघितलं नाही. राज नारायण यांच्या समोर दिलेलं भाषण आणि तो दिवस मायावतींच आयुष्य कायमच बदलून गेला. पुढे त्यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली.
मायावती यांनी मुख्यमंत्री म्हणून नेहमीच कार्यक्षम आणि कठोर प्रशासक म्हणून सत्ता चालवली. त्यांच्या कारकिर्दीचा एक किस्सा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिला जातो. तो म्हणजे शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांना केलेली अटक.
एका जाहीर सभेत महेंद्रसिंग टिकैत यांनी मायावतींवर तोफ डागताना जातीयवादी शिवीगाळ केली होती. जातीवाचक शिवीमुळे मायावतींनी तत्काळ टिकैतला अटक करण्याचे आदेश दिले. टिकैत ताबडतोब त्यांच्या सिसौली (मुझफ्फरनगर) गावात पळून गेले. तेव्हा गावाला वेढा घालून पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला. गाव वेठीला धरलंय बघून अखेर टिकैत यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून मायावतींची माफी मागावी लागली.
हे हि वाच भिडू.
- मायावतींच्याही आधी देशभरात दलित राजकारणाचं नेतृत्व शांताबाईंनी गाजवलं होतं
- युपीमध्ये महागठबंधन तुटण्यामागे खूप वर्षापूर्वी झालेलं मायावती गेस्टहाऊस कांड आहे
- दलित कुटुंबातून आलेल्या पैकाबाई भारतातल्या पहिल्या महिला उद्योजिका होत्या.