गडकरींचं म्हणणं खरंय, देशाची ५ ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था बनवणे महाराष्ट्राशिवाय अशक्य, कारण

आपला महाराष्ट्र म्हणजे देशाच्या विकासाचं इंजिन म्हणलं जातं..काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिलाय. महाराष्ट्र जगला तर देश जगेल असं म्हणतात. यात अतिशियोक्ती अशी काहीच नाही तर सत्य आहे.

अगदी आजच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणालेत, “भारताला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही”.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प ते सिध्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी, देशाच्या अर्थव्यवस्थेतला महाराष्ट्राची खूप महत्वाची भूमिका असल्याचं म्हंटलं आहे.
सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राची कामगिरी ही कायमच उत्कृष्ट राहिली असून त्या कामगिरीची मदत महाराष्ट्रात आगामी काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचं गडकरींचं म्हणणं आहे.

तर गडकरी म्हणाले तसं “देशाची ५ ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था बनवणे महाराष्ट्राशिवाय शक्य नाही”. गडकरींचं हे म्हणणं खरं आहे का ? तर हो. आता प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र कसा अव्वल आहे, हे पाहायला गेलं तर खूप जास्त व्हास्ट होणार.
मग थोडक्यात हा विषय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्राचं अर्थकारण बघायला लागेल..

कोणताही देश किंवा कोणतंही राज्य इतरांच्या तुलनेत कसं मजबूत आहे, कसं शक्तिशाली आहे हे त्यांच्या आर्थिक स्थितीवरून ठरवलं जात असतं. जर आर्थिक स्थिती कडक तर तो देश, राज्य देखील कडक.

म्हणूनच महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेत कसा महत्वाचा आहे ?

सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राने देशाला आर्थिक राजधानी दिलीये. ती म्हणजे ‘आपली मुंबई’. मुंबईत प्रमुख कॉर्पोरेट आणि वित्तीय संस्थांचे मुख्यालय आहेत. तर महाराष्ट्र हे देशातील ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग आणि बीएफएसआय हब म्हणून देखील ओळखलं जातं.
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अंदाजे ९.४% भाग व्यापणारं भारतातील महाराष्ट्र हे तिसरे मोठं राज्य आहे. तर महाराष्ट्र हे देशातील दुसरं सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे. जवळपास १२.५७ कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे.
महाराष्ट्र भारताला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू मिळवून देतो. हे आपण ५ मुद्यांतून बघूया…

१) GST

भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसडीपी आहे. जी.एस.डी.पी. म्हणजे ग्रोस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शन. ही प्रत्येक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामधील उद्योगांद्वारे जोडलेल्या सर्व मूल्यांची बेरीज असते आणि राष्ट्रीय उत्पादनाचा त्याचा वाटा असतो.
नुकतंच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशाच्या जीएसटीमध्ये एकट्या महाराष्ट्राचा १५% वाटा आहे.
जीडीपीनुसार मुंबई हे जगातील १७ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे दाखवून देतं की, अख्या भारतात महाराष्ट्राचा GDP सगळ्यात जास्त मजबूत आहे.

२) टॅक्स

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा ३८.५ टक्के इतका आहे. प्रत्यक्ष करांमध्ये कॉर्पोरेट टॅक्स, पर्सनल इन्कम टॅक्स आणि गिफ्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स आणि सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स सारख्या इतर करांचा समावेश होतो.
देशातील अनेक आघाडीच्या कंपन्यांची मुख्यालये इथे असल्याने प्रत्यक्ष करवसुलीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रस्थानी आहे. तर काही सर्वोच्च वैयक्तिक करदाते (highest individual taxpayers ) ज्यात अंबानी, टाटा सारखे उदयोजक आणि बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटूंचाही समावेश आहे, ते देखील इथेच राहतात.

३) FDI

थेट परकीय गुंतवणुकीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. देशाच्या उत्पन्नात वाढ होते. कंपन्या, गुंतवणूकदार यांच्यासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण होतं. ज्यामुळे अधिक रोजगार आणि उच्च वेतनाच्या संधी प्राप्त होतात. ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
अशा या महत्वाच्या FDI मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ९,५९,७४६ कोटी रुपये होता. जो देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या २८.२ टक्के होता, असं आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

४) एक्स्पोर्ट

देशातून किती निर्यात केली जाते यावरून देशाची आर्थिक स्थिती समजणं जास्त सोपं असतं. कारण देशात कोणत्याही गोष्टीचा तेवढा साठा असतो तेव्हाच तो देश निर्यात करू शकतो. राज्यांचा साठा एकत्र करूनच देशातून निर्यात केली जाते.
२०२० पर्यंत भारतातील निर्यातीसाठी महाराष्ट्र हे अग्रगण्य राज्य होतं. तर २०२१ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य बनलं, जे भारताच्या एकूण निर्यातीच्या २२.७% वाटा उचलत.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राचे एकूण निर्यात मूल्य ५८.४० अब्ज डॉलर्स आहे.
महाराष्ट्रातील अव्वल निर्यात उत्पादनांमध्ये मोती, मौल्यवान खडे, ड्रग फॉर्म्युलेशन्स / बायोलॉजिकल्स, सोने व इतर मौल्यवान धातू, दागिने, मोटार वाहने आणि कार तसंच लोखंड आणि पोलाद यांचा समावेश आहे.
तर अमेरिका, हाँगकाँग, युएई, बेल्जियम, यूके, चीन, सिंगापूर, मेक्सिको आणि जर्मनी हे महाराष्ट्र ज्या देशांमध्ये निर्यात करतो ते अव्वल देश आहेत.

५) औद्योगिक उत्पादन ( industrial output )

महाराष्ट्रात औद्योगिक समूह, विशेषत: ऑटोमोबाईल, आयटी आणि आयटीईएस, रसायने, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया समूह मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अनेक आकर्षक संधी उपलब्ध आहेत.

भारतातील औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचे योगदान १५% आहे.

२०१९-२० नुसार भारतातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्नांपैकी महाराष्ट्र एक आहे, जे $ २,९०० वाटा उचलत.
तर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालये आणि आयटीआय असलेल्या अग्रगण्य राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक रोजगारक्षम प्रतिभा असलेल्या विद्यार्थ्यांचा वाटा ६८% आहे.
अशाप्रकारे हे सगळे मुद्दे महाराष्ट्र भारताच्या आर्थिक परिस्थितीला किती जास्त हातभार लावतो, हे दाखवतात. आणि सुरुवातील सांगितलंय ना तुम्हाला… जिकता आर्थिक वाटा एखादं राज्य उचलत तितकं ते देशात सक्षम असतं.
ओव्हरऑल भारतात महाराष्ट्र इतर सगळ्या राज्यांच्या तुलनेत वरतीच आहे. म्हणूनच गडकरींचं. “देशाची ५ ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था बनवणे महाराष्ट्राशिवाय अशक्य ” हे विधान अगदी तंतोतंत पटतं.
हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.