देशात कॉंग्रेसचा पराभव जसा सवयीचा झालाय तसच कोल्हापुरात बंटींचा विजय सवयीचा झालाय

देशातल्या कुठल्याही राज्यात कुठलीपण निवडणूक असो. या निवडणूकीनंतर बातमी ठरलेली असते. ती म्हणजे कॉंग्रेसचा दारुण पराभव. २०१४ नंतर देशातल्या प्रत्येक निवडणूकीत हे चित्र ठरलेल असतय. मोदींच्या लाटेतून कॉंग्रेसला अजून सावरता आलेलं नाही… 

दूसरीकडे आहेत कॉंग्रेसचेच बंटी पाटील.

त्यांना देखील मोदी लाटेचा फटका बसला. पण रबरी चेंडू जसा उसळी घेतो तशी उसळी बंटी पाटलांनी घेतली. झालेल्या पराभवातून बंटी पाटील फक्त सावरलेच नाहीत तर समोर येणाऱ्या प्रत्येकाला आडवं करत सुसाट सुटलेत.

२०१९ पासून एकूण ९ निवडणूका कोल्हापूरात झाल्या. त्यातील कोल्हापूर लोकसभेची एक, विधानसभेच्या ४ मतदारसंघाच्या, विधानपरिषदेची शिक्षक मतदारसंघाची एक, कोल्हापूर विधानपरिषेदेची स्वत:ची बिनविरोध, गोकुळची आणि कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक अशा एकूण ९ निवडणूका बंटी पाटलांच्या नेतृत्वात झाल्या आणि त्या सर्व जागा बंटी पाटलांनी जिंकल्या…

कोल्हापूरात निवडणूक आणि बंटी पाटील म्हणजे विजय होणार हे आत्ता सवयीचं झालय. यासाठी बंटी पाटलांनी कोणत्या निवडणूका कशा खिश्यात घातल्या हे बघणं गरजेचं आहे.. 

त्यासाठी पहिला चर्चा पराभवाची.. 

२०१४ ची लोकसभा. या निवडणूकीत मोदींच वारं आलेलं. मुन्ना महाडिक यांना मदत करायचं बंटीनी घोषीत केलं. मनोमिलन झालं आणि मुन्ना महाडिक मोदी लाटेत राष्ट्रवादीकडून खासदार झाले. लगेच सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणूका लागल्या. या निवडणूकीत आत्ता महाडकांना पैरा फेडायचा होता, पण दगा झाला. अमल महाडिक यांना विधानसभेचे उमेदवार म्हणून भाजपनं तिकीट दिलं आणि अमल महाडिक आमदार झाले.

२०१४ च्या विधानसभेला बंटी पाटलांचा पराभव झाला. आत्ता बंटी पाटील संपले अशा चर्चा कोल्हापूरात सुरू झाल्या… 

पण बंटी पाटील संपणाऱ्यातले नव्हते. सकाळी अंत्ययात्रेत, दुपारी लग्नात, संध्याकाळी बारश्यात तर रात्री वाढदिवसाच्या पार्टीत.. बंटी पाटलांनी रान घातीलाा आणायला सुरवात केली. जे देशात कॉंग्रेसला करायला पाहीजे होतं ते बंटी पाटलांनी कोल्हापूरात करायला सुरवात केली. मांजराला कोपऱ्यात दाबलं की मांजर उसळी मारतं. बंटींच्या बाबतीत तेच झालं… 

मैदान तयार केलं आणि २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका लागल्या.

लोकसभेच्या निवडणूका लागल्या आणि बंटी पाटलांनी घोषणा दिली, “आमचं ठरलय”. महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग राज्यात कोल्हापूरात करण्यात आला. बंटी पाटलांनी उघडपणे सेनेच्या संजय मंडलिक यांचा प्रचार केला. संपुर्ण कॉंग्रेसची यंत्रणा सेनेच्या उमेदवाराच्या मागे लावली आणि राष्ट्रवादीच्या मुन्ना महाडिक यांचा पराभव झाला. 

त्यानंतर लागल्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूका.

या निवडणूकीत बंटी पाटील कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष होते. बंटीच्या नेतृत्वातचं कॉंग्रेसनं कोल्हापूर जिल्ह्यात तिकीट दिलं.  कोल्हापूर उत्तर मधून चंद्रकांत जाधव, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतूराज पाटील, हातकणंगले मधून राजू आवळे, करवीर मधून पीएन पाटील अशा चार उमेदवारांना निवडून आणलं. याचं श्रेय बंटी पाटलांना दिलं गेलं.  

त्यानंतर २०२० साली विधानपरिषदेच्या निवडणूका लागल्या.

यात बंटी पाटलांनी पुणे शिक्षक मधून “जयंत आसगावकर” यांना तिकीट मागून घेतलं. त्यांच्या विरोधात चांगली फिल्डिंग लावण्यात आली होती पण बंटींनी हा प्रचार पर्सनली घेतला आणि जयंत आसगावकर यांनी निवडून आणलं… 

त्यानंतरचा डाव होता खुद्द बंटी पाटलांचा.

२०२१ ला विधानपरिषदेच्या निवडणूका लागल्या. इथं बंटी पाटलांच्या विरोधात अमल महाडिक होते. वन ऑन वन सामना होणार होता पण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि बंटी पाटलांनी एक वर्तुळ पुर्ण केलं. 

त्यानंतर बंटी पाटलांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली ती गोकुळ दुधसंघाची.

गोकुळ मधून महाडिकांची मक्तेदारी मोडून काढणं अवघड होतं. पण बंटींनी ती पण जादू केली. तब्बल २५ वर्षानंतर इथे सत्तांतर झालं. १७ -४ च्या फरकाने ही निवडणूक बंटी पाटलांनी मारली आणि गोकुळ जिंकून घेतलं.. 

त्यानंतर आज झालेली कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक.

सुरवातीच्या काळात शिवसेनेचं बंड, कुठतरी पुरूष उमेदवार असल्याने मिळणारा सपोर्ट हे सगळं मोडीत काढून बंटी पाटलांनी ही निवडणूक देखील प्रतिष्ठेची केली. आणि या निवडणूकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय खेचून आणला. 

२०१९ पासून एकूण ९ निवडणूका कोल्हापूरात झाल्या.  या नऊही निवडणूकांमध्ये बंटी पाटलांच्या नेतृत्वात विजय मिळाला.. थोडक्यात देशभरात कॉंग्रेसचा पराभव होत असताना कोल्हापूरात मात्र बंटी पाटील एकसलग मैदान मारत सुटलेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.