खेळणी नाही तर खऱ्या बंदुका घेऊन हिंडणारी पोरं आजही ‘या’ देशात शेकडो जणांना ठार करतायत…
इंग्रजी भाषेत एक भारी शब्द आहे -चाइल्ड लाइक. जेव्हा एखाद्या वयस्क व्यक्तीला ‘चाइल्ड लाइक’ असं म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ होतो की, त्या व्यक्तीची स्तुती होत आहे. त्याला लहान मुलासारखं निरागस आणि सरळमार्गी म्हटलं जात आहे. या लहान मुलांच्या निरागसतेबाबत रवींद्रनाथ टागोर एकदा म्हणाले होते कि,
प्रत्येक मूल जन्माला येताना एक संदेश घेऊन येतो. तो संदेश असा आहे की, देव अद्याप ही मनुष्य जातीपासून निराश झालेला नाही. त्याला अजूनही मानवांकडून आशा आहे.
पण हि निरागस लहान मुलं एखादं मोठ्ठ हत्याकांड करू शकतात यावर किती जणांचा विश्वास बसेल? सहज विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच एक बुरकिना फासो या आफ्रिकन देशात भयानक नरसंहार झाला होता. आता त्यासंदर्भात अशी बातमी आली आहे की, हे हत्याकांड घडवणारे मास्टर माईंड मुले आहेत.
पण हे हल्लेखोर मास्टर माईंड बघण्याआधी या बुरकिना फासोचा इतिहास बघावा लागेल.
ही सुमारे ९०० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. असे म्हटले जाते की, त्यावेळी आफ्रिकन राज्याची खूप सुंदर, खूप गोड अशी एक राजकुमारी होती – येन्गा. आपल्या वडिलांच्या डोळ्याचा तारा. तिला नटून थटून राहणं आवडायचं नाही. तिला तिचे वडील आणि तीन भाऊ यांच्यासारखे योद्धा व्हायचे होते. घोडेस्वारी शिकण्याची इच्छा होती. पण तिच्या समाजात मुलींना हे सर्व करण्यास मनाई होती. येन्गाने वडिलांना मोठ्या विनवण्याने करून त्यांची मनधरणी केली. लवकरच ती सर्वात निपुण योद्धांपैकी मोजली गेली. तिच्या युद्धकौशल्यामुळे येन्गाच्या वडिलांनी बर्याच युद्धांत विजय मिळविला.
येन्गा एक अतुलनीय योद्धा होता. पण तिलाही प्रेम करायचं होतं. वडिलांनी ही तिला आपल्यापासून दूर करायचं नव्हतं म्हणून त्यांनी येन्गाला कैद केले. एका रात्री बंडखोर येन्गा घोड्यावरुन जंगलात पळून गेली. तेथे तिची भेट शिकारी रायलशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना एक मुलगा झाला – ओजरेगू. त्यांच्या भाषेत ओजरेगू म्हणजे घोडा.
आपल्या घोड्यावर बसून येन्गा वडिलांच्या बंदिवासातून सुटली होती. त्या घोड्याच्या सन्मानार्थ तिने आपल्या मुलाचे नाव ठेवले होते. ओजरेगू पण आपल्या आईसारखा कुशल योद्धा झाला. त्याने साम्राज्याचा पाया घातला. त्याच्या वंशजांच्या कुळांना – मोसे असे म्हणतात.
हे मोसे ओजरेगूच्या आई येन्गाला त्यांच्या कबिल्याची आई मानतात.
ही जमात आता कुठे राहते ?
पश्चिम आफ्रिकेमध्ये एक देश आहे – बुरकिना फासो. स्थानिक भाषेत याचा अर्थ प्रामाणिक लोकांचा देश आहे. जगाच्या नकाशावर त्याचे स्थान दिसेल. त्याच्या उत्तर आणि पश्चिमेस माली हा देश आहे. पूर्वेला नायजेरिया आणि बेनिन आहेत. दक्षिणेस घाना आहे. आणि आग्नेय दिशेने आयव्हरी कोस्ट आहे. बुरकिना फासोची राजधानी वागाडुगु आहे.
या देशाची लोकसंख्या सुमारे दोन कोटी आहे. यापैकी सुमारे ४५% लोकसंख्या मोसे समुदायाची आहे. उर्वरित लोकसंख्येत गुरुशी, सेनुफो, लोबी, बोबो आणि फुलनी या मुख्य पाच जमातींचा समावेश आहे.
देशाच्या राष्ट्रीय चिन्हामध्ये आपण बहुतेक मोसे समुदायाचा प्रभाव जास्त आहे. त्यांच्या राष्ट्रीय चिन्हावर दोन पांढरे घोडे आहेत. हे घोडे मोसे समुदायाच्या मातृशक्तीशी संबंधित आहेत. हे त्या धाडसी येन्गाचे प्रतीक आहे. जिच्या मुक्त मनाने वडील, समाज आणि परंपरेशी संबंधित कोणतेही अवडंबर कधीच स्वीकारले नाही.
आता थोडक्यात थोडक्यात बुरकिना फासोचा इतिहास जाणून घेऊया.
साम्राज्यवादाच्या आधी मोसे समुदाय इथे राज्यकर्ता वर्ग होता. हा देश खरं तर अनेक लहान आदिवासी कबिल्यांचा संयुक्त भूभाग होता. हे राज्य सर्वात मजबूत प्राचीन आफ्रिकन साम्राज्यांमध्ये गणले जात होते.
१८९६ मध्ये इथं फ्रेंच आले. त्याने बुरकिना फासो राज्याला गुलाम बनवले. काही वर्ष ते सेनेगल-नायजर फ्रेंच कॉलनीचा एक भाग होता. त्यानंतर १९१९ मध्ये फ्रान्सने त्यास वेगळ्या वसाहतीचा दर्जा दिला. फ्रान्सने त्याचे नाव ठेवले – अप्पर वोल्टा. हे नाव वोल्टा नदीपासून घेण्यात आले आहे. ही नदी बुरकिना फासोच्या दक्षिण-पश्चिमेकडील राजधानी वागाडुगुमधून वाहते आणि घानापर्यंत पोहोचते. बुरकिना फासो नदीच्या वरच्या बाजूला वसलेले असल्यामुळे फ्रान्सने या देशाचे नाव ‘अप्पर वोल्टा’ ठेवले.
दुसर्या महायुद्धानंतर हळू हळू वसाहतवादाचे दिवस गेले. १९७५ मध्ये फ्रान्सने अप्पर वोल्टाला स्वायत्त प्रजासत्ताकचा दर्जा दिला. त्याला स्वराज्याचा अधिकार होता, परंतु तो अद्याप पूर्णपणे स्वतंत्र नव्हता. तीन वर्षांनंतर १९६० मध्ये त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. त्याचे पहिले अध्यक्ष मॉरिस यामेओगो होते.
अप्पर वोल्टा आता मुक्त तर झाला होता, पण आफ्रिकेच्या इतर देशांप्रमाणेच त्याची ही सुरुवात चांगली झाली नाही. या अस्थिरतेचे मुख्य कारण म्हणजे अर्थव्यवस्था. देशाची आर्थिक स्थिती अस्ताव्यस्त होती. नवीन सरकारकडून अशी अपेक्षा होती की ते अधिक चांगले दिवस आणतील. पण यामेओगो सरकार भ्रष्टाचारात सामील होते.
गरीब जनता सरकारवर रागावली होती. या संतापाचा फायदा घेत जनरल लामिझाना यांच्या नेतृत्वात सैन्याने तख्तपालट केले. परंतु लामिझाना देखील चांगला पर्याय ठरु शकले नाहीत. भांडण करुन खुर्ची जवळ ठेवण्यावर त्याने भर दिला. त्याला सत्तेतून काढून टाकण्यासाठी १९८० मध्ये आणखीन तमाशा झाला. यानंतर तीन वर्षांत आणखी दोन वेळा तख्तपालट झाले.
यानंतर कॅप्टन थॉमस संकारा १९८३ मध्ये देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. बरेच लोक त्यांना आफ्रिकेचा ‘चे गुवेरा’ म्हणून संबोधतात. संकारा क्रांतिकारक होते. त्यांच्या सत्तेत येण्याच्या वेळी अप्पर वोल्टाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात गरीब देशांमध्ये गणली जात होती. संकरा येताच त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे निराकरण करण्यास सुरवात केली.
यासाठी त्यांनी शेतीला प्रोत्साहन दिले. जेणेकरुन देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण होईल. याचा परिणाम, देशाचे उत्पादन वाढले. देशात बनवलेल्या उत्पादनांच्या वापरावर भर देण्यात आला. आरोग्य आणि शिक्षणही निश्चित करण्याचा प्रयत्न केला. महिलांची स्थिती सुधारण्यासंबंधित धोरणे बनविली.
संकारा १९८४ मध्ये आपल्या देशाचे नाव बदलून ‘बुरकिना फासो’ असे ठेवले. ते म्हणाले,
अप्पर वोल्टा हे साम्राज्यवादी फ्रान्सने दिलेले नाव आहे. साम्राज्यवादाने आफ्रिकेला झालेल्या नुकसानीबद्दल संकारा खूप बोलले. आंतरराष्ट्रीय मंचांवर ते साम्राज्यवादी देशांना बरेच सुनावत असतं. या अनुक्रमात, त्यांनी जाहीर केले की बुर्किना फासो जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज फेडणार नाही.
ते म्हणाले,
ही कर्जे साम्राज्यवादाशी संबंधित आहेत. ज्यांनी आम्हाला कर्ज दिले त्यांनीच आम्हाला गुलाम केले. त्यांनीच आमच्या अर्थव्यवस्थेचा ताबा घेतला. त्यांनी त्यांच्या सावकार भाऊ आणि पुतण्यांकडून आमच्या नावावरच पैसे घेतले आणि ते कर्ज आफ्रिकेच्या कपाळावर मारले. त्या कर्जाशी आमचा काही संबंध नाही. म्हणूनच आम्ही ते कर्ज फेडणार नाही.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर संकारा सत्तेत असते तर बुरकिना फासोने अधिक चांगली प्रगती केली असती. पण तसे झाले नाही. १ ऑक्टोबर, १९८७ रोजी एकदा ब्लेज कुपाओरे या त्यांच्या जवळच्या मित्राने संकाराची हत्या करून सत्ता काबीज केली. या हत्येमागे फ्रान्सवरही बोट दाखवले गेले.
संकाराची हत्या केल्यानंतर कुपाओरे २७ वर्षे सत्तेत राहिले. या दीर्घ हुकूमशाही काळात बुरकिना फासोची प्रकृती अधिकच बिकट झाली. अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. लोकांना पोट भरणे अवघड होते. देशाच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे सोन्याच्या खाणी. त्याही बंद झाल्या होते. लोक महागाई, बेरोजगारी, उपासमारीच्या विरोधात दररोज रस्त्यावर उतरु लागले. परिस्थिती सुधारण्याऐवजी कुपाओरे यांनी आंदोलकांवर गोळीबार केला.
कर्मचार्यांचे पगार देण्यास देखील सरकारकडे पैसे नव्हते. वेतन न दिल्याने सैनिक आणि राष्ट्रपतींच्या संरक्षकांनी बंड केल्याचे वृत्त होते. देशात अशांतता निर्माण झाली की पोलिस आणि सैन्य यांच्यातच हिंसक चकमक सुरु झाली. दोघांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला.
या व्यापक नैराश्यात जुलै २०१३ मध्ये झालेल्या एका घटनेचा देशावर मोठा परिणाम झाला. अशी बातमी आली की कुपाओरे हे स्वतःची मुदत वाढवण्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करणार आहेत. हे ऐकून जणू लोकांचा संयमच संपला. देशातील अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि काही महिन्यांपर्यंत निदर्शने चालू राहिली. जनतेच्या या मोठ्या बंडखोरीमुळे कुपाओरे यांना ऑक्टोबर २०१४ मध्ये पदाचा त्याग करावा लागला.
या बंडखोरीत जनता आपला नायक म्हणून कोणाला मानत होती ? तर जवळपास तीन दशकांपूर्वी मारले गेलेले माजी राष्ट्रपती संकारा यांना.
येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये जिंकून रॉक मार्क क्रिस्टियन काबोरे अध्यक्ष झाले. यापूर्वी ते देशाचे पंतप्रधानही होते. नोव्हेंबर २०२० मध्ये या सरकारचा कार्यकाळ संपला. या महिन्यात पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. यातही काबोरे यांना विजय मिळाला.
आता प्रश्न पडतो की आज हा इतिहास सांगायची गरज काय आहे ?
याचे कारण सुमारे ३० दिवसापूर्वी घडलेल्या जुन्या घटनेशी संबंधित आहे. बुरकिना फासो मध्ये यागा नावाचा प्रांत आहे. त्यात सोलाहान नावाचे गाव आहे. ही जागा नायजर आणि बुरकिना फासोच्या सीमेजवळ येते. ४ जून २०२१ च्या सायंकाळी उशिरा अनेक सशस्त्र हल्लेखोरांनी सोलाहान गावात हल्ला केला.
त्यांनी नि:शस्त्र ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार मारले. अनेक घरांना आग लावण्यात आली. रात्रीच्या या हल्ल्यात १३८ हून अधिक लोक ठार झाले. मृता व्यतिरिक्त ५० लोक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर सरकारने ७२ तास राष्ट्रीय शोक जाहीर केला.
आता या हत्येसंदर्भात एक भयानक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र आणि बुरकिना फासो सरकारच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर मुले होती. ही मुले १२ ते १४ वर्षे वयोगटातील होती. कोणत्या हिंसक संघटनेने या मुलांकरवी हे कृत्य करवून घेतले, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.
ही मुलं कोण होती?
हे चाइल्ड सोल्जर्स होते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले व मुली ज्यांना सशस्त्र गटाने भरती केले आहे. त्यांना आपल्या सैन्यात समाविष्ट केले आहे. दहशतवादी संघटना आणि लष्करी संघटना त्यांचा हेर आणि मानवी कवच म्हणून वापर करतात. त्यांच्या शरीरावर बॉम्ब बांधून आत्मघातकी हल्ले घडवतात.
जगात सध्या तीन लाखाहून अधिक चाइल्ड सोल्जर्स आहेत. यातील सुमारे ४० टक्के मुली आहेत. या मुली बहुधा दोन कारणांसाठी वापरल्या जातात. एकतर त्यांना लैंगिक गुलाम केले गेले जाते किंवा आत्मघातकी बॉम्बर. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, सोमालिया, सिरिया, येमेन, नायजर, नायजेरिया यासह सुमारे २० देश आहेत जेथे हे चाइल्ड सोल्जर्स काम करत आहेत.
याचे एक मोठे कारण म्हणजे अपहरण. दहशतवादी संघटना आणि लष्करी संघटना लहानवयातच त्यांचे अपहरण करतात. सहा ते सात वर्षांच्या मुलांच्या हातात शस्त्र देताना मुलांसमोर अशी एक अट ठेवतात की जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला खुनी बनले पाहिजे. गरीबी आणि वंचितपणामुळे बरीच मुले या गटांमध्ये सामील होतात. काही लोकांचे पालक त्यांचे पैसे घेऊन त्यांना सशस्त्र गटाला विकतात.
आता आलेल्या कोरोनाच्या महामारीने देखील हजारो मुलांना चाइल्ड सोल्जर्स बनवले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बर्याच देशांमध्ये लॉकडाऊन होता. अनेक महिने शाळा बंद राहिल्या. लॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळली.
गरीब देशांची अवस्था अधिकच वाईट होती. जेव्हा हे पोट भरणे कठिण असते तेव्हा शाळा ऐषोआरामीचे जिणे असते. याकाळात बरीच मुले कामगार झाली. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर लाखो मुले शाळापासून दूर होती. अशी अनेक मुले सशस्त्र गटांच्या तावडीत अडकून चाइल्ड सोल्जर्स बनली.
यूएनच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी फक्त मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत तीन हजाराहून अधिक मुलांना चाइल्ड सोल्जर्स बनविण्यात आले आहे.
आता बुरकिना फासोकडे परत येऊ. सोलाहन हत्याकांडात मुलांच्या सहभागाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. चाइल्ड सोल्जर्सबद्दल त्यांना प्रथमच माहित झाले असे नाही. पण त्यांनी केलेला इतका मोठा नरसंहार धक्कादायक होते.
इथला हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला होता का ? तर नाही, गेली सहा वर्षे हा देश दहशतवादी हिंसाचाराच्या चक्रात आहे. इस्लामिक स्टेट आणि अल कायदासारख्या बर्याच दहशतवादी संघटना येथे कार्यरत आहेत. त्यांनी राजधानी वागाडुगुलाही अनेक वेळा लक्ष्य केले आहे.
उदाहरणार्थ, जानेवारी २०१६ मध्ये राजधानीच्या कॅफेवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये २९ लोक ठार झाले. डिसेंबर २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी लष्करी तळामध्ये घुसून ११ सैनिकांना ठार केले. ऑगस्ट २०१७ मध्ये राजधानीतील एका रेस्टॉरंटला पुन्हा लक्ष्य केले गेले. यामध्ये १८ लोक ठार झाले. मार्च २०१८ मध्ये दहशतवाद्यांनी फ्रेंच दूतावासाला लक्ष्य केले. या घटनेत १६ जणांनी आपला जीव गमावला. परिस्थिती इतकी वाईट आहे की नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत देशाच्या उत्तर भागातील बहुतांश भाग दहशतवाद्यांच्या भीतीमुळे मतदान करू शकला नाही.
दहशतवाद्यांकडून होणारा हिंसाचार हा नेहमीचाच झाला आहे. यामुळे, गेल्या दोन वर्षात सुमारे १५ लाख लोक बेघर झाले आहेत. शेजारच्या मालीमध्ये २०,००० हून अधिक लोक निर्वासित म्हणून राहत आहेत.
हिंसाचारामुळे देशात सुमारे अडीच हजार शाळांना टाळे लागले आहेत. या सर्वांमुळे बाधित झालेल्या मुलांची संख्या तीन लाखांपर्यंत आहे.
शेवटी एका चित्रपटाचा उल्लेख करता येईल. २००६ मध्ये ‘ब्लड डायमंड’ नावाचा एक चित्रपट आला होता. ही कहाणी फक्त एका हिऱ्याचीच नाही. तर, एका मच्छीमार आणि त्याच्या १२ वर्षाच्या मुलाची ही आहे. मच्छीमाराची अशी इच्छा असते की, त्याच्या मुलाने एक दिवस डॉक्टर बनावे. पण हे स्वप्न सत्यात उतरले नाही.
एके दिवशी सशस्त्र सैनिक शहरात प्रवेश करतात. संपूर्ण शहरात एकट्या मच्छीमारचे कुटुंब मरणातून वाचते. परंतु त्याचा मुलगा त्या वाईट बंडखोरांच्या हाती लागतो. कुठं त्याला डॉक्टर बनण्याची इच्छा होती आणि कुठं त्याच्या हातात बंदूक आली. तो खुनी बनला.
चाइल्ड सोल्जर्सवर असे बरेच इतर चित्रपट आले. यात बीस्ट्स ऑफ नो नेशन, वॉर विच, जॉनी मॅड डॉग हे चित्रपट अफलातून आहेत. वेळ मिळाला तर नक्की बघा…
हे ही वाच भिडू
- रवांडा रेडिओ, ज्याच्यामुळे नरसंहार सुरु झाला अन् आफ्रिकेतील एक अख्खी जमात संपवण्यात आली..
- BMW फेमस होण्यामागे त्यांचा काळा इतिहास आहे.
- एक साथीचा रोग युरोपियन देशांना आफ्रिका जिंकायला उपयोगी पडला