तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेल्या या १३ जणांचा निकाल बंगालच भविष्य ठरवणार आहे..
आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधात कितीही मोठ्या प्रमाणात अपप्रचार होत असला तरीही पश्चिम बंगाल मधून डाव्यांच्या हातून सत्ता मिळविणे सोपे काम नव्हते. त्या १९८४ पासून समर्थपणे पश्चिम बंगाल मधील डाव्यांना तोंड देत आहे. त्यांच्यावर आता पर्यंत अनेक हल्ले झाले आहेत.
एक-एक कार्यकर्ता तयार करत ‘मां, माटी, मानुष’ हा नारा देत २०११ मध्ये सर्वाधिककाळ सत्तेत राहिलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पराभव करत ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता मिळविली. आता वाऱ्याची दिशा ओळखत तृणमूल मधील अनेक दिग्गज नेत्यांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली आहेत. यात ममता यांचे विश्वासू, सल्लगार यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ३४ जणांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यातील १३ मागील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. उद्या होणाऱ्या मतमोजणीवर या १३ जागेवर विशेष लक्ष असणार आहे.
तृणमूल मधून भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या मिथुन चक्रवर्ती आणि दिनेश त्रिवेदी यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आले नाही. पश्चिम बंगालचा विजय हा त्या पक्षाला वेगळी ऊर्जा मिळवून देणारा ठरणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकी रंगीत तालीम म्हणायला हवी.
२९४ जागे पैकी १३ जागेवर या संपूर्ण निवडणुकीत लक्ष असणार आहे.
१) नंदिग्राम सुवेंदू अधिकारी वि. ममता बॅनर्जी
नंदीग्राम मतदारसंघाकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा केंद्र बिंदू म्हणूनच पाहण्यात येत आहे. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या एकेकाळचा जवळचा सहकारी. पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस पाय रोवण्यासाठी नंदीग्राम चळवळ महत्वाची ठरली. या नंदीग्राम चळवळीचा मुख्य चेहरा सुवेंदू अधिकारी हे होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीपूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल सोडत भाजप मध्ये प्रवेश केला.
हा सर्वांना धक्का होता. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या मतदारसंघातून न लढता नंदीग्राम मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. नंदिग्रामच्या जोरावर २०११ मध्ये सार्वधिक काळ सत्तेत असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव तृणमूल काँग्रेसने केला होता. यामुळे नंदीग्राम मध्ये काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
२) किशननगर उत्तर – मुकुल रॉय वि. कौशानी मुखर्जीं
मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांचा उजवा हात समजण्यात येत होते. २००१ नंतर ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मुकुल रॉय हे किशननगर उत्तर मधून बंगाली अभिनेत्री कौशानी मुखर्जीं विरोधात लढत आहे. कौशानी मुखर्जींने जानेवारी महिन्यात तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. २० वर्षानंतर मुकुल रॉय निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. अनेक काळ मुकुल रॉय ममता बॅनर्जी सोबत सावली सारखे राहिले आहेत.
३) डोमजूर – राजीव बॅनर्जी कल्यानेदूं घोष
राजीव बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या सरकार मध्ये मंत्री राहिले आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. २०११ आणि २०१६ मध्ये ते तृणमूलच्या तिकिटावर निवडून आले आहेत. यंदा तृणमूल काँग्रेसने डोमजूर मधून कल्यानेदूं घोष यांना उमेदवारी दिली आहे.
४) बैली – वैशाली दालमिया वि. डॉ. राणा चॅटर्जी
वैशाली दालमिया यांना पक्ष विरोधी कारवाई केल्याने तृणमूल काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. वैशाली दालमिया २०१६ मध्ये बैली मतदार संघातुन तृणमूलच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाच्या सौमेंद्रनाथ बेरा यांचा १५ हजार ४३ मतांनी पराभव केला होता. यावेळी तृणमूल काँग्रेसने डॉ. राणा चॅटर्जी यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दालमिया या भारतीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी आहे.
५) डायमंड हार्बर – दीपक हलधर वि. पन्नालाल हलधर
दीपक हलधर हे दोन वेळा डायमंड हार्बर मतदार संघात तृणमूल काँग्रेसमधून निवडून आले आहे. मात्र, पक्ष काम करू देत नसल्याचे सांगून त्यांनी आपला राजीनामा स्पीड पोस्ट मार्फत पाठविला होता. त्यानंतर ते चर्चेत आले होते. यावेळी ते भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांच्याविरोधात तृणमूलकडून पन्नालाल हलधर हे निवडणूक लढवत आहेत.
६) सिंगूर – रवींद्रनाथ भट्टाचार्य वि. बेचाराम मन्ना
सिंगूर आंदोलनात ममता बॅनर्जी सोबत रवींद्रनाथ भट्टाचार्य बेचाराम मन्ना या दोघांचा महत्वाचा रोल होता. रवींद्रनाथ भट्टाचार्य यांचे वय जास्त झाल्याचे सांगून त्यांना तृणमूल काँग्रेसने तिकीट नाकारले होते. मागच्या महिन्यात रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. तृणमूल काँग्रेसने बेचाराम मन्ना यांना उमेदवारी दिली आहे.
७) राणाघाट उत्तर पश्चिम – पार्थसारथी चॅटर्जी वि शंकर सिंघा
६२ वर्षीय पार्थसारथी चॅटर्जी हे २०११ मध्ये राणाघाट उत्तर पश्चिम मधून तृणमूल काँग्रेस कडून निवडून आले होते. २०१६ मध्ये शंकर सिंघा यांनी पार्थसारथी चॅटर्जी यांचा परावभाव केला होता. यावेळी शंकर सिंघा हे तृणमूल काँग्रेसकडून लढत आहेत. पार्थसारथी चॅटर्जी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
८) जगतदल- अरिंदम भटाचार्य वि सोमनाथ शाम
अरिंदम भटाचार्य हे वकील असून भाजपच्या तिकिटावर जगतदल विधानसभेची निवडणूक लढवत आहे. गेल्यावेळी ते शांतिपूर मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी त्यांनी आपला मतदारसंघ बदला आहे.
९) नाताबरी – मिहीर गोसावी वि रबिन्द्रनाथ घोष
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळील म्हणून मिहीर गोसावी यांना ओळखण्यात येत होते. भाजप मध्ये प्रवेश कराऱ्यांपैकी ते एक होते. कुचबिहार दक्षिण मतदार संघातून ते गेल्या वेळी निवडून आले होते. यावेळी ते भाजपकडून नाताबरी मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
१०) मोंटेश्वर- सजल पांजा वि. सिद्दीकुल्लाह चौधरी
सजल पांजा यांनी २०१६ मध्ये झालेली पोटनिवडणुकी मोठ्या फरकाने जिंकली आहे. तृणमूल काँग्रेसने यावेळी सिद्दीकुल्लाह चौधरी यांना उमेदवारी दिली असून ते जमियत उलेमा- ए हिंदचे अध्यक्ष आहेत.
११ ) कालना – विश्वजित कुंडू वि देवोप्रसाद बग
विश्वजित कुंडू यांचा काही महिन्यापूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सांगत त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात आला होता.
१२) पंडेश्वर-जितेंद्र तिवारी वि. नरेंद्रनाथ चक्रवर्ती
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका देत जितेंद्र तिवारी यांनी निवडणुकीच्या काही दिवसापूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचा मोठा नेता म्ह्णून त्यांच्याकडे पाहण्यात येत होते. मात्र आपल्याला पक्षात काम करायला संधी मिळत नसल्याचे सांगून त्यांनी राजीनामा दिला होता. भाजप मध्ये प्रवेशावेळी त्यांना मोठा विरोध झाला होता.
१३) दुर्गापूर पूर्व – दीपांशु चौधरी वि. प्रदीप मजुमदार
दीपशू चौधरी हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. त्यांचा सल्लगार म्ह्णून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. २०१७ मध्ये भाजप मधून तृणमूल मध्ये प्रवेश केला होता. यावेळी पुन्हा एकदा ते भाजपच्या तिकिटावर दुर्गापूर पूर्व मधून लढणार आहेत.
या तेरा जागा ममता दीदींनी जर जिंकल्या तर त्यांचं विजयाचं वारू कोणीही अडवू शकणार नाही. पण जर त्या या तेरा जागा मिळवू शकल्या नाहीत तर आपल्या जनतेची पकड ते गमावल्या आहेत हेच सिद्ध होते.
हे ही वाच भिडू.
- ज्यांच्यामुळे ममता बॅनर्जी उपोषणाला बसल्या आहेत ते राजीव कुमार आहेत तरी कोण ?
- ममतांच्या एका इशाऱ्यावर मोदींविरोधात १६ पक्ष एकत्र येऊ शकतात का?
- २४ वर्षापुर्वीच्या या घटनेमुळे ममता बॅनर्जींनी कॉंग्रेस सोडली होती..