या कंडक्टर मामांनी तिकीट काढता काढता २०० जणांच्या सोयरिक जुळवल्यात

कसं मामा म्हणतील तसं.

लग्न लावून देणारे मार्केटमध्ये पोत्याने झालेत पण हक्काची माणसं राहिली नाहीत. सोयरिक बघताना घरातले म्हणतात पै-पाव्हण्यातलीच बघा, म्हणजे कसं बर पडेल.

या बर पडेल च्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाच कारण असतं ते म्हणजे लग्न टिकलं पाहीजे. नात्यातली सोयरिक असली तर घरादाराबद्दल अचूक माहिती असते.

सोयरिक जुळवताना सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागतो तो लग्न ठरवणाऱ्या मामावर.

हे मामा, काका म्हणजे निम्म्या गावाची लग्न लावणारी माणसं.

याच्यावर लोकांचा पुर्ण विश्वास असतो. त्यामुळे अगोदरच्या काळात लग्नात फसवाफसवी कमी व्हायच्या. कमी-जास्त काय असेल तरे उघडपणे सांगितलं जायचं. पण कालांतराने जागतिकरणाच्या रेट्यात काय झालं तर लग्न जुळवून देणाऱ्या वेबसाईट आल्या. लग्न जुळवण्यात धंदा आल्याने स्पर्धा वाढली. साहजिक लपवाछवी सुरू झाली आणि त्याची परिणीती घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यात झाली.

आत्ता आम्ही ज्या मामांची गोष्ट सांगतोय त्यांचा सक्सेस रेट सांगायचा झाला तर त्यांनी सोयरिक जमवल्यांमध्ये एकही स्थळ तुटलेलं नाही. घटस्फोटासारखी गोष्ट तर नाहीच पण देण्याघेण्यात देखील लग्न तुटत नाही. 

सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या कोरेगावचे बाळकृष्ण पाटील म्हणजे मामा हे पंचक्रोशीत सोयरिक जुळवणारे मामा म्हणून प्रसिद्ध आहेत.

मामा महामंडळात पेशाने कंडेक्टर आहेत. मोकळाढाकळा स्वभाव आणि खुलून बोलण्याच्या सवयीने महामंडळातील कर्मचाऱ्यांच्यात मामा फेमस आहेत. सांगलीची बस ज्या रस्त्याने गेली त्या रस्त्यांशी आणि तिथल्या लोकांशी मामांचा संबंध आला.

आणि याचमुळे मामांनी २०० च्या वरती सोयरिक जुळवल्या.

होतं अस की शिक्षणाच्या निमित्ताने कॉलेजची मुलं मुली शहरात बसने प्रवास करतात. याच प्रवासात पोरांचे, पोरींचे आतले बाहेरचे स्वभाव कळतात. मामा बोलायला जितके तरबेज आहेत तितकेच माणसं ओळखायला तरबेज आहेत. त्यामुळे पुढचा पोरगा आणि पोरगी कशी आहे ते चुटकीसरशी ओळखतात. यातूनच कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी हे मामांना पक्क माहित असतं.

स्थळाची चौकशी करण्याची वेळच येत नाही, मामांनी सांगितलं की हा मुलगा, ही मुलगी चांगली आहे तर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. याहून अधिक खोलात न जाता फक्त विश्वासावर नाती जोडली जातात.

लग्न जमवण्याचा छंद कधी लागला अस विचारलं तर मामा सांगतात, त्यांच स्वत:च लग्न जमवण्यापुर्वी त्यांनी ५ लग्ने जमवली होती. 

बर इथे मामांची सर्वात भारी गोष्ट अशी की परस्थिती नसणाऱ्यांना प्रसंगी स्वत:कडचे सोने नाणे देवून त्यांनी लग्न जुळवली आहेत.

पत्रिका, कुंडलीचं विचाराल तर ते थेट सांगतात. पोरा पोरीचं कर्तृत्व, स्वभाव पाहून लग्न करा. म्हणूनच नोकरीच्या ३३ वर्षाच्या काळात या माणसाने २०० संसार उभा केलेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.