नागपुरच हिवाळी अधिवेशन फक्त आमदारांची सहल नाही तर कोट्यवधीची फिरणारी इकॉनॉमी आहे

दरवर्षी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आयोजित केल जातं. कोरोनामुळे सलग दोन वर्ष जे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात आलं होत. दोन वर्षांनंतर हे अधिवेशन होत आहे.

जुन्या जाणत्या लोकांना जर विचारलं ना की, नागपूरच अधिवेशन म्हणजे काय ? तर हमखास उत्तर येणार ते म्हणजे

हुर्डा पार्टी

होय…नागपूर करारामुळे हे हिवाळी अधिवेशन सुरू झालं असलं, किंवा यापाठीमागं बराच मोठा इतिहास असला तरी बऱ्यापैकी या अधिवेशनाला हुर्डा पार्टी अधिवेशन म्हणत असत.

नागपुरातील अधिवेशन विकासापेक्षा विदर्भात होणाऱ्या हुरडा पार्ट्यांमुळे विशेष गाजत आले आहे. हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर वा डिसेंबर महिन्यात होते. याच काळात ज्वारी कापणीस येते. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नेते एकत्रितपणे हुरडा पार्ट्या केल्या जात होत्या. हुरडा पार्ट्या हा हिवाळी अधिवेशनाचे एक विशेष आकर्षण झाले होते.

साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर या काळात विदर्भात ज्वारीचा हुर्डा निघतो. खास करून वाणीचा हुर्डा मिळत असे. त्यावेळच्या राजकीय नेत्यांची मोठमोठी शेती होती. त्यात या हुर्डा पार्टी रंगत असत. ज्वारीची कणसं गोवर्‍यांच्या शेकोटीत भाजली जात. नंतर चोळून हुर्डा काढला जात असे. हा हुर्डा, मिरचीचा ठेचा व छान दही-साखर असा मेन्यू राहात असे.

हे दही-साखरही कणसाच्या कुच्यांनी खावे लागत असे. सभागृहात राजकीय विरोध, आरोप-प्रत्यारोप झडत, राजकीय विरोधही पराकोटीला जात असायचा. पण, रात्री मात्र हुर्डा पार्टीत सर्व विरोध मावळत असे. या हुर्ड्याचा तिखट-गोड शिराही लज्जतदार लागत असे. पण, यात पार्टीपेक्षाही वैदर्भीय दिलदारी हा भाग महत्त्वाचा राहात असे.

बॅ. नानासाहेब वानखेडे यांच्या बंगल्यावर व शेतावर होणारी पार्टी तर अगदी कालकाल पावेतो चर्चेत राहात होती.

या हिवाळी अधिवेशनाचं विशेष म्हणजे या निमित्ताने नागपुरात मोठी उलाढाल होते. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनापूर्वीच हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागणे सुरू होते. नागपूर विमानतळ ते विधानसभा, आमदार निवास, रविभवन रस्ते चकाकणे सुरू होते. आमदार निवासाची रंगरंगोटीही सुरू होऊन जाते. ज्या ज्या मार्गावरून आमदार, मंत्रिमहोदयांचा वावर असेल, जेथे त्यांचे निवासस्थान असेल तो तो परिसर एखाद्या नववधूसारखा सजूधजू लागतो.

एरवी खड्डय़ात रस्ता आहे, की रस्त्यात खड्डे आहे, असा प्रश्न पडावा तेही रस्ते ठाकठीक होऊन जातात. कचर्‍याच्या बाबतीतही तेच. कचर्‍यात शहर आहे, की शहरात कचरा, हा प्रश्न एरवी पडतो. पण अधिवेशनकाळापुरता कां होईना हा प्रश्न पडत नाही.

अशीच लगबग असते व्यापाऱ्यांची सुद्धा. 

नागपुरात अधिवेशनाची तयारी जशी सरकार करते त्याच बरोबर नागपुरातील व्यापारी देखील तयारी करतात. यासाठी व्यापारी १ महिन्यापासून तयारी सुरू करतात. कारण अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. यामुळे नागपुरातील हॉटेल आणि लॉज भरलेले असतात.

मागच्या वर्षी कोरोनाने व्यापाऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं. त्यात गेल्या वर्षी अधिवेशन घेण्यात आलं नाही. त्यामुळे खूप मोठं नुकसान झालं. म्हणून या वर्षी सर्व व्यापाऱ्यांची आशा अधिवेशनाकडे लागली आहे. नागपुरात अधिवेशन झालं तर व्यापाराला चालना भेटते.  नागपूरच्या व्यापाऱ्यांचा  जवळजवळ ३०० कोटी रुपयांचा व्यवसाय होत असल्याचे सांगितलं जातं,

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.