प्रबोधनकारांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढून ते शाहूंच्या विरोधात आहेत असा प्रचार झाला

राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे ! 

या तिन्ही महापुरुषांची गोष्ट. राजर्षी शाहूंच्या चरित्रात कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे या दोघा सत्यशोधकांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या तिन्ही महान व्यक्तींची कार्यक्षेत्रे वेगवेगळी होती मात्र त्यांची वाटचाल एकमेकांच्या कार्याला पूरक अशीच होती.

शाहू महाराजांच्या सहवासात भाऊराव पाटील प्रबोधनकारांच्याही बऱ्याच काळ अगोदर आले होते. तर त्याच्या बऱ्याच काळानंतर म्हणजेच १९१८ च्या दरम्यान शाहूंच्या संपर्कात आलेले.  

प्रबोधनकारांकडे बघण्याचा महाराजांचा दृष्टिकोन “ब्राम्हणशाहीच्या विरोधात पुकारलेल्या लढाईतील आपला एक बिनीचा सहकारी” हा होता. एकेमकांना पाठबळ देणे दोघांनाही कर्तव्याचे वाटे.

त्यांच्यात अनेकदा वैचारिक मतभेद झालेले. मात्र त्यांचे संबंध तुटेपर्यंत कधीच ताणले गेले नाही.

मात्र राजर्षी शाहूंच्या जाण्यानंतर एक प्रसंग घडला आणि काही लोकांनी प्रबोधनकारांना  छत्रपती शाहूंच्या विरोधात असलेले दाखवलं.

याला भाऊरावांच्या आयुष्यात घडलेलं एक अतिशय भयंकर “डांबर प्रकरण” कारणीभूत ठरलं होतं.

शाहू महाराजांच्या दरबारात १९१४ च्या दरम्यान दोन गट पडले होते. त्यातल्या काही सदस्यांनी इंग्लंडच्या राजघराण्यातील एडवर्ड बादशाह, राणी अलेक्झांड्रा पुतळ्याला डांबर फासलं होतं. ही राजद्रोहाची घटना होती त्यामुळे शाहू महाराज अस्वस्थ होते.

यातल्या निटव्यांनी दुसऱ्या गटाच्या विरुद्ध साक्ष द्यावी म्हणून शाहू महाराजांचे कान भरले. लठ्ठ्यांविरुद्ध भाऊरावांनी साक्ष द्यावेत म्हणून भाऊरावांना कोल्हापूरात बोलावलं गेलं आणि त्याला भाऊरावांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर चोरीचे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांचा तिथे बराच छळ झाला होता.  पुढं पुराव्या अभावी त्यांची सुटका झाली.

पुढे महाराजांना आपली चूक उमजली आणि त्याचा पश्चात्तापही त्यांना झाला. त्याचा निकालही त्यांनी पुढे लावलाच. कालांतराने, महाराजांनी प्रो. लठ्यांना पत्र पाठवून डांबर प्रकरणात जो त्यांना त्रास झाला, त्याबद्दल बिनशर्त माफी मागितली होती! 

महाराज मे १९२२ मध्ये अकाली गेले. 

शेवटपर्यंत त्यांच्याशी भाऊरावांच्या भेटीगाठी होत राहिल्या. महाराज गेल्यानंतर चार-पाच वर्षांनी म्हणजे सन १९२६ साली प्रबोधनकारांनी आपल्या ‘प्रबोधना’तून भाऊराव पाटलांचे चरित्र सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्प परिचय’ या नावाने प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला आणि त्याचा पहिला भाग त्यांनी मोठ्या दणक्यात प्रसिद्धही केला. 

शाहू महाराजांच्या बदनामीचा प्रबोधनकारांवर आरोप झाला…

या चरित्रात भाऊरावांच्या पूर्वायुष्यासंबंधी, विशेषतः कोल्हापुरातील डांबर प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या पोलिसी अत्याचारासंबंधी, मजकूर येणे अपरिहार्य होते. 

या प्रकरणाची हकिकत देताना प्रबोधनकारांनी लिहिले होते – “कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार”

“भाऊरावांची अटक केवळ पोलिसी प्रेरणेची होती असे नव्हे, तर त्याची सूत्रे खुद्दांकडून हलत होती. वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणात लठ्यांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चयच होऊन बसला होता. मग त्यांच्या मागे पोलिसांची कानचावणी असो, नाही तर लठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो”.

वरील परिच्छेदातील त्याची सूत्रे खुद्दांकडून (म्हणजे शाहू ” महाराजांकडून) हलत होती, या वाक्याने महाराजांची बदनामी झाल्याची तक्रार कोल्हापूर दरबारने सातारच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे कलेक्टराकडे केली. 

त्या काळी कलेक्टर इंग्रज साहेब असे आणि त्याला मराठी कागदपत्रांतील मजकूर समजावा म्हणून त्याच्या कचेरीत अशा कागदपत्रांचे इंग्रजी भाषांतर करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाई.

त्यास ‘ओरिएन्टल ट्रान्सलेटर’ असे म्हटले जाई. मुळात ट्रान्सलेटरनेच ही सगळी गडबड केली होती.

या ओरिएन्टल ट्रान्सलेटर’ ने ‘सूत्रे हलवणे’ या शब्दांचे भाषांतर ‘वायर पुलिंग’ असे केले!  त्यामुळे, अर्थाचा अनर्थ होऊन सगळाच घोटाळा झाला होता.

कलेक्टरांनी प्रबोधनकारांना समन्स पाठवून बोलावून घेतले आणि त्यांच्यावर आरोप ठेवला की, त्यांनी लिहिलेल्या भाऊराव चरित्रात असे अप्रत्यक्षपणे सूचन (Insinuation) होते, की भाऊरावांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारात शाहू महाराजांचे अंग होते; याचा अर्थ महाराजांवर अत्याचाराचा आरोप केला जात आहे!

यावर प्रबोधनकारांनी ओरिएन्टल ट्रान्सलेटर’ ने ‘सूत्रे हलवणे’ याचा चुकीचा अनुवाद केल्याचे साहेबांच्या निदर्शनास आणले व त्यावर ‘खुल्या दिला’ने चर्चाही झाली. 

साहेबांस प्रबोधनकारांचे म्हणणे पटले की नाही, हे कळण्यास मार्ग नाही; पण त्यांनी भाऊरावांच्या चरित्राचा पुढचा भाग प्रकाशित करण्यास प्रबोधनकारांना मनाई केली।

मात्र ‘प्रबोधना’ च्या पुढच्या अंकात प्रबोधनकारांनी ही सर्व हकिकत देऊन आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे. 

त्यात त्यांनी भाषांतर कसे चुकले आणि त्यामुळे वाक्याचा अर्थ बदलला आणि लेखकाच्या हेतूचाही विपर्यास झाला असं सांगत व्याकरणाच्या संपूर्ण संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलं. अर्थात, या भाषांतरित शब्दयोजनेमुळे हे सगळं झालं. 

पण अशी बदनामी शत्रूही खरे मानणार नाही !

प्रबोधनकारांनी पुढे म्हटले आहे की, महात्मा फुले व शाहू महाराज या थोर पुरुषांविषयी आपले विचार काय आहेत, हे आपण मांडलेले असतानाही आपणावर शाहू महाराजांची बदनामी केल्याचा आरोप यावा, ही गोष्ट आश्चर्यजनक आहे.

ठाकरे यांनी शाहू महाराजांची बदनामी केली हा आरोप महाराजांचे कडवे शत्रूसुद्धा मानणार नाहीत असे प्रबोधनकार सांगतात.

पण अत्याचाराचा आरोप महाराजांकडे जातोच कसा ?

डांबर प्रकरणी भाऊराव पाटलांच्या वर कोल्हापुरात पोलिसी अत्याचार झाले हे खरेच; पण त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष आरोप महाराजांवर होऊ शकत नाही, असे प्रबोधनकारांचे म्हणणे होते. 

ते म्हणतात – “भाऊराव प्रकरणी कोल्हापुरी पोलिसांकडून घडलेल्या अत्याचाराचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष आरोप महाराजांकडे जाऊच कसा शकतो? मथळा तर ‘कोल्हापुरी पोलिसांचे अत्याचार’ असाच आहे. ‘शाहू महाराजांचे अत्याचार’ असा नाही. डांबर प्रकरणाचा तपास लावण्याची सर्व सूत्रे खुद्द महाराजांनी जरी हाती ठेवली होती, तरी सर्व लहानसहान गोष्टी ते स्वतःच थोडीच हाताळत होते की काय?

 “सारांश, कोल्हापुरी पोलिसांच्या अत्याचाराचा संबंध महाराजांशी जोडण्याचा अर्थ आमच्या वाक्यातून मुळीच निघत नाही आणि तसा आमचा हेतूही नव्हता व कधी असणारही नाही. मात्र भलत्या कल्पनेची कावीळ झालेल्या डोळ्यांना सगळा लेखच पिवळा दिसला, तर आम्हापाशी कसलाच उपाय नाही.” असंही प्रबोधनकार लिहितात.

प्रबोधनकारांच्या ज्या प्रबोधनातील एका वाक्याने हे सर्व रामायण घडून आले होते, त्याबद्दल प्रबोधनकारांनी खुल्या दिलाने दिलगिरी व्यक्त केलेली आढळते.

अर्थात, ही दिलगिरी कोल्हापूर दरबारच्या रोखाने होती. त्यात त्यांनी म्हटले होते, “वृत्तपत्रकारांचे सत्यनिरूपणाचे प्रामाणिक कर्तव्य बजावीत असताना एखाद्या शब्दाने, वाक्याने, संदर्भाने किंवा आणखी कशानेही कोणाचीही मनोवृत्ती दुखावली गेली असल्यास केवळ शाहू महाराजांसाठी एक सोडून लाख वेळा दिलगिरी व्यक्त करतो”.

आपल्या लेखातील एका विधानावरून कोल्हापूर दरबारचे मन दुखावले गेले म्हणून प्रबोधनकारांनी तितक्याच खुल्या मानाने दिलगिरी व्यक्त केली होती..

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.