सोनू निगमचं गाणं एअर होस्टेसच्या नोकरीचा बाजार उठवणारं ठरलं होतं…

सध्या देशात काय ट्रेंडिंग असेल, तर एयर इंडिया आणि टाटा. आता टाटा हे नाव ट्रेंडिंगमध्ये येणं हे काही नवीन नाही. त्यात जोडीला एयर इंडिया पण आहे, म्हणल्यावर तुम्हाला अंदाज आला असेलच की विषय विमानांचा सुरू आहे. टाटांनी एयर इंडिया घेतलं ही बातमी आतापर्यंत लोकांना पाठ झाली असेल. सध्या चर्चेत आहे, नव्या रुपातल्या एयर इंडियाच्या फ्लाईटमधल्या अनाऊन्समेंटची.

२८ जानेवारीपासून टाटा समूहाच्या मालकीत एयर इंडियाच्या विमानसेवांना सुरुवात झाली. त्यामुळे टाटा समूहानं या दिवसापुरती विमानात होणाऱ्या अनाऊन्समेंटमध्ये बदल केला. ‘प्रिय प्रवाशांनो, तुमचा कॅप्टन बोलतोय. या ऐतिहासिक फ्लाईटमध्ये तुमचं स्वागत, आज सात दशकांनंतर पुन्हा एकदा एयर इंडिया टाटा समूहाचा भाग झाली आहे. आम्ही या आणि पुढच्या प्रत्येक फ्लाईटवेळी तुम्हाला उत्कृष्ट सेवा देऊ. एयर इंडियाच्या भविष्यामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद.’

आता ही तशी साधीच अनाऊन्समेंट आहे, पण याला देण्यात आलेल्या टाटा टचमुळं आणखी भारी वाटते. आपल्यापैकी अगदी थोड्या जणांनी २८ तारखेला विमानप्रवास करुन ही अनाऊन्समेंट ऐकली असेल, पण जुन्या आठवणी जागवायला काय हरकत नाय. प्रत्येकाला आपला पहिला विमानप्रवास चांगलाच लक्षात असतो. त्यातल्या एयर होस्टेसपासून कॅप्टनच्या बडबडीपर्यंत सगळं फिक्समध्ये आपल्या लक्षात असतं.

पण समजा, तुम्ही विमानात बसलाय..अनाऊन्समेंट वगैरे झाली. तुम्ही एकदम हरखून इकडं तिकडं बघताय, तेवढ्यात तुमच्या कानावर ओळखीचा आवाज पडतो… तेही गाण्याचा आवाज. मग तुम्हाला कळतं गाणं काय रेडिओवर नाय लागलं, तर एकदम लाईव्ह सुरु आहे, तेही सोनू निगमच्या आवाजात.

इमॅजिन करुनच भारी वाटलं असेल, नाय का? पण हे खरंच घडलं होतं भिडू. महागुरुंच्या नवरा माझा नवसाचा पिक्चरमध्ये झालेलं तसं अगदी सेम सोनूभाऊंनी फ्लाईटमध्ये पण केलेलं, लोकं खुश झाली पण केबिन क्रू चा बाजार उठला.

झालं असं की, जानेवारी २०१७ मध्ये जोधपूरवरुन मुंबईला जेट एयरवेजचं एक विमान चाललं होतं.  नॉर्मल प्रवाशांप्रमाणंच या विमानात सोनू भाऊही होते. विमानात एक साऊंड सिस्टीम असती, ज्यावरुन एअरहोस्टेस ताई आपल्याला सूचना-बिचना देतात. हे विमान उडायला लागल्यावर एअरहोस्टेसनं सोनू निगमला गाणं म्हणायची विनंती केली. आपला भाऊ पण ओके म्हणला आणि त्यानं वीरझारा पिक्चरमधलं ‘दो पल रुका ख्वाबो का कारवा’ गाणं गायलं. लोकं एकदम खुश झाले, त्यांनी पण सोनूच्या आवाजात आपला आवाज मिक्स केला. एकदम हिरवा निसर्ग हा भवतीने टाईप वाईब आली असणार…

सोनूच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. लोकांनाही गाणं तसं लय आवडलं. पण एव्हिएशन सेफ्टी रेग्युलेटरला काय हे पटलं नाही. त्यांच्या दृष्टीनं हा लोकांच्या सुरक्षेच्याबाबत पत्करलेला धोका होता. त्यांनी एअरलाईन्सला विमानात असणाऱ्या एअरहोस्टेसेसला कामावरुन काढून टाकायला सांगितलं.

यावर सोनूभाऊ मात्र चिडले ते म्हणाले, ‘मी विमानात फॅशन शो होताना बघितले आहेत. कॉन्सर्ट होताना पाहिल्यात. कुठलीही अनाऊन्समेंट होणार नव्हती, अशावेळी मी गाणं म्हणलं तर काय बिघडलं? नोकरीवरुन काढून टाकणं म्हणजे लोकांना आनंद वाटणं हा गुन्हा आहे असं वाटायला लागलं आहे.’

त्यानंतर काय सोनू निगमचा दुसऱ्या कुठल्या विमानात गाणं म्हणतानाचा व्हिडीओ आम्हाला काय दिसला नाही, तुम्हाला दिसला असेल तर सांगा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.