राडा घालणाऱ्यांना पाठींबा देवून CM नी आपल्याच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उभा केला?

संस्कृती देखील राडा करणारी असू शकते हे शिवसेनेनं शिकवलं. आपल्या न्याय मागण्यांसाठी एखाद्या बड्या ऑफिसात जावून कोणाला न जुमानता तोडफोड करणं असो की एखाद्या बड्या पत्रकाराला मुस्कडावणं असो या गोष्टी शिवसेना स्टाईल म्हणून अधिक गाजल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अशा गोष्टींना पाठींबा असायचा, लोकांनाही त्या बऱ्या वाटायच्या कारण त्यामागची कारणं प्रामाणिक असायची… 

पण जेव्हा राडा घालणाऱ्या पक्षाची सत्ता असते किंवा अशा पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख असतात तेव्हा मुख्य जबाबदारी कायदा व सुव्यवस्थेची असते.

हे सांगण्याचं निमित्त आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना भवन मध्ये झालेला राडा. 

झालेलं अस की, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावर सामन्यात अग्रलेख लिहून टीका करण्यात आली होती. त्या विरोधात बुधवारी (१६ जून) भाजपतर्फे शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकत्यांमध्ये राडा झाला होता. हा राडा थेट रस्त्यावर झाला. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 

भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती.

या घटनेनंतर “मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर दादर, माहीम आणि वडाळा या भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची पाठ थोपटली. यावेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह २५ ते ३० शिवसैनिक उपस्थित होते.

या भेटीमुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी बुधवारी शिवसेना भवना समोर केलेल्या कृत्याचे समर्थन केल्याचेच दिसून आले. 

तसं पाहायला गेलं तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेना भवनाबाहेर झालेल्या राड्यात सामील असलेल्या ४० भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला होता. मात्र भाजपच्या नेत्यांनी असा सत्कार करणे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कायदा तोडणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करणे या दोन्ही गोष्टी जरी चूक असल्या तरी त्यातला मुख्य फरक म्हणजे शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे.

राज्यातील कायदा सुवस्था राखण्याची जबाबदारी राखणे ही सत्ताधारी पक्षाचे काम असते. महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी आहेत. ज्यांच्या हातात कायदा आणि सुव्यवस्था आहे त्यांनीच ती मोडल्याबद्दल कौतुक करणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

याबाबत बोलभिडूने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्याशी संपर्क साधला बोलभिडू सोबत बोलताना ते म्हणाले, 

“शिवसेना भवन समोरील मारहाण ही महाविकास आघाडीसाठी सेक्युलरिझम साठीची मारामारी तर भाजप समर्थकांसाठी हिदुत्वासाठीची मारामारी होती. देशात राज्यघटना आहे पण दोन्ही प्रकारच्या समर्थकांना याचा विसर पडला आहे.

या मारहाणी नंतर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेणे १०० टक्के चूक आहे. असं करण्याची अजिबात गरज नव्हती.”

सत्ता ही अमर्याद अधिकार देते पण जबाबदारी देखील देते. हे समजून घेण्यासाठी इतिहासातील काही उदाहरणं आपण पहायला हवीत. २००४ मध्ये आघाडीचे सरकार असताना गृहमंत्री पदाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे होती. तेव्हा तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळ यांचे नाव समोर येत होते. 

याच काळात झी मराठी या वाहिनीवरून घडलय-बिघडलय हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येत असे. या कार्यक्रमादरम्यान तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांची खिल्ली उडवण्यात आली होती. तेव्हा भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी झी मराठी या वाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केला होता. गृहमंत्र्यांच्याच कार्यकर्त्यांनी असा हल्ला केल्याने मोठ्या प्रमाणात टिका झाली होती व त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

२०१२ मध्ये यशोमती ठाकूर यांच्या समर्थकांनी वाहतूक पोलीसांना मारहाण केल्याचा आरोप  होता. अमरावती शहर पोलीसांनी गांधी चौक ते चुना भट्टी हा मार्ग वन वे केला होता. यशोमती ठाकूर यांनी वन वे मधून नियम मोडून गाडी नेली होती. यावेळी वहातूक पोलीसांनी त्यांची गाडी अडवली. या दरम्यान बाचाबाची होवून वाहतूक पोलीसांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबद्दल यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं देखील सांगण्यात येतं. 

सत्तेत असताना कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी कायदा हातात घेतल्याची ही ओझरती उदाहरणं. जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यकर्त्यांला बंगल्यावर बोलवून केलेल्या मारहाणीचा आरोप असो की कार्टून शेअर केले म्हणून शिवसैनिकांनी एका जेष्ठ नागरिकांस केलेली मारहाण असो अशा सर्वच गोष्टी जबाबदारीचं भान हरवल्याची उदाहरणे म्हणून नोंद केली जातात. 

शिवसैनिक-भाजपच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाबद्दल जेव्हा ॲड. असीम सरोदे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 

“देवाचे अस्तित्व सगळीकडे असे आपल्याला सांगण्यात येते. मग मंदिरासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते का वाद घालत आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अशा  वागणे हे चुकीचे आहे.

सामान्य नागरिकांच्या समस्या वेगळ्याच आहेत. त्यासाठी कोणीही रस्त्यावर येत नाही. अशा प्रकारचे राजकारण करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री आपल्या कार्यकत्यांना भेटायला नको होते.”

आत्ता हे चित्र एकीकडे आणि आदित्य ठाकरेंच चित्र एकीकडे. जेव्हापासून आदित्य ठाकरे सेनेत पुढे येत गेले तेव्हापासून शिवसेनेने आपल्या कक्षा व्यापक करण्याचा प्रयत्न केला. यासाठी PR पासून ते हरएक प्रयत्न करण्याचे प्रयत्न झाले. मुंबईच्या नाईट लाईफचा विषय असो की व्हॅलेन्टाईनला समर्थन देणारे मुद्दे असोत. इतकच काय तर एकेकाळचा कट्टर गुजराती विरोध केम छो वरळी मध्ये कन्वर्ट झाला. आजोबांनी बजाव पुंगी हटावो लुंगीचा नारा दिला होता आदित्य ठाकरेंनी मात्र स्वत: लुंगी नेसली… 

थोडक्यात काय ही राडा संस्कृती शिवसेनेला जास्त पुढे घेवून जाणार नाही या विचारानेच आदित्य ठाकरेंनी पाऊले टाकली. 

मात्र परवाच्या घटनेनंतर संजय राऊतांनी शिवसेना गुंडगिरी करते. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. असे स्टेटमेंट दिले. संजय राऊत यांचे समर्थन असो की उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतून दिलेले प्रोत्साहन हे सेनेला पुन्हा ये रे माझ्या मागल्या करणारे आहे. 

दूसरीकडे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वसंरक्षणार्थ शिवसैनिकांनी अशी भूमिका घेतल्याचं व ती योग्य असल्याचं सांगण्यात आलय. मात्र इथे ते आपण सत्तेत आहोत व पोलीस प्रशासनावर आपला विश्वास असायला हवा हे सांगण्याचं विसरतात. अशा प्रकारे स्वसंरक्षणाची ढाल करून राज्यात दंगली घडल्या तर मात्र कोण जबाबदार राहिलं हा प्रश्न पडतो. 

थोडक्यात काय तर जेव्हा विरोधात असता तेव्हा तूम्ही राडा केलात तर चालून जावू शकते पण जेव्हा सत्तेत असता तेव्हा आपल्याच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभारण्याची ती कृती असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राडा घालणाऱ्या शिवसैनिकांना पाठीशी घालून हेच दाखवून दिलं आहे. 

  •  गजानन शुक्ला

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.