एका बस कंडक्टरमुळे युती तुटली आणि सरकार कोसळलं…

परवा एक बातमी आली. पगार थकल्याने बस चालकाने पाच बस पेटवल्या. साहजिक बातमी न वाचता कमेंट करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

राज्यात एस्टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार, तोट्यात चालणारी बस, कमी पगाराचं गणित वगैरे वगैरे मुद्दे लक्षात घेवून लोकांनी हा बस चालक महामंडळाचा असल्याचा अंदाज बांधून कमेंट केल्या होत्या. 

पण या बसेस आणि बस चालक हा खाजगी होता.

बोरिवलीतील या घटनेत चालकाचं अस म्हणणं होतं की मालकांनी वेळेत पगार दिला नाही, पगार थकवला म्हणून बस पेटवून देण्यात आल्या. तर मालकांच अस म्हणणं आहे की गोव्यात याने यापूर्वी अपघात केला होता व तशी तक्रार देखील आहे. 

दोघांच काहीही म्हणणं असलं तरी लोकांना वाटलं या महामंडळाच्या बस असाव्यात. कारण महामंडळातील कर्मचाऱ्यांचा उद्रेक केव्हाही होवू शकतो. आत्ता महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या उद्रेक होवू शकतो का नाही? हे सांगता येत नसलं तर इतिहासातला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगण मात्र आमचं कर्तव्य आहे.. 

असाच किस्सा बिहारमध्ये झालेला.

बिहारचं राज्य सरकार एका बस कंडक्टरमुळे कोसळलेलं. आत्ता तुम्ही म्हणालं हा वेगळा मॅटर असणाराय. एकतर बस कंडक्टरचं काहीतर पॉलिटिकल कनेक्शन असणार आहे, नायतर पादऱ्याला पावट्याचं निमित्त टाईपमध्ये राडा झाला असणार आहे… 

पण भिडूनो, तस काय नव्हतं. 

१९७० च्या वर्षांची अखेर चालू होती. तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री होते दरोगा प्रसाद राय. राय हे कॉंग्रेस आर चे नेते होते. आत्ता हे दरोगा प्रसाद राय नेमके कोण सांगायचं तर लालू प्रसाद यादव हे बिहारच्या राजकारणात पाय रोवू शकले त्याच क्रेडिट दरोगा प्रसाद राय यांना दिलं जातं. लालूचा दूसरा पोरगा तेज प्रताप यादव याच लग्न ऐश्वर्या राय सोबत झालं. ही ऐश्वर्या राय म्हणजे दरोगा प्रसाद राय यांची नात.

तर असो. तेव्हा ते बिहारचे मुख्यमंत्री होते  पण पुर्ण बहुमतात हे सरकार नव्हतं. पाठिंब्याच्या कुबड्यांवरच हे चालू होतं. पण सगळं चांगल चालू होतं. त्यावेळी बिहारमध्ये एक छोटं कांड झालं. बिहारच्या परिवहन मंडळात बसचा कंडक्टर असणाऱ्या एका आदिवासी बस कंडक्टरला निलंबित करण्यात आलं. 

आत्ता हा कंडक्टर गेला थेट झारखंड पार्टीचे नेते बागुन सुब्म्रई यांच्या जवळ. बागु न सुम्ब्रई यांना झारखंडचे गांधी म्हणून ओळखलं जातं.  आत्ता बेसिक भुगोल माहित नसेल तर किंवा गोंधळ होत असेल तर थोडक्यात सांगतो झारखंड हे अलिकडं वेगळं राज्य झालं. तेव्हा बिहार व झारखंड एक राज्य होतं. ते बिहार म्हणूनच ओळखलं जायचं.

तर हा बस कंडक्टर थेट बागुन सुब्र्मई यांच्याजवळ गेला. या नेत्यांच्या पाठिंब्यावर सरकार टिकून होतं. त्यांनी आपला शब्द मुख्यमंत्र्यांकडे टाकला. 

मुख्यमंत्री म्हणाले बघुया.. 

पण आठ-दहा दिवस झाले काहीच बघितलं नाही. बागुन सुब्मई यांचे टोटल अकरा आमदार होते. तरिही मुख्यमंत्री त्यांची गोष्ट सिरीयस घेत नव्हते. मुद्दा तर फक्त कंडक्टरच्या निलंबनाचा होता. तरिही मुख्यमंत्री करतो बघतो म्हणत राहिले. 

झालं ११ आमदारांच्या नेत्याने सरकारचा पाठींबा मागे घेत असल्याचं सांगितलं. कारण काय तर बस कंडक्टर. 

मुख्यमंत्र्यांनी हे देखील लाईटली घेतलं. ११ आमदारांमुळे फरक पडतोय. पण हा पाठिंबा मागे घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर विश्वासदर्शक ठराव आणण्यात आला. डिसेंबरच्या तिसऱ्या आठड्यात विश्वासदर्शक ठराव मांडला गेला. 

याचा निकाल लागला तेव्हा मुख्यंत्र्यांना १४४ आमदारांचा पाठींबा होता, तर विरोधात १६४ आमदार होते… 

आत्ता राय यांचे धाबे दणाणले… 

झालेलं अस की झारखंड पार्टी सोबत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या आमदारांनी देखील बस कंडक्टरच्या मुद्यावरून सरकारचा पाठिंबा अखेरच्या क्षणी काढून घेतला होता. फेब्रुवारी १९७० मध्ये मुख्यमंत्री झालेला हा नेता १० महिन्यात एका बस कंडक्टरच्या मुद्यावरून पायउतार झाला… 

थोडक्यात काय तर युती तुटायला काहीही कारण लागू शकतं..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.