नोबेल पुरस्कार मिळवणारे सी.व्ही.रमण मुलींना कॉलेजमध्ये ॲडमिशन देण्याच्या विरोधात होते.

एकोणिसाव्या शतकात मुलीना चूल आणि मुल एवढ्या पुरत बांधल गेलेलं होतं. मुलीना शिकवणे त्यांना नोकरीला जाऊ देणे हे कमीपणाच लक्षण समजल जायचं. मध्ययुगीन रूढी परंपरानी स्त्रियांना जखडून टाकलं होतं. अशातच महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे मुलीना शिक्षणाची कवाडे खुली झाली.

आनंदी गोपाळ जोशी, रखमा बाई राऊत यांच्यासारख्या मुली डॉक्टर बनल्या. हीच कामगिरी अनेक मुलीना आत्मविश्वास देऊन गेली.

इंदूरच्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या कमला भागवत ही या पैकीच एक. तिचे वडील आणि काका हे दोघेही रसायनशास्त्राचे विद्यार्थी. त्यांचं शिक्षण बेंगलोरच्या नावाजलेल्या टाटा इन्स्टीट्यूटमध्ये झालेलं होतं. कमला भागवताना देखील रसायनशास्त्रात रस होता. घराण्याची परंपरा पुढे चालवत त्यांनी १९३३साली बी.एस्‌सी.ची केमेस्ट्रीची डिग्री फर्स्ट क्लासमध्ये पास केली.

तेव्हा वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार शास्त्रीय संशोधनासाठी टाटा इन्स्टीट्यूट  ‘बेंगलोर मध्ये अर्ज केला. टाटांनी १९११ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. प्रवेशासाठी कमलाबाई पूर्णपणे पात्र होत्या. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

कमलाबाईना आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर कळाल की संस्थेचे प्रमुख हे मुलीना प्रवेश देण्याच्या विरोधात होते.

तेव्हा टाटा इन्स्टीट्यूटचेप्रमुख होते थोर संशोधक डॉ.सीव्ही रमण. त्यांनी प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग या विषयावर केलेल्या संशोधनाला जगभर रमण इफेक्ट या नावाने ओळखले गेले. त्यांना या संशोधनाबद्दल जागतिक कीर्तीचा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार देखील मिळाला.

सार्वजनिक जीवनात सी व्ही रमण यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारच केला. मात्र जेव्हा खरोखर वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कमलाबाई यांना फक्त मुलगी आहे या कारणामुळे प्रवेश नाकारला. कमलाबाई डॉ. रमन यांना प्रत्यक्ष भेटल्या व ठामपणे संगितल की,

‘मुलगी म्हणून माझ्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही,आणि इथे राहून मी संशोधन करून एम.एस्‌सी. होणारच.’

सुरवातीला रमन यांनी सुरवातीला कमलाबाईंच्याकडे दुर्लक्ष केले.

नंतर त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण कमलाबाईनी आपला हट्ट सोडला नाही. रमण यांच्या कडे त्यांना प्रवेश नाकारण्याचे ठोस कारण देखील नव्हते.  अखेर काही अटी घालून त्यांना प्रवेश दिला. या अटीदेखील विचित्र होत्या.

पहिली अट होती की कमलाबाईना रेग्युलर कोर्स साठी प्रवेश देण्यात येणार नाही. दुसरी अट होती की जर गाईडने सांगितले तर कमलाबाईनी विनातक्रार रात्री उशिरा पर्यंत थांबायचे. शेवटची अट होती कमलाबाई प्रयोगशाळेतील वातावरण दुषित करणार नाहीत.

आज आपल्याला हे ऐकून हास्यास्पद वाटतील पण कमलाबाई भागवतांना भारतातल्या सर्वात विद्वान माणसाने कॉलेजमधील प्रवेशासाठी हे नियम बंधनकारक केले होते.

कमलाबाईनी त्या अटी मान्य केल्या आणि त्यांच्या पुढे प[प्रतिज्ञा देखील केली की

मी हा कोर्स पूर्ण करून दाखवेन आणि तेही डिस्टींक्षण मिळवून

१९३३ साली त्यांनी टाटा इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला. वर्षभर बायोकेमिस्ट्री या विषयाचा झपाटून अभ्यास केला. अखेर वर्षाच्या शेवटी रमन यांना  त्यांना रेगुलर कोर्सला अॅडमिशन द्यावेच लागले. श्रीनिवास्य्या या अतिशय कडक शिस्तीच्या आणि हुशार प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली कमलाबाईनी आपलं संशोधन केल. १९३९ साली त्यांनी आपल्या दिलेल्या शब्दाप्रमाणे एमएस्सी डिस्टींक्षण मिळवून पूर्ण केली.

कमलाबाई यांच्यामुळे डॉ.रमण यांनी मुलीना टाटा इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश देण्यास सुरवात केली.

शिक्षणाच्या संधीचे महाद्वार मुलींसाठी उघडले गेले. पुढे याच टाटा इन्स्टीट्यूटचे नाव स्वातंत्र्यानंतर इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स असे झाले. आज हजारो मुली तिथे संशोधन करत आहेत याचे श्रेय कमलाबाईंच्या संघर्षाला जाते.

लग्नानंतर त्यांचं नाव कमलाबाई सोहनी अस झाल.

पुढे १९३७ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘स्प्रिंगर रिसर्च’ आणि ‘सर मंगलदास नथूभाई’ या शिष्यवृत्त्या मिळवून कमला सोहोनी इंग्लंडला गेल्या. तिथे सुप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

कमलाबाई सोहनी भारताच्या पहिल्या महिला पीएच्‌.डी बनल्या.  

पुढे इंग्लंडमधील अनेक शास्त्रज्ञानी केलेल्या आग्रहाला बळी न पडता  डॉ कमलाबाई मायभूमीच्या प्रेमाने भारतात परत आल्या. दिल्लीच्या ‘लेडी हार्डिंग्ज कॉलेज’ व पुढे मुंबईच्या (रॉयल) इन्स्टिट्यूट ऑफ़ सायन्स’ या संस्थेत त्यांनी काम केले. मुंबईच्या याच संस्थेच्या निदेशक म्हणून त्या निवृत्त झाल्या.

सुप्रसिद्ध लेखिका समाजसेविका दुर्गाबाई भागवत त्यांच्या भगिनी होतं. डॉ. कमलाबाई सोहनीनी १९६९ मध्ये निवृत्त झाल्यावर स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशोधन करून अनेक लेख लिहिले. त्यांचे एक पुस्तक आहार-गाथा या नावाने प्रसिद्ध झाले आहे.

हे ही वाच भिडू.