शाळेतल्या उडाणटप्पू पोरानं आज शिक्षण क्षेत्रात ४३ हजार कोटींचं साम्राज्य उभं केलयं….

भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन स्टार्टअप BYJU’s ने आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडच हस्तांतरण करण्याची घोषणा केली आहे. देशभरात जवळपास २०० सेंटर आणि २.५ लाख विद्यार्थी असलेलं आकाश ७ हजार ३०० कोटी रुपयांना विकत घेणार आहेत. ऑनलाईन शिक्षणातील हे सर्वात मोठे अधिग्रहण असल्याचे सांगण्यात येत आहे.

पण ही एवढी मोठी कंपनी विकत घेण्याची ताकद असणारी ‘बायजू’ ही अवघ्या ६ वर्षात ४३ हजार ५१२ कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. केरळ मधील बायजू रवींद्रन यांनी २०१५ मध्ये या अॅपची सुरुवात केली होती.

आई-वडील शिक्षक असलेल्या घरी बालपण गेल्यानंतर देखील त्यांना शाळेची गोडी नव्हती. शिक्षणापेक्षा फुटबॉलवर जास्त जीव. दिवसभर फुटबॉल खेळल्यानंतर घरी आल्यावर जमलं तसा अभ्यास करायचा. असं सगळं काम होत. याबद्दल ते त्यांच्या मुलाखतीत देखील कायम अभिमानाने सांगतात की,

“मी विद्यापीठाच्या स्तरावर फुटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनसह सहा वेगवेगळे खेळ खेळलो आहे.”

हा खेळासाठी दिलेला सगळा वेळ लेक्चर्स बुडवल्यानंतर रवींद्रनला त्यांचा राहिलेला अभ्यास कोणाची तरी पुस्तक आणि नोट्स गोळा करून करायला लागयचा. गणितात हुशार असल्यामुळे पुढे कन्नूरच्या सरकारी कॉलेजमधून मॅकेनिकल इंजीनियरिंगला ऍडमिशन घेतलं.

शिक्षण पूर्ण झाल्यावर टिपिकल इंजिनिअर पूर्ण झालेल्या पोरांसारखं बायजू यांनी पण परदेशातील मल्टिनॅशनल कंपनीत सर्विस इंजीनियर म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथं २ वर्ष चांगल्या पगारावर नोकरी केली. 

२००३ मध्ये नोकरीदरम्यानच ते मंगलोरमध्ये सुट्टीसाठी आले, त्यावेळी त्यांनी CAT परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या काही मित्रांनी बायजू यांचं गणित चांगलं असल्याने मदत करण्याची मागणी केली. त्यांच्या मदतीने मित्रांनी त्यात चांगले गुण मिळवले. गंमतीमध्ये स्वतः पण CAT देवून बघितली आणि १०० percentile मिळवले.

यानंतर ते पुन्हा नोकरीसाठी निघून गेले. पुढे दोन वर्षांनी म्हणजे २००५ मध्ये ६ आठवड्यांसाठी ते जेव्हा पुन्हा भारतात परतले, तेव्हा त्यांनी CAT करता आणखी काही लोकांना मदत केली. सुरुवातीला रवींद्रन यांनी ज्या कोणाला CAT परीक्षेच प्रशिक्षण दिलेल्या सगळ्यांचे निकाल अगदी कौतुकास्पद होते.

प्रशिक्षणातील सकारात्मक प्रतिसाद बघून त्यांनी आपणही आपल्या पालकांप्रमाणे शिक्षक होण्याच ठरवलं.

याच प्रशिक्षणाला व्यवसायात बदललं. सुरुवातील घराच्या गच्चीवर क्लास घेऊ लागले. त्यांची गणितचे प्रॉब्लेम्स सोडवण्याची पद्धत बघून हळू – हळू आणखी मुलं प्रवेश घेत होती. सोमवार ते शुक्रवार ते बेंगळुरूमधील तरुणांसाठी कोचिंग घ्यायचे. क्लासच रूपांतर वर्कशॉप मध्ये झाल्यावर त्यांनी मुंबई आणि पुणे इथे शनिवार आणि रविवार वर्कशॉप घ्यायला सुरूवात केली.

नंतर जेव्हा वर्ग कमी पडू लागले, तेव्हा त्यांनी १२०० विद्यार्थ्यांसाठी सभागृह बुक केले. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि अत्यंत उत्साहान उपस्थित राहायचे. अगदी पिन ड्रॉप सायलेंस मध्ये त्यांच वर्कशॉप ऐकलं जायचं. अनेक शहरांमध्ये व्यवसाय सुरू झाल्याने रविंद्रन एका आठवड्यात तब्बल नऊ शहरांचा प्रवास करत होते.

यावर त्यांनी वेबवेक्स वापरून पूर्व-रेकॉर्ड केलेले वर्ग स्क्रीनिंग करण्याचा मार्ग शोधून काढला. व्हिडिओ बघितल्यावर येणाऱ्या शंकांची उत्तर देण्यासाठी अनेक नवीन विडिओ बनवले.

पुढे इंजिनियर्स सोबतच आपलं लक्ष त्यांनी शालेय शिक्षणाकडे देखील वळवलं. यासाठी २०११ मध्ये त्यांनी THINK AND LEARN नावाची कंपनी सुरु केली. 

यानंतर २०१५ मध्ये त्यांनी BYJU’S Learning App ट्रायल म्हणून लॉन्च केले.

आधी ३ विषयांमध्ये सुरुवात केली. अॅप डाउनलोड केल्यानंतर गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रातील काही व्हिडिओ त्यांनी स्वतः पहिले. त्यामुळे कमतरता शोधण्यास मदत होत होती. निरस वाटणारी लेक्चर्समध्ये ग्राफिक्स आणि अॅनिमेशनचा वापर करू लागले. पहिल्याच वर्षात ५५ लाख लोकांनी याला डाऊनलोड केलं.

आता तर हे अॅप संपूर्ण भारतभर प्रसिद्ध ठरलं आहे. आता अगदी सगळ्याच विषयांचा समावेश केला आहे. आज सहावी पासून बारावी पर्यंत ते CAT, UPSC, IIT-JEE, NEET यासारख्या परीक्षांची देखील लेक्चर्स घेतली जातात. 

लोकप्रियतेमुळे गुंतवणूकदार देखील मिळत गेले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रवींद्रनची कंपनी ‘थिंक अॅण्ड लर्न’ने एक वर्षपूर्वी १५ कोटी डॉलर (१०३५ कोटी रुपये) निधी उभारला होता. बायजूमध्ये सध्या फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग पासून चायनाच्या टेंसेंटसारखे नामवंत गुंतवणूकदार आहेत. २०२० च्या फोबर्सच्या यादीत देखील त्यांना स्थान मिळालं होत.

२०१७ मध्ये कंपनीची वार्षिक उलाढाल २६० कोटींच्या आसपास होती. २०१८ मध्ये ती वाढून २५० कोटी रुपयांची झाली होती. अशीच कोटीच्या कोटी उड्डाणे घेत कंपनी आज ४३ हजार कोटी रुपयांची बनली आहे, आणि तिने ७ हजार कोटी रुपयांना दुसरी कंपनी विकत घेतली आहे.

पहिले काही दिवस क्लासला काही नाव देखील नसणाऱ्या बायजू सरांच्या क्लासचे आज ३.५ कोटी सब्सक्रायबर्स आहेत. यातील २४ लाख पेड युझर्स आहेत. जे दरवर्षी १० ते १२ हजार रुपये फी जमा करतात.

पण आजही दिवसभर सहकार्यांसह काम केल्यावर दररोज रात्री ते फुटबॉल खेळतात. आणि ते स्वत:ला “योगायोगाने उद्योजक” झालोय असंच म्हणतात.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.