फक्त कोल्हापूरची पोटनिवडणूकच नाय, या राज्यांमध्येही बीजेपीचा जोरदार पराभव झालाय

गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या पोटनिवडणूका पार पडल्या. तर काल १६ एप्रिलला त्याचा रिझल्ट लागला. उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव निवडून आल्या. त्यांच्या विजयाने महाविकास आघाडीचा विजय झाला. दणाणून हा विजय साजरा करण्यात आला. 

मात्र महाराष्ट्र काही एकटंच नाही जिथे पोटनिवडणूका पार पडल्या. देशातील विविध राज्यातील पोटनिवडणुका झाल्या, जसं की, बंगालमधील बलीगंजबिहारमधील बोचहान आणि छत्तीसगडमधील खैरागड. सोबतच पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघात देखील मतदान झालं आहे. 

या सगळ्या राज्यांचे निकाल जर आपण बघितले तर लक्षात येतं की, जसं महाराष्ट्र निवडणूक झालेलं एकटं राज्य नाही, तसंच महाराष्ट्राप्रमाणे बीजेपी हरण्याचं देखील एकटं राज्य नाही. 

बंगाल, छत्तीसगढ आणि बिहारमध्येही बीजेपीला मोठी नामुष्की मिळाली आहे.

पहिले आहे : पश्चिम बंगाल..

बंगालच्या बलीगंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसने २०,२२८ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. बाबुल सुप्रियो यांचा दणाणून विजय झाला. त्यांना एकूण मतांपैकी ४९.६९ टक्के मते मिळाली. तर त्यांच्यानंतर नंबर लागला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांचा. त्यांना ३०.०६ टक्के मते मिळाली.

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल लोकसभा मतदारसंघात तीन लाखांहून अधिक मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. हा टीएमसीचा या मतदारसंघातील पहिलाच निवडणुकीतील विजय आहे. इथे भाजप गेल्या दोन वेळा दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी होत होता.

म्हणूनच ही टीएमसीची भाजपला कडाडून झापड असल्याचं बोललं जातंय.

दुसरं आहे : बिहार

बिहारमधील पोटनिवडणुकीसाठी हा एकमेव मतदारसंघ होता ‘बोचहान’. इथल्या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय जनता दलाने म्हणजेच आरजेडीनं विजय मिळवला आहे. आरजेडीचे उमेदवार अमर कुमार पासवान ३५००० मतांनी विजयी झाले. 

त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भाजपाच्या उमेदवार बेबी कुमारी आहेत. 

हा विजय झाला तसं आरजेडीनं ट्विट केलं. ज्यात लिहिलेलं होतं, ‘नरेंद्र मोदी सरकारच्या विभाजनवादी धोरणांविरोधातील हा विजय आहे’. 

तिसरं आहे : छत्तीसगढ 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जनता काँग्रेस छत्तीसगडचे आमदार आणि माजी खासदार देवव्रत सिंह यांचं निधन झालं होतं. त्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक होती, ज्यानुसार ती झाली.

यात छत्तीसगडच्या खैरागड विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने २० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.

आता लास्ट : महाराष्ट्र

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जागा रिक्त झाली होती. म्हणून या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी बराच प्रयत्न केला. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली. तेव्हा जयश्री पाटील यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने या जागी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली.

या निवडणुकीत जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे इथे भाजपने जोरात प्रचार करूनही अपयशच पदरी पडलं आहे. 

अशाप्रकारे चार राज्यांत निवडणूक झाल्या आणि चारही राज्यांमध्ये बीजेपीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पोटनिवडणुकांमध्ये कोणत्याही राज्यात बीजेपीला विजय मिळवता आलेला नाहीये.

म्हणून बीजेपीची स्ट्रॅटेजी चुकली कुठे? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तुम्हाला काय वाटतं, बीजेपी लाट कुठे अडकली? किंवा या राज्यांमध्ये इतर पक्षांच्या विजयामागे त्यांची कोणती स्ट्रॅटेजी होती? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.