भारताकडून खेळायची संधी मिळाली तेव्हा उधारीवर क्रिकेटचं किट आणावं लागलं होतं….

जगातल्या सगळ्यात बेस्ट विकेटकिपरमध्ये टॉपला नाव असतं ते महेंद्रसिंग धोनीचं. भारताकडून खेळताना त्याने अनेक रेकॉर्ड आणि विश्वविजेतेपद भारताला मिळवून दिलं. धोनीच्या अगोदर विकेटकिपर म्हणून भारताकडे सय्यद किरमाणी, किरण मोरे, फारुख इंजिनिअर अशी दिग्गज फळी होती. पण याही लोकांच्या अगोदर एक असा विकेट किपर होता ज्याने भारतीय संघात आपल्या नावाचा डंका वाजवला होता.

बुधी कुंद्रन

१९६० ते १९६७ पर्यंत बुधी कुंद्रन हे भारताचे विकेटकिपर म्हणून खेळत होते. त्यांचा क्रिकेटचा प्रवास इतका रंजक आहे कि एखाद्या सिनेमाच्या स्टोरीला त्यांचं आयुष्य जोडलं जाईल.

वडिलांचे कपडे घालून खेळायला गेलेले बुधी कुंद्रन.

घरची परिस्थिती हि हलाखीची असल्याने साहजिकच बुधी कुंद्रन यांच्या वडिलांची इच्छा होती कि मुलाने शिक्षणाकडे लक्ष द्यावं. त्यांना क्रिकेट हा सगळ्यात थुकराट खेळ वाटायचा. त्यामुळे ते बुधी कुंद्रन यांना खेळायला जाऊ देत नसे.

पण बुधी कुंद्रन उत्तम क्रिकेट खेळायचे. ज्यावेळी त्यांचं सिलेक्शन शाळेच्या संघात झालं तेव्हा बुधी कुंद्रन यांच्याकडे खेळायचा ड्रेस नव्हता. त्यावेळी त्यांच्या आईने बुधिच्या वडिलांचा ड्रेस फाडून बुधिच्या मापाचा शिवला आणि खेळायला पाठवलं. त्या सामन्यात शाळेच्या सामन्यात बुधीने २१९ धावांची जबरी खेळी केली. पुढच्या दिवशी पेपरमध्ये बुधीचा फोटो छापून आला होता. बुधिच्या वडिलांनी जेव्हा तो फोटो पाहिला तेव्हा त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला.

स्थानिक क्रिकेट न खेळताच भारतीय संघात जागा मिळाली होती.

सुरवातीच्या काळात बुधी मुंबईमध्येच क्रिकेट खेळले तेव्हा मुंबई संघाचे रणजी स्पर्धेत विकेटकिपर बॅट्समन होते नरेंद्र ताम्हाणे. नरेंद्र ताम्हाणे हे त्यावेळी भारताकडून खेळत होते. त्यावेळी रेल्वेच्या ट्रायल्स सुरु होत्या. लाला अमरनाथ मेंटॉर होते. त्यांनी रेल्वेजच्या ट्रायलमध्ये बुधी कुंद्रनचा खेळ बघितला आणि त्यांना थेट भारतीय संघात निवडलं.

आता बुधी कुंद्रनची निवड झाली मात्र त्यांच्याकडे क्रिकेट किट वैगरे काहीच नव्हतं. ना ग्लव्हज होते ना पॅड. त्यावेळी नरेंद्र ताम्हाणे यांनी मोठ्या मनाने आपली क्रिकेट किट बुधी कुंद्रन यांना देऊ केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये बुधीचा डेब्यू झाला तो मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमवर.

त्यावेळी अशी पद्धत होती कि स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना इंडियन टीमसोबत हॉटेलमध्ये थांबू दिलं जात नव्हतं. त्यामुळे बुधी घरी गेले पण भारताकडून खेळायला मिळणार या आनंदाने म्हणा किंवा काळजीने म्हणा त्यांना झोप लागत नव्हती. त्यामुळे ते चादर घेऊन मुंबईच्या विक्टोरिया पार्कमध्ये जाऊन झोपले. तिथं रात्रभर त्यांना डासांमुळे झोप लागली नाही. 

दुसऱ्या दिवशी मॅचसाठी ते तयार झाले. तब्बल १५० ओव्हर ते विकेटकिपिंग करत होते. कसोटी सामन्याच्या ५ हि दिवस ते पार्कमध्येच झोपत होते. पुढे त्यांचं प्रमोशन होऊन ते कधी ३ नंबर तर कधी ओपनींग करू लागले.

किट बॅग नसल्याने ते नरेंद्र ताम्हाणे यांचे ग्लव्हज, एका शिक्षकाने दिलेली टोपी, पॅड आणि बॅट त्यांच्या क्रिकेट क्लबने दिली होती.

ओपनिंगला ज्यावेळी बुधी येऊ लागले तेव्हा तो काळ असा होता कि जेव्हा ओपनिंगची अडचण यायची तेव्हा कॅप्टन थेट विकेटकिपरला बॅटिंगला पाठवायचा. त्यांनी मद्रासमधल्या एका सामन्यात त्यांनी १२ चौकारांसहित ७१ धावांची खेळी केली.

बुधी कुंद्रन यांनी एक रेकॉर्ड केला होता जो तुटायला ५० वर्षांचा काळ लागला होता. ते पहिले असे खेळाडू होते त्यांनी अगोदर टेस्ट मॅच खेळली आणि मग रणजी सामना. रणजीमध्ये द्विशतक झळकावणारे ते पहिलेच खेळाडू होते.

विकेटकिपर हा आक्रमक असण्याचा ट्रेंड त्यांनी सुरु केला. १९२ धावांची खेळी त्यांनी इंग्लंडविरुद्ध केली होती भारताकडून विकेटकिपरने केलेली हि सर्वोच्च खेळी होती. या सामन्यात त्यांनी ३१ चौकार मारले होते. हा उच्चस्कोरचा रेकॉर्ड मोडीत निघायला ५० वर्ष लागली आणि तो रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीने चेन्नईमध्ये २२४ धावा करून हा रेकॉर्ड मोडला.

पुढे त्यांनी जबरदस्त खेळ्या केल्या. त्यामुळे ते सतत चर्चेत राहिले. पुढे बोर्डासोबत वाद झाल्याने त्यांना परत संघात जागा मिळाली नाही. पुढे ते स्कॉटलँड संघाकडून वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत खेळत राहिले.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.