पालथ्या बकेटवर पाणी.

माधुरी मराठीत येणार म्हणून खूप हाईप झाली असली तरी बकेट लिस्टच का निवडला असा प्रश्न आपल्यासारख्या तिच्या निस्सीम चाहत्यांना पडण्याची शक्यता आहे. आपलं हृदय असणारी धकधक गर्ल माधुरीचं हृदय या चित्रपटात ट्रान्सप्लांट होतं. ज्या तरुण मुलीचं हृदय माधुरीला देण्यात येतं तिच्या अकाली मृत्यूमूळे अपुऱ्या राहिलेल्या इच्छा म्हणजे बकेट लिस्ट माधुरी पूर्ण करते. असं एका वाक्याचं कथानक आहे. बाकी चित्रपटात काहीच नाही. बरं जेवढं या एका वाक्यात आहे तेवढंच चित्रपटात असतं तरी चाललं असतं. पण उगाच घुसडलेले प्रसंग आणि गाणी यांच्यामुळे डोकं धरूनच प्रेक्षक बाहेर येतो.

बकेट लिस्ट हा ओतप्रोत ब्राह्मणी चित्रपट आहे. चित्रपटाला जातबीत असते का असले बाळबोध प्रश्न पडत असतील तरच बकेट लिस्ट पहावा. कोषात अडकल्यासारखे तुटपुंजे सामाजिक-राजकीय भान असलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व ब्राह्मणी चित्रपट करतात. तिथे रूढार्थाने आडनावाची जात नाही तर आपल्या आजूबाजूला आलबेल चाललेले असून आपलेच काय ते दुखणे जगात भारी असे दाखवणाऱ्या वर्गाची जात ब्राम्हण आहे. चित्रपटात माधुरीला हृदय देणाऱ्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्या वाटतात. पण अशा हार्ट ट्रान्सप्लांट ची गरज असणारे आणि गरीबीने पछाडलेले असंख्य लोक कोथरुड, प्रभात रोड च्या बाहेर आहेत हे लक्षात येत नाही ही खरी अप्पलपोटी ब्राह्मणी लक्षणे.

चित्रपट प्रचंड रटाळ आहे. कथा राहिली एकीकडे आणि व्यक्तिरेखांमधले प्रसंग, संवाद राहिलेत दुसरीकडे. कोणताही परस्पर संबंध तयार होत नाही. प्रत्येक चित्रपटाने आपले स्वतःचे जग तयार करायला हवे. ज्यात प्रेक्षकांना गुरफटून टाकणे हे दिग्दर्शकाचे पहिले कर्तव्य आहे. इथे तसे काहीच होत नाही. तुम्ही फक्त माधुरीला हसताना पहा, नाचताना पहा, सेक्स वरचे मध्यमवर्गीय ब्राम्हण प्रमाणित मॉडरेट जोक वर हसा बस. प्रेक्षकांकडुन इतकीच माफक अपेक्षा दिग्दर्शकाची असावी. पण प्रेक्षक मूर्ख नसतात (जसे की मतदार ही मूर्ख नसतात). म्हणून त्यांना सर्व प्रकारचे प्रश्न पडू शकतात.माधुरीसाठी फक्त चित्रपट पहायचा असेल तर या प्रश्नांमुळे तुम्ही थेटराबाहेर मेंदू काढून ठेऊ शकता.

आता चित्रपट पाहताना आपल्याला आपल्या वर्गवर्णव्यवस्थेचे प्रश्न पडावेत का की एका सुखी तुपकट वरणभात आयुष्यात आपण सर्व विसरून जायला पाहिजे हाही खरा प्रश्न होऊ शकतो. या आर्ग्युमेंटला अंत नाही कितीही परिषदा घेतल्या तरी. पण निदान चित्रपट चित्रपटासारखा असावा. बकेट लिस्ट एक सीरिअल आहे. जी दुपार संध्याकाळ आपल्या आयाबहिणींना झीमराठी वरून बाणेदार पांचट आणि कंटाळाप्रवण बनवतेय. एकही दुःख अनुभवातलं नाही एकही आनंद खरा नाही. सर्व एका ठराविक वर्णवर्गाला संबोधून केलेलं आहे. माधुरी विषयी बोलायचं तर ती सुंदर होती आणि आहे. एखाद्या अप्सरेसारखी. पण तिच्या उमेदितले किती चित्रपट आपल्याला आठवतात? 4 फारतर 5. तिची निवड तेव्हाही प्रश्न उभे करायची आणि आताही तीच अवस्थाय. बाकीच्या अभिनेत्यांविषयी फारसे बोलण्यात अर्थ नाही ते वरच्या सर्व ब्राह्मणी ऱ्हेटोरिकचे मनापासून पालन करतात. संगीत अतिशय वाईट आहे. प्रत्येक प्रसंगाला सिरीयल चे स्टॉक संगीत वापरल्यासारखे वाटते. छायाचित्रणात काहीच नावीन्य नाही. मोजून 3- 4 लेन्स वापरल्या गेल्या आहेत असे दिसते. व्यक्तिरेखा प्रत्येक प्रसंगात बोलतात आणि त्यांना बोलतानाच शूट केलेले आहे. चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा खोटी आणि मूर्ख वाटण्याची दाट शक्यता आहे. त्यांना वाटणाऱ्या भावनासुद्धा आपल्याला खोट्या वाटायला लागतात. चित्रपटाविषयी सांगण्यासारखे काहीच नाही. बघितला नाही तरी चालेल. त्याऐवजी तेजाब, हम आपके है कौन पाहून आपले समाधान होऊन माधुरी अनुशेष भरून निघू शकेल.

 

  • अरविंद गजानन जोशी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.