कित्येक परदेशी ब्रँड आले पण भारतातील पहिली वेफर्स कंपनी त्यांच्या नाकावर टिच्चून उभी आहे…

स्वातंत्र्यानंतरचा काळ, पुण्यातला कँम्प म्हणजे एक छोट इंग्लिश गाव होतं. इंग्रज गेले मात्र जाताना आपली वसवलेली छावणी इथे सोडून गेले. ब्रिटीशपद्धतीच्या इमारती. आधुनिक पेहरावात वावरत असलेल्या आंग्ल भाषा बोलणाऱ्या पोरीबाळी, मार्झओ रीन सारखी अवघड नावे असलेले कॅफे आणखी काय काय बरच.

साधासुधा पुणेकर या भागात फिरकायचा नाही. कधी तर संध्याकाळी इंग्लिश सिनेमाची हुक्की आली तरी सायकलीवर टांग मारून काही तरुण मुले वेस्ट एंड ला यायचे. तिथे खायला देखील इंग्लिश पद्धतीच मिळायचं. मग काय सिनेमाला जाताना काही तरी तोंडात टाकायला म्हणून तिथल्या ठेल्यावरच काही तरी चटकमटक घेतल जायचं. यातच एक पदार्थ फेमस झाला,

बुधानीचे बटाटा वेफर्स.

हे बुधानी म्हणजे तीन भाऊ. माधवजी मोतीलाल आणि मंगलदास बुधानी. आपल्या बहिणीच्या नवऱ्याला मदत करायचं म्हणून दुष्काळी भूज गुजरातमधून पुण्याला आले. त्याच्या ठेल्यावर बटाटा तळू लागले. पुढे त्याने ठेला बंद केल्यावर स्वतःचा ठेला सुरु करायचं ठरवल.

खिशात फक्त २५ रुपये होते. एक तवा,कढई, बटाटा खिसायचं मशीन, स्टोव्ह आणि तेल. आपल्या एका पाहुण्याकडून १०० रुपये उसने घेतले आणि हा धंदा सुरु केला. साल होतं १९५५. दहा बाय दहा च्या खोलीत हे वेफर्स बनवण्याचं काम चालायचं. घरातल्या बायका देखील मदत करायच्या. फक्त कँम्पच नाही तर पुण्याच्या पेठेमध्ये देखील सायकलवरून वेफर्स विकायला बुधानी बंधू जायचे.

बुधाणींच वैशिष्ट्य म्हणजे गुजराती चिवटपणा त्यांच्याकडे खूप होता. कष्ट करायला पुढे मागे पहायचे नाहीत.

आपल्या गिऱ्हाईकाचे सल्ले घेत प्रयोग करत करत त्यांनी स्वतःची अशी एक खास चव डेव्हलप केली. ताजा, अत्यंत कमी तेल, कमी मीठ, दर्जेदार कच्चा माल ही त्यांची खासियत होती. थोड्याच दिवसात बुधानींना पुणेकरांच्या चवीची नस सापडली. त्यांचे वेफर्स त्यांच्या नावाने गाजू लागले.

भारतात पहिल्यांदाच वेफर्सचा ब्रँड तयार झाला. नाव होतं, बुधानी वेफर्स रॉयल डीलाइट.

१९७२ साली त्यांनी एमजी रोड वर आपला पहिला शॉप सुरु केला.

कोळशाच्या भट्टीत गॅसचे फ्रायर आणले. पुढे प्रोडक्शन वाढवायला सेमी ऑटोमटिक मशीन आणि डीझेलवर चालणारी भट्टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स बनवायला सुरवात केली. पुण्याबरोबरच मुंबई व भारतभरातील मोठ्या शहरात बुधानी वेफर्स जाऊन पोहचले. दुकानांची संख्या वाढली. वेफर्स बरोबर बटाट्याचा चिवडा सारखे पदार्थ विकू लागले.

याच काळात बुधानींची अरविंद, दिलीप, सुरेश, किशोर, परेश ही पुढची पिढी धंद्यात उतरली, वेफर्सची मागणी दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली होती. या नव्या पिढीने बरेच बदल करायला सुरवात केली. बुधानींचा एकच मंत्र होता ,

 कितीही आधुनिक तंत्रज्ञान वापरा  पण काहीही झाल तरी चवीशी तडजोड करायची नाही,

परदेशात जाऊन तिथली टेक्नोलॉजी अनुभवून आलेल्या अरविद बुधानीनी १९८८ साली भारतातला पहिला स्टीलचा हिटप्रुफ, साऊंडप्रुफ, प्रदूषण विरहीत बटाटा चीप फ्रायर बनवला. ही क्रांतिकारी घटना होती. आधीच तुफान मागणी होती आता पुरवठा सुरु झाल्यामुळे बुधानी वेफर्सच्या दुकानात पाय ठेवायला जागा उरत नव्हती.

आणि म्हणूनच अरविंद बुधानीनी आपल्याकडे कॉम्प्युटर आणले.

आपल्या २ री नापास कामगाराला सुद्धा ते वापरायला शिकवलं. हे वर्ष होतं १९८९. नुकताच झालेल्या कम्युनिकेशन क्रांती नंतर आत्ता आत्ता आयटी कंपन्याकडे स्वतःचे हक्काचे कॉम्प्युटर येऊ लागले होते आणि अशा काळात भारतातली एक छोटी घरगुती वेफर्स बनवणारी कंपनी बिलिंग साठी कॉम्प्युटर वापरते हे एक स्वप्नवत वाटणारी गोष्ट होती.

परदेशात जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या बॅगेतून बुधानी वेफर्स अमेरिकेला जाऊन पोहचले होते. तेव्हा हे वेफर्स खाऊन बुधानीची कीर्ती ऐकून मायक्रोसॉफ्ट कंपनीमधला एक अधिकारी भारतात आला. त्याला देखील बुधानींची कम्प्युटराईज्ड सिस्टीम बघून आश्चर्याचा धक्का बसला.

बुधानींच्या विंडोज वेफर्सच कौतुक तो मायक्रोसॉफ्ट कंपनीत सगळ्यांना सांगत गेला.

नव्वदच्या दशकात अनेक परदेशी ब्रँडनी भारतात एन्ट्री केली. पण एकेकाळी दिवसाला ५ किलो वेफर्स बनवणारा हा पुणेरी वेफर्सचा ब्रँड त्यांच्या नाकावर टिच्चून सिंगापूर आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये वेफर्स निर्यात करतो.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.